सातारा - वाघाटीच्या पिल्लांची आईसोबत पुनर्भेट; बिबट्याची पिल्लं समजून....

    25-Nov-2024   
Total Views |
reunion of rusty spotted cat


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
साताऱ्यातील रायगाव परिसरात शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी उसाच्या शेतात आढळलेल्या वाघाटीच्या पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडली आहे (reunion of rusty spotted cat). वन विभागाने स्थानिक प्राणिमित्र आणि 'रेस्क्यू-पुणे' या संस्थेच्या मदतीने वाघाटीच्या दोन पिल्लांना पुन्हा आपल्या आईच्या कुशीत विसावून दिले. (reunion of rusty spotted cat)
 
शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रायगाव परिसरात ऊस तोडणीचे काम सुरू होते. त्यावेळी कामगारांची लहान मुले त्याचठिकाणी खेळत होती. त्या  मुलांना अचानक लहान मांजरांची पिल्ले दिसली. माजारांची पिल्ले खूप लहान असल्याने मुले त्यांच्याबरोबर खेळू लागली. ही बाब पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांना त्या मांजरांच्या अंगावर बिबट्यासारखे ठिपके दिसले. ठिपके असल्यामुळे सर्व परिसरात बिबट्याची पिल्ले सापडल्याची बातमी पसरली. स्थानिक लोकांनी वनविभागाशी संपर्क साधला. वन विभागाने त्या पिल्लांना सुखरूप छोट्याशा खोक्यात ठेवले. कनकर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. कारण, थोड्याच दिवसांपूर्वी बिबट्याने गावातील कुत्रा आणि शेळीवर ताव मारला होता. आता ही पिल्ले बिबट्याची असल्यास बिबट्या गावकऱ्यांवर हल्ला करू शकतो अशी चर्चा सुरु झाली.
 
 
वनविभागाने सातारा येथील प्राणीमित्र मयूर अडागळे याच्यांशी संपर्क साधला. मयूर अडागळे यांनी पर्यावरण अभ्यासक रोहित घाडगे यांच्याशी पिल्लांबाबत चर्चा करुन ती पिल्ले वाघाटीची (Rusty Spotted Cat) असल्याची खात्री केली. त्यानंतर या पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 'रेस्क्यू-पुणे'च्या टीमला पाचारण करण्यात आले. टीम येईपर्यंत रोहित घाडगे, मयूर अडागळे, महेश अडागळे, ओम अडागळे यांनी परिसराची पाहणी केली. सायंकाळी सात वाजता 'रेस्क्यू-पुणे'च्या मदतीने त्या पिल्लांना सुखरूप छोट्याशा खड्यात ठेवण्यात आले. त्यांचे निरक्षण करण्यासाठी 'कॅमेरा ट्रॅप' लावण्यात आले. साधारण अर्ध्या तासातच त्या पिल्लांची आई त्यांना घेण्यासाठी आली. आसपास कोणताही धोका नाही हे पाहिल्यावर पिल्लांच्या आईने एक पिल्लू तोंडात धरले त्याबरोबर दुसरे पिल्लू आईच्या मागे पळाले आणि आई-पिल्लांची पुनर्भेट घडली. ही कारवाई उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रापाल गणेश महांगडे, वनपाल निलेश राजपूत, वनपाल स्वप्नील चौगले, वनरक्षक नेताजी वासुदेव, विनायक लांडगे,आकाश कोळी,समाधान वाघमोडे,राहुल धुमाळ,वनमजूर नवनाथ महामूलकर, मर्ढेकर यांनी केली.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.