अलगद बॅक सीटवर जाणारा माणूस

    25-Nov-2024   
Total Views |
Bimal Kediya

बिमलजी कामाच्या बाबतीत खूप आग्रही आहेत. एखाद्या गोष्टीसाठी ते कमालीचे आग्रही असू शकतात. त्यांनी कामासाठी आखलेल्या योजनेवर त्यांची पकड अत्यंत चिवट असते. पण, जसे जसे पर्यायी नेतृत्व तयार व्हायला लागते, तशी त्यांची ती पकड हळूहळू सुटायला लागते. काम नव्या पिढीच्या हातात देऊन ते पुढच्या कामाच्या शोधात निघालेले असतात. ही प्रक्रिया इतकी सहज आणि शांतपणे चाललेली असते, की ‘ड्रायव्हिंग सीट’वर असलेले बिमलजी ‘बॅक सीट’वर कधी जाऊन बसले, हेदेखील कळत नाही.

बिमलजी पहिल्यांदा कधी भेटले आठवत नाही. संघात असे कोणी कोणाला लक्षात ठेवत नसते. लक्षात राहात असतो, तो त्या व्यक्तीचा त्या त्या कामावरचा ठसा. त्यात केलेले मूल्यात्मक आणि गुणात्मक योगदान. कारण, संघ अविरत चालत आहे. अनेक कार्यकर्ते येतात, संघकार्यात स्वतःच्या क्षमतेनुसार योगदान देतात आणि पुढे निघून जातात. मात्र, काही माणसे पक्की लक्षात राहतात. बिमलजी लक्षात राहिले, संघ कामातल्या त्यांच्या अफाट योगदानामुळे! वरळी नगरचा सहकार्यवाह म्हणून काम करताना पहिल्यांदा व्यक्तिशः बिमलजींचा झंझावात अनुभवला आणि त्या आकाराला येत असण्याच्या वयात जो ठसा उमटला, तो कायमचा. बिमलजींकडे गडद रंगाची एक ‘मारूती एस्टिम’ गाडी होती. बिमलजी त्या गाडीने भिरभिर फिरत असायचे. महानगर कार्यवाहंचा शाखेवरचा प्रवास हा सोहळा असतो. आमच्यासाठीही होता. मैदानावर पाणी मारणे, ध्वजमंडल रेखाटणे, अग्रेसरांच्या खुणा, कार्यवाह मुख्य शिक्षकांच्या खुणा आणि बरोबर समोर महानगर कार्यवाहंसाठीची खूण, असे सगळे तयार! बिमलजी आले. फॉर्मल शर्ट आणि ट्राऊजर असा वेश. गाडीतून बिमलजी उतरले आणि सरळ डिकीकडे गेले आणि एक लहानशी ब्रिफकेस काढली. आम्ही सगळे कुतुहलाने पाहत होतो. वरळीच्या गोमाता शाखेचे लहानसे मैदान. मैदानाला चारही बाजूंनी भिंती. किमान ६० बालांची दंगेखोर शाखा. बिमलजी कोपर्‍यात गेले. पटकन ट्राऊजर काढून शाखेची हाफ पँट घालून,

“हा! चलिये शुरू करते हैं।”

म्हणून सुरुवात झाली. शाखेची वेळ चुकली नव्हती. मग जोरदार शाखा. संपूर्ण शाखेच्या कार्यक्रमात १०० टक्के सहभाग. व्यायाम, सूर्यनमस्कार, समता, खेळ, गीत आणि प्रार्थना. शाखेनंतर त्या झोपडपट्टीवजा वस्तीत स्वयंसेवकांकडे संपर्क आणि भोजन. आम्ही सगळे त्यादिवशी भारावलेलोच होतो. त्यामुळे बिमलजी बैठकीत भेटायचे. निवासी वर्गाला यायचे. पण, आम्हाला पूर्ण संध्याकाळ सापडले, ते असे. अनेकांना हे वाचून आपले शाखेतले दिवस आठवतील. पण, बिमलजींचा हा दिनक्रम होता. वर्षानुवर्षे! गिरणगावात ‘शिवसेना’ आणि ‘बाळासाहेब ठाकरे’ या नावाचा बोलबाला असताना, गिरणगावातील बाल-तरुणांना संघाशी जोडून ठेवणे खूप अवघड होते. हे काम ज्या २५-३० कार्यकर्त्यांनी केले, बिमलजी हे त्यापैकी एक आणि तितकेच महत्त्वाचे!
शर्टाच्या खिशात ठेवलेली एक लहानशी स्पायरल डायरी आणि त्यात त्यांनाच समजतील, इतक्या कमीत कमी शब्दांत काढलेली टिपणे. कागदाचा अपव्यय नाही आणि सगळे संदर्भ समोर आणि एकाच डायरीत. ‘बिमलजींची डायरी’ हा विषय खोल आहे. एकदा त्यांनी त्यात काही टिपले की, त्या कामाचा म्हणून एक आराखडा त्यांच्या डोक्यात पक्का झालेला असे. कार्यकर्ता जोडण्यापासून ते आर्थिक उभारणीपर्यंत सर्व काही त्यांच्या डोक्यात पक्के असे. वेळ मात्र त्यांची त्यांनाच ठाऊक असते. मग कार्यकर्त्यांना अचानक फोन येतात,

“अरे, तुम्हारा वो ये बाकी था ना? ये यहा पर करना था ना? समझो हो गया हैं। इनसे बात कर लो। नंबर भेज रहा हूं।”
अशी किती कार्यकर्त्यांना व प्रकल्पांना बिमलजींनी मदत केली, ते आता बिमलजींनाही आठवणार नाही. किंबहुना, तो त्यांचा स्वभावच नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनातला प्रसंगही असाच आहे. २०१४ साली प्रेस क्लबच्या माध्यमातून चाललेल्या योजनेत मला घर मिळाले. घरासाठी बँकेचे लोन करून करावी लागणारी रक्कम खूपच मोठी होती. ती रक्कम भरायची गडबड सुरू होती. अचानक बिमलजींचा फोन आला. “अरे, तुम घर ले रहे हो?” मी म्हटले “होय. पण, तुम्हाला कोणी सांगितले?”

“वो छोड दो।”
“एक काम करो।”

“ये दो स्वयंसेवकों के पास जाना और चेक ले लेना। वापस कब करोगे वो भी बता देना। मुझे भी बता के रखना।”
त्यावेळी धावपळ फार होती. दोन चेकची मिळून रक्कम इतकी मोठी नव्हती की बिमलजी एका चेकने मला ती देऊ शकत नव्हते. अपरिचितांकडे मदत मागण्याचा संकोच असल्याने आणि आतापर्यंत बिमलजींशी चांगली दोस्ती झालेली असल्याने, मी नाराजीने बिमलजींना विचारले, “एवढे कशाला फिरायला लावता? तुम्हीच द्या ना. परत द्यायचे आहेतच. तुम्हालाच देईन.” त्यावर त्यांच्या स्टाईलने दिलेले उत्तर माझ्या आजही स्मरणात आहे.

“वो तुम्हारी बात नही हैं।”

“उनको भी स्वयंसेवक इस नाते और किसी स्वयंसेवक को मदत करते रहने की आदत लगनी चाहिए।”
मी गप्प झालो. बिमलजी असे आहेत. ‘बिमलजींची बैठक’ हा तर खासच विषय. बैठक कुठल्या दिशेला न्यायची, हे त्यांनी आधीच ठरवलेले असते आणि कामाची संपूर्ण जबाबदारीही घेतलेली असते. पण, ते प्रत्येकाला बोलू देतात. वेळेचे भान राखण्याच्या सूचना वारंवार करीत राहतात.

बिमलजींचा अजून एक महत्त्वाचा गुण म्हणजे, पुढच्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना हेरून त्यांना कामाला लावणे. ‘मॅनेजमेंट’च्या भाषेत त्याला ‘हॅण्ड होल्डिंग’ म्हणतात. बिमलजी कामाच्या बाबतीत खूप आग्रही आहेत. एखाद्या गोष्टीसाठी ते कमालीचे आग्रही असू शकतात. त्यांनी कामासाठी आखलेल्या योजनेवर त्यांची पकड अत्यंत चिवट असते. पण, जसे जसे पर्यायी नेतृत्व तयार व्हायला लागते, तशी त्यांची ती पकड हळूहळू सुटायला लागते. काम नव्या पिढीच्या हातात देऊन ते पुढच्या कामाच्या शोधात निघालेले असतात. ही प्रक्रिया इतकी सहज आणि शांतपणे चाललेली असते की, ‘ड्रायव्हिंग सीट’वर असलेले बिमलजी ‘बॅक सीट’वर कधी जाऊन बसले, हेदेखील कळत नाही.

बिमलजींनी दैनंदिन संघकामातून ‘केशवसृष्टी’च्या कामात लक्ष घातले, तो काळ सगळा वादळीच आहे. बिमलजी झपाटल्यागत कामाला लागले होते. सारीच परिस्थिती प्रतिकूल. सरकार नाही. आर्थिक सहयोग उभा करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच. पण, बिमलजींनी ते पेलले. ‘केशवसृष्टी’त रामरत्ना विद्या मंदिर उभे राहिले. कृषी, गोसेवा, बहुउद्देशीय संस्था उभ्या राहिल्या. एक नंदनवनच आकाराला आले. रोजच्या शाखेत न गेलेला, मात्र ‘केशवसृष्टी’च्या संपर्कात येऊन कार्यकर्ता म्हणून संघाला जोडला गेलेला एक मोठा वर्ग ‘केशवसृष्टी’ला जोडला गेला. बिमलजींचा यात सिंहाचा वाटा आहे. त्यातून त्यांना ग्रामसेवेचा मार्ग सापडला. आता ते तिथे व्यस्त झाले आहेत. विलेपार्ले ते वाडा अशा त्यांच्या चकरा सतत चालत असतात. वहिनींची त्यांना साथ आहे. मुलांनीही व्यवसाय उत्तम सांभाळला आहे. कामाचे नवनवे आयाम शोधत बिमलजींचा कार्ययज्ञ सुरूच आहे. वय ७५ झाले असले तरी, उत्साह २५चा आहे. अशा या आमच्या दीपस्तंभाला दीर्घायुष्याच्या भरपूर शुभेच्छा!

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.