मुंबई (विशेष प्रतिनिधी) – सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून बेडकांच्या नव्या प्रजाती शोध लावण्यात आला आहे. कोकणच्या भूमीवरुन या प्रजातीचे नामकरण 'फ्रायनोडर्मा कोंकणी', असे करण्यात आले आहे (frog from sindhudurg). कुडाळ तालुक्यातील पाणथळ आणि कातळ सड्यांवर या बेडकाचा अधिवास आहे (frog from sindhudurg). या शोधामुळे सिंधुदुर्गातील पाणथळ जागा आणि कातळ सड्यांवरील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. (frog from sindhudurg)
कुडाळमधून शोधलेल्या नव्या प्रजातीच्या शोधाचे वृत्त नुकतेच 'जर्नल ऑफ एशिया–पॅसिफिक बायोडायव्हर्सिटी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. या नव्या प्रजातींच्या संशोधनामध्ये शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील संशोधक
डॉ .ओमकार यादव, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे डॉ. योगेश कोळी, दहिवडी कॉलेजचे संशोधक डॉ. अमृत भोसले, युनिव्हर्सिटी कॉलेज त्रिवंदरम संशोधन केंद्र येथील डॉ. सुजित गोपालन, माय वे जर्नी ऑर्गनायझेशन संस्थेचे गुरुनाथ कदम, ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे अक्षय खांडेकर आणि झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ डॉ. के.पी दिनेश या संशोधकांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणथळ जागांचे सर्वेक्षण चालू असताना ही प्रजाती शोधण्यात आली. बेडकाची ही प्रजात २०२१ साली ठाकूरवाडी गावात असणाऱ्या तलावात डॉ. योगेश कोळी यांना दिसून आली. या नवीन प्रजातीच्या शरीराचा आकार, डोक्याची रुंदी, पोटाकडील बाजूला असलेले त्वचीय प्रक्षेपण आणि पाठीवरील विशिष्ट रचनेमुळे ही प्रजाती वेगळी आहे हे सिद्ध करण्यात आले. त्याचप्रमाणे मायटोकॉन्ड्रियल 16S rRNA जनुक आणि नुक्लियर टायरोसिनेज जणूकावर आधारित अभ्यासामध्ये ही प्रजाती नवीन असल्याचे सूचित झाले. या शोधामुळे भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये आढळणाऱ्या 'फ्रायनोडर्मा' या बेडकाच्या वंशामध्ये भर पडून 'फ्रायनोडर्मा कोंकणी' या नवीन प्रजातीसह या वंशात आता एकूण पाच प्रजातीचा समावेश झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सडे व पाणथळ जागा हे या प्रजातीचा अधिवास आहे. कुडाळ व मालवण तालुक्यातील परुळे- चिपी सडा व धामापूर गावातील कातळ सड्यांवरील अधिवासासहित ही प्रजात बाव-बांबुळी तलाव, धामापूर तलाव, मांडकुली, पाठ तलाव, वालावल तलाव या ठिकाणी ही अभ्यासादरम्यान ही प्रजाती आढळून आली आहे. पाणथळ जागा आणि सडे हे जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत म्हत्वाचे असल्याने त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. योगेश कोळी यांनी मांडले आहे.
कोकण किनारपट्टीवरील सड्यांवर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. या भागात अभ्यास झाल्यास अजून नवीन गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. तसेच हवामान बदल आणि शहरीकरणामुळे होणाऱ्या पर्यावरणीय बदलांचा परिणाम देखील बेडकांच्या एकूण जीवनावर होत आहे. त्यासाठी पाणथळ जागा व किनारपट्टी भागाताली कातळ सडे यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. - डॉ . ओमकार यादव, संशोधक
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.