रत्नागिरीतील कातळ सड्यांवरील उभयचरांवर संकट; संशोधनामधून 'ही' माहिती आली समोर

    23-Nov-2024
Total Views |
ratnagiri rock outcrop


मुंबई (अक्षय मांडवकर) -
रत्नागिरीच्या किनारी कातळ सड्यांवर होणाऱ्या बागायती आणि शेतीमुळे उभयचरांवर संकट निर्माण झाले आहे (ratnagiri rock outcrop). मूळ अधिवासात झालेल्या बदलाचा गंभीर परिणाम बेडकांच्या काही प्रजातींवर पडल्याचे संशोधनाअंती निदर्शनास आले आहे (ratnagiri rock outcrop). यामधील काही प्रजाती या संकटग्रस्त असून काही प्रजाती या जगात केवळ पश्चिम घाटामध्येच आढळणाऱ्या आहेत. (ratnagiri rock outcrop)

रत्नागिरीच्या किनारी प्रदेशात कातळ सड्यांचे विस्तीर्ण पट्टे पसरलेले आहेत. हे सडे लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेले आहेत. हे सडे जैवविविधेतने समुद्ध असले तरी, त्यांना कायद्याने कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही. या सड्यांवर केली जाणारी भात शेती आणि त्याठिकाणी उभ्या राहणाऱ्या आंबा-काजूच्या बागांमुळे बेडकांच्या प्रजातींवर नेमका काय परिणाम होत आहे, याविषयीचे संशोधन 'नेचर कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन'चे (एनसीएफ) जिथीन विजयन यांच्या नेतृत्वाखाली 'बॉम्बे एन्व्हायर्नमेंटल ॲक्शन ग्रुप'च्या मनाली राणे, डाॅ. अपर्णा वाटवे आणि 'एनसीएफ'चे डाॅ. रोहित नानिवडेकर यांनी केले. यासंबंधीचा संशोधन अहवाल 'इकोलाॅजिकल सोसायटी आॅफ अमेरिके'च्या 'इकोलाॅजिकल अॅप्लिकेशन' या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला आहे.



संशोधकांनी गावखडी, देवीहसोळ, देवाचे गोठणे आणि बकाळे याठिकाणच्या सड्यांवर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये त्यांना उभयचरांच्या एकूण १२ प्रजाती आढळल्या. त्यामध्ये ११ प्रजाती या बेडकांच्या, तर एक प्रजात देवगांडूळाची होती. यामधील 'इंडियन डाॅट फ्राॅग' ही प्रजात 'आययूसीएन'च्या लाल यादीत 'संकटग्रस्त' म्हणून नोंदविण्यात आली असून इतर सहा प्रजाती या पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ आहेत. या संशोधनामध्ये अबाधित राहिलेल्या सड्यांच्या तुलनेत सड्यावर तयार केलेली भातशेती आणि आंबा-काजूच्या बागायतींमध्ये उभयचरांचा अधिवास कमी प्रमाणात आढळला आहे.
उत्तर पश्चिम घाटात प्रदेशिष्ठ असणाऱ्या 'सीईपीएफ बरोईंग फ्राॅग' आणि 'फेजरवर्य गोमांतकी' या बेडकांच्या दोन्ही प्रजाती भात शेती आणि बागांमध्ये कमी प्रमाणात आढळल्या. त्यामुळे कृषीवनीकरणाच्या पद्धती प्रदेशनिष्ठ बेडकांच्या अधिवासाच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. उलटपक्षी दक्षिण आशियामध्ये सहज आढळणारे 'लाॅंग-लेग क्रिकेट फ्राॅग' हे बेडूक सशोधकांना भातशेतीमध्ये मोठ्या संख्येने सहज आढळले. त्यामुळे अधिवासातील बदलामुळे या बेडकांनी हा अधिवास स्वीकारल्याची शक्यता आहे.


सड्यांचे रूपांतर कृषी जमिनींमध्ये झाल्यामुळे त्या अधिवासाबरोबरच त्याठिकाणी राहणाऱ्या प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. बागांचा होणारा विस्तार पाहता कृषीवनीकरण हे बेडकांच्या दृष्टीने अनुकूलित करणे गरजेचे आहे. सड्यांवर अधिवास करणारे बेडूक हे त्याठिकाणीच्या छोट्या डबक्यांमध्ये अधिवास करतात. त्यामुळे बागांमध्ये असे नैसर्गिक जलस्त्रोत टिकवून ठेवणे आवश्यक आहे. शिवाय काही नवीन जलस्त्रोतांची निर्मिती करणे देखील महत्त्वाचे आहे. - जिथीन विजयन, संशोधक