२०३० पर्यंत जहाजबांधणी क्षेत्रात भारत पहिल्या १० देशांमध्ये : सर्बानंद सोनोवाल
22-Nov-2024
Total Views |
मुंबई : “आगामी चार ते पाच वर्षांत भारत हा जहाजबांधणी क्षेत्रात जगातील पहिल्या दहा देशांमध्ये असेल,” असा विश्वास केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल ( Sarbanand Sonowal ) यांनी व्यक्त केला आहे. ‘सागरमंथन’ परिषदेला संबोधित करताना ते नुकतेच बोलत होते.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी “भारत २०३० मध्ये भारत जगतिक जहाजबांधणी क्षेत्रात पहिल्या दहा देशांच्या यादीत असेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘सागरमंथन’ या सागरी व्यापार आणि वाहतुकीशी संबंधित परिषदेला ते संबोधित करत होते. भारतात नौकानिर्मिती क्षेत्रात भरीव योगदान देणासाठी आवश्यक कौशल्य विकास झाल्याचेदेखील सोनोवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले.
भारताचे समुद्री क्षेत्र देशाच्या विकासात महत्त्वाचा हातभार लावत असून, देशाच्या एकूण व्यापार मूल्याच्या ७० टक्के व्यापार सागरी मार्गानेच होत असतो. यासाठी देशात १२ मोठी बंदरे असून, लहान बंदरांची संख्या २००च्या आसपास आहे. यामुळेच देशाच्या सागरी व्यापार आणि वाहतुकीला चालना मिळते.
सागरी वाहतुकीत सध्या भारताचे स्थान जगात १६व्या स्थानी असून, अमेरिका, पश्चिमेतील राष्ट्रे, आफ्रिकेतील अनेक देश भारतीय सागरी क्षेत्राचा वापर करतात. २०२३ मध्ये भारताच्या १ हजार, ५३० जहाजांनी आतापर्यंत प्रवास केला आहे. २०२४ मध्ये सागरी व्यापारातून ८१९.२२ दशलक्ष टन मालवाहतूक झाली आहे. सागरी मालवाहतुकीत २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये ४.४५ टक्क्यांची वाढ दिसून आली. त्यामुळे लवकरच जहाजबांधणी आणि सागरी व्यापार क्षेत्रात भारत नक्कीच भरीव कामगिरी करेल, हे निश्चित.