मल्लिकार्जुन खर्गे हे भाजप आणि संघाला विषारी साप म्हणाले आणि त्यांना ठेचले पाहिजे असे म्हणाले, याचा एक अर्थ असा करायचा का, की ते श्रोत्यांना हिंसा करण्याचे आवाहन करीत आहेत. लोकशाहीत हिंसा बसत नाही. निवडणूक ही अहिंसक राज्यक्रांतीचा मार्ग असते. तेव्हा अशी भाषा ही अत्यंत अशोभनीय म्हटली पाहिजे.
शब्दधनाचा गैरवापर
निवडणुकांचा प्रचार आणि होळीतील धुळवड अथवा शिमगा हे सारखेच असतात, असे जाणकार म्हणतात. होळीतील शिव्या कुणीही गंभीरपणे घेत नाहीत. वर्षातील तो एक दिवस वाट्टेल त्या शिव्या देण्यासाठी मोकळा ठेवलेला आहे. लोक त्याचा आस्वाद घेतात. शिमगा एक दिवस साजरा केला जातो. परंतु, निवडणूक प्रचाराचा शिमगा मात्र अनेक दिवस चालतो. नुकताच त्याचा अनुभव आपण घेतला आहे. एका पार्टीचा नेता काय बोलला आणि दुसर्याने त्याला काय उत्तर दिले, हे उबग येईपर्यंत आपल्याला ऐकवले गेले आहे.
त्यावर प्रतिक्रिया देताना माझा भाचा मला म्हणाला, “मामा, याचा उबग आला आहे. हे असेच चालू राहिले तर माझी ही मतदानाची शेवटची वेळ असेल. कोणीच लायक दिसत नाही आणि नालायकातून लायकाची निवड कशी करायची.” वैतागून तो हे बोलत होता पण, ही गोष्ट खरी आहे.
निवडणूक प्रचारातील कोणाचेही भाषण मी कधीही ऐकत नाही आणि वाचतदेखील नाही. परंतु, का कोण जाणे, यावेळी राज ठाकरे यांचे वरळी प्रचारसभेतील भाषणाचा व्हिडिओ मी पाहिला आणि त्यांचे भाषण मला आवडले. या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचे वाभाडे काढले आणि त्यासाठी त्यांनी जो तर्कवाद दिला, तो निवडणूक प्रचारसभेतील भाषणाच्या संहितेत न बसणारा होता. दुसर्या भाषेत एका अर्थाने हे गंभीर भाषण होते. प्रभादेवीच्या सभेतदेखील हरवलेल्या महाराष्ट्राच्या वारशाची आठवण करून दिली. त्यामुळे दिवाळी अंकातील माझा लेख मला आठवला. अशा सुंदर भाषणांबद्दल राज ठाकरे यांचे अभिनंदन!
या काळातील सगळ्यात घाणरेडे भाषण सांगलीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. वाचक म्हणतील, वर तुम्ही म्हणालात, मी कुणाचे भाषण वाचत नाही. मग, खर्गे यांचे कसे ऐकले? बातम्यांच्या हेडलाईनमध्ये शीर्षक आले, ‘भाजप आणि रा. स्व. संघ हे विषारी साप आहेत आणि त्यांना ठेचून मारले पाहिजे.’ हे भाषण त्यांनी सांगली येथे केले. त्यांनी भाजप आणि संघाला ‘विषारी साप’ म्हटले, म्हणून मला दुःख झाले असे नाही. कारण, यापूर्वी 48-49 सालच्या काळात साने गुरूजींनीदेखील ‘संघ स्वयंसेवक म्हणजे सापाची पिल्ले आहेत’ असे म्हटले होते. अशा प्रकारच्या शिव्या खाण्याची स्वयंसेवक म्हणून आम्हाला सवय झालेली आहे. त्याचे आम्हाला काही वाटत नाही. कारण, संघाला शिव्या देणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. सूर्यावर थुंकल्यानंतर ती थुंकी उलट होऊन थुंकणार्याच्या तोंडावरच येऊन पडते.
वाईट एवढ्यासाठी वाटले की, मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काँग्रेसला १२९ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे आणि या इतिहासात ज्यांना वंदन करावे, अशी थोर माणसे काँग्रेसची अध्यक्ष झालेली आहेत. काही नावे घ्यायची तर दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले, मदनमोहन मालवीय, अॅनी बेझंट, लाला लजपतराय, मोतीलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी इत्यादी या थोर लोकांच्या गादीवर आपण बसलो आहोत, याचे भान खर्गे यांनी ठेवायला पाहिजे.
अशा प्रकारचा श्रेष्ठ वारसा लाभलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने सर्वांना कानाला गोड वाटतील अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत. भाजप काँग्रेसचा प्रतिस्पर्धी पक्ष आहे म्हणून काँग्रेस अध्यक्षाने भाजपवर सडकून टीका केलीच पाहिजे. संघाची विचारसरणी काँग्रेसला मान्य नाही. म्हणून या विचारधारेपासून अंतर राखण्यासाठी अध्यक्षांना बोललेच पाहिजे. पण, भाषा कुठली वापरायची? ती सुसंस्कृत माणसाची भाषा असावी, गावगुंड ज्या भाषेत बोलतात, त्या भाषेत १२९ वर्षांची परंपरा लाभलेल्या काँग्रेस अध्यक्षाने बोलता कामा नये. निवडणुकांच्या प्रचारसभेतही बोलता कामा नये. निवडणुकांचा प्रचार हा शिमगा आहे, हे जरी खरे असले, तरी काहीजणांनी सुचितेचे पालन करणे अनिवार्य आहे.
मल्लिकार्जुन खर्गेे हे भाजप आणि संघाला विषारी साप म्हणाले आणि त्यांना ठेचले पाहिजे असे म्हणाले, याचा एक अर्थ असा करायचा का, की ते श्रोत्यांना हिंसा करण्याचे आवाहन करीत आहेत. लोकशाहीत हिंसा बसत नाही. निवडणूक ही अहिंसक राज्यक्रांतीचा मार्ग असते. तेव्हा अशी भाषा ही अत्यंत अशोभनीय म्हटली पाहिजे. शब्द हे धन असतात. या धनाचा वापर कसा करायचा, हे अनेक साधूसंतांनी सांगितलेले आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे कर्नाटकचे आहेत आणि कर्नाटकमध्ये संतांची महान परंपरा आहे. ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेत्यांचीही मोठी यादी आहे. मृदू, मुलायम आणि परिणामकारक भाषेचा वापर कसा करायचा, हे त्यांच्याकडून खर्गे यांनी शिकले पाहिजे. याबाबतीत राहुल गांधींना आपला गुरू मानू नये.
दोन प्रकारचे राजकीय नेते असतात. पहिल्या प्रकारचे राजकीय नेते हे लोकमत घडवितात. दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लो. टिळक इत्यादी महान नेते या प्रकारात मोडतात. दुसर्या प्रकारचे राजनेते लोकमत काय आहे, ते काय स्वीकारेल आणि काय स्वीकारणार नाहीत, याचे ज्ञानी असतात. भारतीय लोकमत शिवराळपणा स्वीकारत नाही. ते म्हणतात की, एकदा होळीला शिव्या देऊन झाल्या की, वर्षभर शिव्या द्यायच्या नाहीत आणि ऐकायच्याही नाहीत. वाट्टेल ते बोलणार्या नेत्याविषयी लोक चांगले बोलत नाहीत. त्याची ते कुंडली मांडतात. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. परंतु, जनमानस घडविण्याची क्षमता त्यांची नाही. जनमानस ओळखण्याची क्षमताही त्यांच्यात नाही, हे त्यांनी सिद्ध करू नये.
सांगलीतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका संस्कृत सुभाषिताची मला आठवण झाली. या सुभाषितात सुभाषितकार म्हणतो की, राजप्रसादाच्या शिखरावर बसला म्हणून कावळा कधी गरूड होत नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की, खर्गे यांनी गरूड व्हावे, कावळा बनू नये!