आरोग्य केंद्राच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण

ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची जागाही बळकावली

    22-Nov-2024
Total Views |
Health Center


ठाणे : ठाण्यातील शास्त्रीनगर क्र. १ मधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’ आणि ‘आरोग्य केंद्र’ ( Health Center ) उभारणीचा प्रस्ताव शिवसेनेचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. त्याची वर्कऑर्डरही निघाली आहे.

उपायुक्त, वर्तकनगर साहाय्यक आयुक्तांकडे या संदर्भात वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शास्त्रीनगर येथील पालिकेच्या मोकळ्या भूखंडावर जगदाळे यांनी आरोग्य केंद्र मंजूर केले आहे. मात्र, हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतला आहे. तर हत्तीपूलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यालगत वनविभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे.

या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर आहे. त्याची वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र, आचारसंहिता काळाचा फायदा घेत भूमाफियांनी या जागा बळकावल्या असून आरोग्य केंद्रांच्या जागेवर गाळे बांधले आहेत. तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकामे होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पालिकेचे उपायुक्त, वर्तकनगर प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रारी करूनही अद्याप कारवाई केलेली नाही. त्यामुळे हणमंत जगदाळे यांनी पुन्हा आयुक्तांना स्मरणपत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.