मध्यमवर्गीय कुटुंबातील उच्चशिक्षित बाईक रायडर सायली नेहा महाडिक हिचा दुचाकीवरून विश्वभ्रमंतीचा ध्यास युवावर्गाला निश्चितच प्रेरणादायी ठरावा. तिच्या या भरारीविषयी...
बईत मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सायली महाडिक हिचे बालपण तसे आनंदात गेले. वडील भारतीय डाक खात्यात सरकारी नोकर होते आणि आई एका लहान कंपनीत काम करत होती. नर्सरी ते इयत्ता बारावीपर्यंत मुलुंड येथील ‘एच. के. गिदवाणी इंग्लिश हायस्कूल’मध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिने एसएनडीटी महिला महाविद्यालय, घाटकोपर येथून ‘बीएमएस’मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, माटुंगा’ येथून तिने ‘फायनान्शियल मॅनेजमेंट’मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सध्या ती वित्तक्षेत्रात कार्यरत असून रायडिंगसह इतरही छंद उत्तमरित्या जोपासत आहे. अगदी वेळ काढून ती आपले छंद जोपासत आहेत.
मागील तीन वर्षांपासून ठाण्यात वास्तव्यास असलेल्या सायलीच्या कुटुंबात आई, आजी आणि धाकटा भाऊ आहेत. आईने नोकरी सोडली असून ती आता गृहिणी आहे. घरात जरी सायली मोठी आणि एकुलती मुलगी असली, तरी लहानपणापासूनच ती भावंडासोबत वाढली आहे. त्यामुळे, बालपणापासूनच तिला बाईक (दुचाकी)मध्ये विशेष रस होता. तिचे बाईकचे वेड दिवसेंदिवस वाढतच होते. तिचा मित्रपरिवार हादेखील बाईकवेडा असल्याने महाविद्यालयीन जीवनात असल्यापासूनच ते गटागटाने छोट्या मोठ्या बाईक राईड करीत असत. रायडिंगचा तो अनुभव खासच होता. याच अनुभवाच्या शिदोरीवर बाईकवरून देशाटन सुरू केल्याचे सायली सांगते.
सायलीने आतापर्यंत अनेक बाईक राईड्स केल्या आहेत. तसेच ‘सोलो साऊथ इंडिया बाईक एक्सपेडिशन’ पूर्ण केले आहे. तब्बल चार राज्यांत १९ दिवस, १९ठिकाणे पालथी घातली असून तब्बल ४ हजार, ५०० किमीचे अंतर तिने ‘अवेंजर क्रूझ २२०' या बाईकवरून पूर्ण केले आहे. अतिशय अवघड वाटा, खड्डयांचे नागमोडी वळणाचे रस्ते आणि घाट असे अनेक अडथळे पार करत सायली आपला छंद जोपासत आहे. मुळात कोणताही प्रवास अडथळ्यांशिवाय नसतो. पण, आपण जर पूर्ण तयारीशी कोणत्याही प्रसंगाला सामोरे गेलो, तर आपोआपच सर्व अडथळे दूर होतात. रायडिंगला जात असताना आव्हान कुठलेही असू देत, ते न टाळता स्वीकारण्यासाठी आपण नेहमीच सज्ज असायला हवे. ४ हजार, ५०० किलोमीटरचा प्रवास तर खूपच संस्मरणीय, आल्हाददायक आणि प्रेरणादायी होता. यातून ती हे शिकली की, थोडी तयारी आणि योग्य मानसिकतेने काम केले, तर कोणतेही आव्हान आपल्यासाठी फार मोठे नसते. अवघड रस्त्यावर ‘नेव्हिगेट’ करणे असो किंवा एकटीने करायचा प्रवास असो. आव्हान स्वीकारण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचे ती आत्मविश्वासाने सांगते.
बाईकवरून रायडिंगसाठी बाहेर पडताना एकटी असल्याची जाणीवच होत नाही. उत्तम नियोजन करूनही काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जातात, तर काही चुका होतात तेव्हा, घाबरून जाण्याऐवजी ती स्वतःला आठवण करून देते की, प्रत्येक आव्हान हे साहसाचा, किंबहुना धाडसाचाच एक भाग आहे, हे सर्व तुमच्या दृष्टिकोनाबद्दल आहे. तेव्हा शांत आणि केंद्रित राहिल्यास, बर्याच समस्यांना हाताळणे सोपे होते. त्यामुळे, स्वत:ची नोकरी सांभाळून बाईकवरून देशाटन करण्याचा शिरस्ता सायलीने अद्याप कायम जपला आहे. आता संपूर्ण जग बाईकवरून फिरून येण्याचे स्वप्न उराशी बाळगल्याचे ती सांगते.
अत्यंत मितभाषी असलेल्या सायली हिला बाईक रायडिंग सोबतच गायन आणि नृत्याचा छंद असून, ती या कलेतही पारंगत आहे. समाजसेवा करण्याचा तिचा मानस आहे. पण, सध्या त्यासाठी तिने काही ठोस योजना आखलेल्या नसल्याचे ती आवर्जून नमूद करते. याच सर्व कामाची तसेच धाडसाची पावती म्हणून आजवर तिला अनेक छोटे मोठे पुरस्कार मिळाले आहेत. पण, ‘माझ्यासाठी पुरस्कार मिळवणे म्हणजे एकप्रकारे स्वतः प्रेरित होणे आणि इतरांनाही प्रेरित करणे,’ असे ती मानते.
“रायडिंग म्हणजे स्वातंत्र्य, साहस आणि एक प्रकारची जबाबदारी आहे. सुरक्षित आणि सावधगिरीने राईड करा. नेहमी शिकत राहा, रस्त्यांचा आदर करा आणि दोन चाकांवर धावत असताना आपले स्वप्न कधीही थांबवू नका. प्रवासाचा आनंद लुटा आणि प्रत्येक राईड आपल्याला काहीतरी नवीन शिकवण देत असते हे लक्षात ठेवा,” असा सल्ला ती आताच्या युवा रायडर्सना देते.
मुळात ‘बाईक रायडिंग’ हा तसा रांगडा छंद असे म्हटले जाते. मात्र, सायली त्याला अपवाद आहे. अनेक संकटे आली तरी सायली मात्र डगमगली नाही. तिने आपला छंद सोडला नाही. ‘बाईक रायडिंग’चा आपला छंद जोपासणे तिने सोडलेले नाही. ज्या छंदातून आनंद मिळतो, जगण्याची नवी उमेद मिळते, तो छंद मुळात सोडावा तरी कशाला. अशा रायडिंगच्या छंदामुळे युवा मातृशक्तीसाठी प्रेरणा ठरलेल्या सायली हिला दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!