जगप्रसिद्ध वानरवैज्ञानिक आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिदूत डॉ. जेन गुडाल या मुंबई दौर्यावर आल्या होत्या. पर्यावरण, वन्यजीव आणि मानवता यांबाबत त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर यांनी त्यांच्यासोबत साधलेला हा संवाद...
पर्यावरण संवर्धनासाठी आपण नेमके काय करणे गरजेचे आहे?
मानव, प्राणी आणि पर्यावरण हे तिन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. महत्त्वाचे म्हणजे या तिन्ही घटकांचे संवर्धनदेखील एकमेकांवरच अवलंबून आहे. त्यामुळे या तिन्ही घटकांना एकमेकांपासून विभक्त करून चालणार नाही. आपण प्रत्येकाने आपल्याकडून पर्यावरणावर पडणार्या परिणामांची म्हणजेच ‘फूटप्रिंट’ची काळजी घेणे गरजेचे आहे. आमच्या ‘रुट्स अॅण्ड शूटस’ या उपक्रमामध्ये सहभागी असणारी मुलेही आम्हाला ‘इन्व्हार्यमेंटल फूटप्रिंट’ची जाणीव करून देत आहेत. मला जगभरात भेटणारे अनेक पालक सांगतात की, त्यांना त्यांची मुले ही वस्तूंचे रिसायकल करण्यासाठी भाग पाडतात. पर्यावरणासाठी हानिकारक असणार्या वस्तू विकत घेण्यापासून मज्जाव करतात. वनस्पतींवर आधारित आहारांवर आपण किती प्रमाणावर अवलंबून राहावे, याबाबतदेखील आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण, धान्य उगवण्यासाठी फार मोठ्या जागेचा वापर होताना दिसतो आहे. एकीकडे जगातील काही लोकांना धान्य मिळत नसताना दुसरीकडे धान्यामधील मोठा भाग हा जनावरांचे खाद्य म्हणून वापरण्यात येतो, ही धक्कादायक बाब आहे.
मुंबईसारख्या महानगरांमधील जैवविविधता टिकवणे का गरजेची आहे?
जैवविविधता ही आपल्या पर्यावरणातील वातावरण निरोगी ठेवते. मात्र, मोठ्या शहरांमध्ये पर्यावरण निरोगी ठेवणे, हे कठीण होऊन बसते. यामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे. का तर, झाडे किंवा पक्ष्यांचे कुंजारव हे आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्यासाठीदेखील महत्त्वाचे आहेत, हे सिद्ध झाले आहे. आपल्या लहान मुलांच्या सामाजिक जडणघडणीसाठीदेखील ही बाब गरजेची आहे. त्यामुळे आपल्याला जैवविविधतेची गरज आहे. शहरांमध्ये वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. कारण, जेव्हा आपण वृक्षारोपण करतो, तेव्हा त्याभोवती किटकांचा गोतावळा जमतो, फुलपाखरे त्याभोवती बागडू लागतात आणि पक्षीदेखील झाडांना घेराव घालतात. त्यामुळे शहरात निसर्गाला जोपासण्यासाठी किंवा पुन्हा त्याची निर्मिती करण्यासाठी आपण अधिकाधिक प्रयत्न करणे आवश्यक आहेत. मुंबईतील प्रवासादरम्यान महामार्गावरील भिंतींवर रेखाटलेली पशुपक्ष्यांची किंवा वनस्पतींची भित्तीचित्र मला भावली. ज्यामुळे लहान मुलांमध्ये जनजागृती होण्यास नक्की मदत मिळेल.
मुंबईतील मानव-बिबट्या सहजीवनाच्या उदाहरणामधून जगाने काय संदेश घ्यावा?
शहरी अधिवासातील बिबट्यांविषयी जाणून घेतल्यानंतर, मला आश्चर्य वाटले. शहरी अधिवासातदेखील बिबटे राहू शकतात, हे समजले. हे बिबटे भटके कुत्रे खातात, हे ऐकून काही लोक नाराज होतील. मात्र, हे बिबटे लहान मुलांना आपले लक्ष्य करीत नाहीत, हेदेखील समजले. गेल्या पाच वर्षांत लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या केवळ दोन घटना घडल्या आहेत, ज्या खूप थोडक्या आहेत. वन्यजीव आणि मानव हे दोघेही पर्यावरणाचे अविभाज्य भाग आहेत आणि दोघांनीही एकमेकांसोबत सहजीवन करणे हा एकमेव मार्ग आहे. नाहीतर, हे सर्व नष्ट होणे निश्चित आहे.
वन्यजीव संवर्धन क्षेत्रात येऊ इच्छिणार्या तरुण स्त्री संशोधकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
या क्षेत्रात येऊ इच्छिणार्या महिलांनी धैर्यवान असणे फार गरजेचे आहे. मी आशा बाळगते की, या क्षेत्रात येऊ इच्छिणार्या तरुण मुलींच्या आई या माझ्या आईसारख्या असाव्या. कारण, माझ्या आईने मला माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मोकळीक दिली होती. त्यामुळे मी पालकांना सांगू इच्छिते की, या क्षेत्रात येऊ इच्छिणार्या आपल्या मुलींना पाठिंबा द्या.
पर्यावरण आणि विकास यांवर आपले मत काय आहे?
विकासामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे, केवळ असे बोलून चालणार नाही. कोणत्या गोष्टींमुळे र्हास होत आहे, याची मांडणी करणे आवश्यक आहे. नाहीतर त्या विरोधाला अर्थ नाही.
‘रुटस् अॅण्ड शूटस’ हा उपक्रम नेमका काय आहे?
बालवर्ग ते महाविद्यालयीन वयोगटांतील मुलांनी पर्यावरण, संवर्धन आणि मानवतावादी समस्यांवर काम करण्यासाठी त्यांच्या एकत्रीकरणाकरिता राबविण्यात आलेला हा उपक्रम आहे. 140 हून अधिक देशांमध्ये हा उपक्रम सुरू असून आठ हजार गटांमध्ये एकूण दीड लाख मुले यामध्ये सहभागी आहेत. या माध्यमातून मुलांना त्यांचे स्थानिक लोकसमुदाय, प्राणी आणि पर्यावरणातील समस्या ओळखून त्यावर काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या समस्यांच्या निरसनाच्या गोष्टी आम्ही इतरांनादेखील सांगतो.उदा. अमेरिकेतील दोन मुलांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांना सांगितले की, आम्हाला रुटस् अॅण्ड शूटस् हा उपक्रम सुरू करायचा आहे. शिक्षकांनी मनाई केल्यानंतर त्या मुलांनी ध्यास घेतला. त्यांनी एक गाढव विकत घेतला. त्या गाढवावर गवत कापण्याचे यंत्र लावले. लोकांच्या बागेतील गवत कापून त्यांना पैसे मिळाले. शिवाय त्या गाढवाचे शेण खतनिर्मितीसाठी विकून त्यामाध्यमातूनही मुलांना पैसे मिळाले.