पंतप्रधान इंटर्नशिप योजना : नव्या संधींचा आशादीप

    21-Nov-2024
Total Views |

Pradhan Mantri Internship Scheme
 
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान इंटर्नशिप’ योजनेअंतर्गत देशातील प्रमुख व निवडक अशा ५०० कंपन्यांमध्ये नवोदित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून, विद्यार्थ्यांचाही या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो. तेव्हा देशातील नवयुवकांना प्रशिक्षित करुन त्यांना रोजगारक्षम करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या ‘पंतप्रधान इंटर्नशिप’ योजनेचा आढावा घेणारा हा लेख...
 
वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून नव्याने उत्तीर्ण झालेल्या पात्रताधारक उमेदवारांना नवागत म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेच्या संदर्भात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नमूद केल्यानुसार देशातील आर्थिक व्यवसाय क्षेत्रातील प्रमुख व प्रथितयश अशा ५०० कंपन्यांमध्ये योजनेच्या पहिल्या टप्प्यात ‘इंटर्नशिप योजना’ अमलात आणली जाणार आहे. योजनेचा मुख्य उद्देश या कंपन्यांना बरेचदा भासणारी प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता काही प्रमाणात कमी करणे व त्याचवेळी नव्याने उत्तीर्ण झालेल्या विविध विषय आणि क्षेत्रातील हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या प्रशिक्षणातून सुरुवातीची रोजगार संधी उपलब्ध करुन देणे, अशा दुहेरी स्वरुपाचा आहे.
 
योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच टप्प्यात अर्थमंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या प्राथमिक अभ्यासानुसार, या नव्या ‘इंटर्नशिप योजने’चा फायदा महानगरांपेक्षा तुलनेने मध्यम आकारातील म्हणजेच तृतीय स्तरीय शहरातील कंपन्यांना तुलनेने अधिक होऊ शकतो. अभ्यास अहवालात नमूद केल्यानुसार, अशा नागरी व शैक्षणिक-औद्योगिक विकासदृष्ट्या विकसित होणार्‍या शहरांमधील विद्यार्थी-उमेदवारांना शिक्षणानंतर कौशल्यप्राप्ती व त्याद्वारे रोजगार मिळण्यासाठी या योजनेचा लाभ निश्चितपणे होऊ शकतो.
 
केंद्र सरकारची ‘इंटर्नशिप योजना’ ही प्रामुख्याने युवक व नव्याने शैक्षणिक पात्रताधारकांसाठी असल्याने देशातील युवा आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील वस्तुस्थिती आणि आकडेवारीचा तपशील जाणून घेणे आवश्यक ठरते. यासंदर्भात उपलब्ध आकडेवारीनुसार, सध्या देशांतर्गत युवकांच्या एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्या ही १५ ते २९ या वयोगटातील आहे. सद्यस्थितीत या वयोगटातील निम्मी संख्या ही नव्याने शैक्षणिक पात्रताधारक व रोजगारक्षम आहे. त्यातही यातील बहुसंख्य विद्यार्थी-उमेदवार हे महानगरांच्या तुलनेने छोटी शहरे वा जिल्हा स्थाने अथवा औद्योगिकदृष्ट्या विकसित प्रदेशांतील रहिवासी आहेत. हेच विद्यार्थी नव्या पंतप्रधान ‘इंटर्नशिप-प्रशिक्षण योजने’च्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरु शकतात.
 
‘पंतप्रधान इंटर्नशिप’ योजनेचा थोडक्यात पण महत्त्वाचा तपशील म्हणजे, या योजनेअंतर्गत प्रमुख व निवडक अशा ५०० कंपन्यांमध्ये नवोदित विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाईल. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष असेल. या योजनेमागे सरकारचा मुख्य उद्देश शिक्षित नवयुवकांना प्रशिक्षित करुन रोजगारक्षम करणे आहे. यासाठी २१ ते २४ या वयोगटातील शालांत परीक्षा, तंत्रशिक्षण, पदवी-पदव्युत्तर, चार्टर्ड अकाऊंटन्सी असे शैक्षणिक पात्रताधारक व अल्प उत्पन्नधारक गटातील उमेदवार अर्ज करु शकतील.
 
वरील प्रशिक्षण कालावधीत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षणाच्या एक वर्ष कालावधीसाठी दरमहा पाच हजार रुपये पाठ्यवेतन देय असेल. यापैकी ४ हजार, ५०० रुपये सरकारतर्फे व ५०० रुपये संबंधित कंपनीतर्फे देण्यात येतील. याशिवाय वार्षिक सहा हजार रुपये अतिरिक्त खर्चापोटी देण्यात येतील. ‘पंतप्रधान इंटर्नशिप’ योजनेच्या पहिल्या व प्रायोगिक टप्प्यात २०२४ साली सुमारे १ लाख, २५ हजार विद्यार्थी-युवकांना समाविष्ट करुन घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. योजनेला अधिक लवचिक बनविण्यासाठी त्यामध्ये सहभागी होणार्‍या कंपन्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असणारा ‘सीएसआर’ निधी या योजनेसाठी वापरण्याचा व्यवहार्य पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या नव्या सवलतीचा लाभ आता संबंधित कंपन्या सहजपणे घेऊ शकतात.
 
‘पंतप्रधान इंटर्नशिप’ योजनेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनंतर त्यानुसार कौशल्य विकास, संबंधित व प्रत्यक्ष कामाचा सराव व काही प्रमाणात पाठ्यवेतन असे विविध लाभ हमखासपणे होणार आहेत. याशिवाय योजनेत प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांना मिळणारा अनुभव त्यांना संबंधित कंपनीच नव्हे, तर इतर उद्योग-व्यवसाय क्षेत्रात करिअर सुरु करण्यासाठी लाभप्रद ठरु शकते.
 
याशिवाय नव्याने विविध अभ्यासक्रमांत उत्तीर्ण झालेल्या व मध्यम आकारातील शहरांमधून येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये नोकरी-रोजगार व स्पर्धेच्या संदर्भात जी संकोच वा प्रसंगी संभ्रमाची भावना असते, त्यावर तोडगा म्हणून नवी ‘इंटर्नशिप प्रशिक्षण योजना’ फायदेशीर ठरु शकेल. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना रोजगारासाठी निवड-मुलाखतीचा सराव व निवड झाल्यावर प्रत्यक्ष कामाची व्यावहारिक माहिती व अनुभव मिळतो. याचा लाभ त्यांना पुढील मुलाखत व अन्यत्र निवडीसाठी होऊ शकतो. उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षण काळात उद्योग-व्यवसायाच्या प्रक्रियेपासून संगणकीय कार्यपद्धतीपर्यंतच्या विविध कार्यपद्धतींचा प्रत्यक्ष सराव मिळू शकतो.
 
तसे पाहता, प्रशिक्षणासाठी ‘इंटर्नशिप’ पद्धतीचा वापर आपल्याकडे नवीन नाही. त्याचा अवलंब मुख्यत: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून बहुदा सर्वच प्रमुख संस्था वा विद्यापीठ स्तरावर केला जातो. त्याद्वारे अशा प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यात काही आठवड्यांच्या माहिती व सरावासाठी उद्योग-व्यवसायात काम करणे आवश्यक ठरते. पदव्युत्तर वा तंत्रशिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रमात तर विद्यार्थ्यांना त्यांच्या या अल्पकालीन प्रशिक्षण कालावधीत माहितीशास्त्र-संगणक तंत्रज्ञान, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, मूलभूत व्यवस्थापन या क्षेत्राची मूलभूत माहिती देण्याचे महत्त्वपूर्ण काम होणार आहे.
 
कंपनी व्यवस्थापनांच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, कंपन्यांना त्यांच्या नव्या व वाढत्या व्यावसायिक गरजा लक्षात घेता, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता नेहमीच असते. विशेषत: अशा प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी कंपन्यांचे प्रयत्न सुरुच असतात. विविध अभ्यासक्रमांसह उत्तीर्ण होणार्‍या नव्या व पात्रताधारक उमेदवारांना कंपन्या प्रशिक्षणाच्या संधी देत असतात. प्रसंगी त्यासाठी अशा विद्यार्थ्यांसाठी पाठ्यवेतनापासून प्रशिक्षणापर्यंत तरतूद करतात. कंपन्यांच्या याच प्रयत्नांना आता ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’द्वारा मर्यादित स्वरुपात का होईना, पण पाठ्यवेतनासह सरकारी पुढाकार व प्रयत्नांसह प्रोत्साहन मिळणार आहे.
‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’ व या योजनेची अंमलबजावणी म्हणजे मूलत: २०२० सालच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा मोठा व महत्त्वपूर्ण टप्पा म्हणायला हवा. या धोरणांतर्गत केंद्र सरकारने कौशल्याधारित शिक्षणाद्वारे प्रशिक्षित युवावर्ग व उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा मोठा व महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्याच निर्णयाची नियोजनपूर्ण व वेळेत अंमलबजावणी यानिमित्ताने होत आहे, हे महत्त्वाचे.
 
जाणकारांच्या मते, प्रचलित परिस्थितीत शैक्षणिकदृष्ट्या विविध क्षेत्रांतील पात्रताधारक विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रता असून सुद्धा केवळ अनुभव नाही, या चाकोरीबद्ध मानसिकतेमुळे नोकरी- रोजगार मिळण्यास नेहमीचीच अडचण येते व नोकरीची सुरुवातच न झाल्याने, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेला अनुसरुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. तेव्हा, प्रचलित शिक्षण-रोजगार क्षेत्राशी असणार्‍या मर्यादांना काही प्रमाणात छेद देण्याचे कामसुद्धा ‘पंतप्रधान प्रशिक्षण योजने’द्वारा आता नव्याने होणार आहे.
दत्तात्रय आंबुलकर