सौदी अरबमध्ये यावर्षी एकूण २१४ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यात १०१ गुन्हेगार परदेशी होते. त्यात पाकिस्तान्यांची संख्या जास्त होती. विशेष म्हणजे जादूटोणा, करणी वगैरे केली, म्हणूनही काही लोकांना फाशी देण्यात आली. जादूटोणा केला म्हणून फाशी दिली हे आपल्या भारतीयांना न पटणारे! पण, २०२४ साली हे असे घडत आहे.
सौदी अरबमध्ये यावर्षी एकूण २१४ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यात १०१ गुन्हेगार परदेशी होते. त्यात पाकिस्तान्यांची संख्या जास्त होती. विशेष म्हणजे जादूटोणा, करणी वगैरे केली, म्हणूनही काही लोकांना फाशी देण्यात आली. जादूटोणा केला म्हणून फाशी दिली हे आपल्या भारतीयांना न पटणारे! पण, २०२४ साली हे असे घडत आहे.
२००७ साली मुस्तफा इब्राहिम यालाही फाशी देण्यात आली होती. फाशी का देण्यात आली, तर इब्राहिमच्या शेजार्याने सौदी पोलिसांकडे तक्रार केली की, “इब्राहिमने काळी जादू केली म्हणून माझी पत्नी मला सोडून गेली. इब्राहिम सैतानाला बोलवण्यासाठी मेणबत्ती पेटवतो, त्याच्या घरातून अनेक जडीबुटींचा वास येतो.” पोलिसांनी लागलीच इब्राहिमच्या घराची झाडाझडती घेतली. तिथे मेणबत्ती आणि काही सुगंधित फुलं आढळली. तसेच पोलिसांना इब्राहिमच्या बाथरूममधून कुराणाची प्रत सापडली. यावरून सौदी अरबच्या मुल्ला-मौलवी आणि प्रशासनाने एकमताने ठरवले की, कुराणाला बाथरूममध्ये ठेवले म्हणजे इब्राहिम सैतानाचा पुजारी असेल. तो नक्कीच जादूटोणा, काळी जादू करतो. या सर्व घटनेवरुन इब्राहिमला फाशीची शिक्षा दिली गेली.
त्यानंतर २००८ साली अलि हुसैन सिब्बत यालासुद्धा अशाचप्रकारे फाशीची सजा सुनावण्यात आली होती. सिब्बत हा मूळचा लेबेनॉनचा. तो मध्य पूर्वेतील एक सॅटेलाईट टीव्ही शो चालवायचा. ‘अ मिडल ईस्ट सायकिक हॉटलाईन’ असे त्या शोचे नाव होते. या टिव्ही शोमध्ये तो लोकांना भविष्य वर्तवून सल्ले द्यायचा. दहा लाखांपेक्षा जास्त मुस्लीम लोक हा शो पाहायचे. हा सिब्बत मुस्लिमांच्या ‘उमरा’ प्रथेअंतर्गत २००९ साली मदिना येथे गेला. त्याला पाहिल्याबरोबर सौदी अरबच्या पोलिसांना कळले की, हा तोच आहे जो टीव्हीवर भविष्य वर्तवून सल्ले देतो. सौदी अरबच नव्हे, तर जगभरातल्या मुस्लिमांचा विश्वास आहे की, भविष्य वर्तवणे, सल्ले देणे हे काम माणसाचे नाही. कारण, जे होते ते सगळे अल्लाच घडवतो. त्यामुळे सिब्बत लेाकांना भविष्य वर्तवून सल्ले देतो, म्हणजे तो अल्ला इस्लामच्या विरोधात आहे. तो काफिर आहे. काफिर ठरवून त्याला सौदीच्या पोलिसांनी पकडले आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. मात्र, त्यानंतर जग या शिक्षेवरोधात एकवटले आणि ही मृत्यूदंडाची शिक्षा मागे घेण्यात आली. हे असे केवळ सौदीमध्येच नाही.
नुकतेच पाकिस्तानमध्ये सियालकोट शहराच्या एका नाल्यात एक युवतीच्या शरीराच्या तुकड्यांनी भरलेले पोते सापडले. ही युवती होती झारा. चार वर्षांपूर्वी झाराचा निकाह कादिर अहमदसोबत झाला होता. अहमद झाराचे कोणतेही म्हणणे टाळत नसे. नोकरीनिमित्त तो सौदी अरबला गेला. अहमद घरी पैसे पाठवे. मात्र, ते पैसे झाराच्या नावाने तो पाठवत असे. या सगळ्यामुळे झाराच्या सासूला म्हणजे सुघरानाला वाटले की झाराने कादिर अहमदवर काळी जादू केली. त्यामुळेच तर अम्मीपेक्षा आणि आपा यास्मिनपेक्षा अहमदला बिबी प्यारी आहे. झारा अहमदवर काळी जादू करते, या संशयाने सुघराना, यास्मिन आणि अन्य नातेवाईकांनी मिळून झाराचे तुकडे केले. भयंकर!!! पण, पाकिस्तानमध्ये या असल्या अंधश्रद्धा सामान्य आहेत. बहुसंख्य पाकिस्तान्यांना आजही वाटते की, माजी पंतप्रधान इमरान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बिबी उर्फ पिंकी पीरनी या जादूटोण्यात माहिर आहे. त्यांच्या जादूमुळेच इमरान खान पंतप्रधान झाले. कारण, बुशरा बीबीकडे दोन जिन्न आहेत. यावर कडी करणारी बाब तर इराणमध्ये सध्या सुरू आहे. इराणच्या ‘अल-अरबी अल-जदीद’ वर्तमानपत्रानुसार इराणमध्ये युद्धग्रस्त परिस्थिती आहे. कुठून गोळी लागेल याचा नेम नाही.
अशा परिस्थितीमध्ये आपल्या दिशेने येत असलेली बंदुकीची गोळी दुसरीकडे वळवावी म्हणून मंतरलेला तावीज मिळवण्यासाठी इराणमध्ये अनेक लोक भक्कम रक्कम मोजत आहेत. काय म्हणावे? या अनुषंगाने आपल्या देशात अनेक दर्गे आहेत, बाबा आहेत. लोक तिथे जातात. अमुक एक दर्ग्यातल्या बाबाकडून मंतरलेला ताविज आणि पाणी घेतले की, जादू होऊन बरे वाटते, असे हे लोक सांगतात. या अनुषंगाने वाटते की, ‘नबी का देश’ म्हणून भारतातील अनेक मुसलमानांना सौदी अरेबिया हा आदर्श आत्मिय देश वाटतो. मग, जादूटोणा वगैरेविरूद्ध फाशी देण्याचा सौदी अरेबियाचा कायदा त्यांच्या मते आदर्श असेल का? असो. तूर्तास नव्हे, नेहमीच गड्या आपला देश भला!