साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबरोबरच अवयवदानासारख्या दुर्लक्षित विषयावर कृतिशील जनजागृती करणार्या आणि त्या माध्यमातून समाजात आरोग्याचा दीप तेवत ठेवणार्या आरती देवगांवकर यांच्याविषयी...
मरणोत्तर अवयवदान’ या संकल्पनेबाबत समाजात जे गैरसमज आहेत, त्याविषयी जनजागृती करणारी ही महिला, साहित्य क्षेत्रातदेखील तितकाच मुक्त संचार करते. आहे. पुण्यातील साहित्य, संस्कृती आणि कलाजगतात रमलेल्या आरती देवगांवकर यांची अवयवदान आणि किडनी आजाराने झगडणार्यांच्या वेदना कमी करण्यासाठीची तळमळ त्यांच्या संवेदनशील मनाचीही साक्ष देते.
महिलेच्या स्वभावातील नैसर्गिक सद्गुण अर्थात मायेची पाखर, मनाचा हळवेपणा, अनुभवातून बळकट होणार्या समृद्ध जाणिवा आणि प्रसंगी कठोरपणा. असे सर्व गुण अंगी बाळगणार्या आरती यांचा हा अनोखा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी असाच. मात्र, आपल्या सत्कर्मातून मानवी मनावर त्या घालीत असलेली फुंकर, ही कोणत्याही औषधांपेक्षा रामबाण उपाय आहे, यात संदेह नाही.
आरती देवगांवकर हे पुण्यातील साहित्य आणि सामाजिक आरोग्य क्षेत्रात नावाजलेले नाव. त्यांचे शिक्षण ‘बी.कॉम. डीटीएल.’ तथापि, जीवनानुभवातून मिळालेल्या शिक्षणातून आरती यांनी केलेली कामगिरी अचंबित करणारी.
लेखिका, अनुवादिका, संपादिका, मुद्रितशोधक असलेल्या आरती पुण्यातील ‘किडनी सपोर्ट ग्रुप’च्या सचिवदेखील आहेत. अवयवदानासाठी त्या सातत्याने पुढाकार घेत असतात. ‘ज्ञान प्रबोधिनी’ संस्थेशी निगडित असलेल्या ‘समतोल’ द्वैमासिकाच्या त्या कार्यकारी संपादक आहेत. याच प्रबोधिनीच्या ‘संवादिनी’ गटातर्फे विविध वयोगटातील मुलांसाठी होणार्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांची ही वाटचाल साधारण १९९९ सालापासून सुरू झाली. ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळा’च्या माजी कार्यकारिणी सदस्य राहिलेल्या आरती देवगांवकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या दुसर्या आणि तिसर्या भागावर आधारित मराठी पुस्तकांचे, तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या पुस्तकाचे मुद्रितशोधन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचे शब्दांकनदेखील केले आहे. शिवाय ‘साहित्य सूची’ मासिक व ‘रसिक आंतरभारती प्रकाशन’ येथे नियमित लेखनासह सहसंपादक म्हणूनही कार्य केले आहे. संपादन कार्यात निपुण असलेल्या आरती यांनी सुबोध भावे यांचे ‘घेई छंद’ व ‘हार्मोनियम-पेटीची रंजक कहाणी’, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘वेचक वेधक’, ‘संपूर्ण शारदा’ (प्रतिभा रानडे, वीणा गवाणकर, उमा कुलकर्णी) आणि इतरही अनेक पुस्तकांच्या संपादनात सहभाग घेतला आहे.
गेल्या सहा वर्षांपासून त्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. डॉ. इंद्रवदन दोडिया यांच्या आत्मचरित्राचे शब्दांकनही त्यांनी केले आहे. ‘यशस्वी व्हा, अक्षयकुमार स्टाईलने’ हा चित्रपट, अभिनेता अक्षयकुमार यांच्यावरील पुस्तक आणि वित्तीय व्यवस्थापनावरील ‘सर्वांची नजर तुमच्या पाकिटावर आहे, तुमची आहे का’ यांसारख्या पुस्तकांचे अनुवाददेखील केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या ‘संघसमर्पित काकाजी’ या विदर्भातील कै. शंकरलालजी खंडेलवाल यांच्यावरील चरित्रग्रंथाचे दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या ग्रंथाला आचार्य किशोरजी व्यास अर्थात स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची प्रस्तावना लाभली आहे. ‘हिंदी विवेक’कडून प्रकाशित या पुस्तकाचा हिंदीमध्ये अनुवादही झालेला असून, तो भारतभरात पोहोचला. शिवाय कै. अॅड. त्र्यंबकराव देशपांडे, बीड जिल्हा संघचालक यांचे चरित्र, ‘बेस्ट सेलर’ ठरलेले पुस्तक ‘थिंक अॅण्ड ग्रो रिच’ या पुस्तकाचा अनुवादसुद्धा त्यांनी केला आहे. या पुस्तकाला ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा २०२२ सालासाठीचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा ‘स. ह. मोडक स्मृती पुरस्कार’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने’ या संघावरील मूळ लेखक सुनीलजी आंबेकर यांच्या पुस्तकाचा अनुवाद, अशी कितीतरी भरीव कामगिरी आरती यांनी केली आहे. त्यांच्या या मौलिक कामगिरीची दखल अर्थात अनेक संस्थांनी घेतली आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये ‘करम प्रतिष्ठान’चा ‘काव्यतेज पुरस्कार’, ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ संस्थे’तर्फे कवितेसाठी ‘कवी कालिदास स्पर्धे’त पुरस्कार, वक्तृत्वासाठी ‘मुक्त व्यासपीठ’ स्पर्धेसाठीचा पुरस्कार’, लेखनासाठी ‘साहित्य गौरव पुरस्कार’, ‘कृतिशील संवादिनी पुरस्कार’ अशी भली मोठी यादी त्यांच्या गौरवाची आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आरती यांनी २००० सालापासून ‘किडनी सपोर्ट ग्रुप’च्या माध्यमातून ‘मरणोत्तर अवयवदान’ या संकल्पनेच्या प्रसारासाठी व किडनी आजाराच्या रुग्णांसाठी स्वतःला या कार्यात झोकून दिले. यासाठी त्या देशाच्या कानाकोपर्यात जनजागृतीपर व्याखाने देतात. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधून त्यांचे मन हलके होईल, यासाठी त्या प्रयत्नशील असतात. वर्षातून एकदा किडनी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, डायलिसिस कर्मचारी या सर्वांसाठी मनोरंजनपर कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. या कार्यक्रमात शरद उपाध्ये यांचे ‘राशीचक्र’, प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वर्हाड निघालंय लंडनला’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘इंदिरा’ सारखी नाटके ‘दरबार ऑर्केस्ट्रा’ असे कार्यक्रम त्यांनी घडवून आणले. या रूग्णांची काळजी, मनातील भीती दूर करणे हाच यामागील शुद्ध हेतू. विशेष म्हणजे, अवयवदानाची आज समाजात खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पण, अवयवदाते अतिशयच कमी असतात, अशी खंतदेखील आरती यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
“जिवंतपणी अथवा मेंदू मृतावस्थेत असल्यास अवयवदान करता येते. मात्र, समाजात याविषयी अजूनही म्हणावी तितकी जागृती झालेली नाही. या दोन प्रकारांतील तसेच देहदान आणि अवयवदान यातील फरकही अनेकांना ठावूक नसतो. त्यामुळे हा फरक समजावून देण्यासाठी जिथे जिथे संधी मिळेल, तिथे तिथे आम्ही चर्चा करीत असतो,” असे आरती आवर्जून सांगतात.
डायलिसिस ही अतिशय खर्चिक आणि शारीरिक, आर्थिक, मानसिक अशा सगळ्याच पातळ्यांवर दमावणारी प्रक्रिया. लोकांना कमी किमतीमध्ये डायलिसिस करता यावे, यासाठी काही संघटनांनी पुढे येऊन ‘धर्मादाय डायलिसिस केंद्र’ सुरु केली आहेत. अशीच आणखी मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे, असे आरती यांना वाटते. त्यापेक्षा सर्वाधिक गरज आहेे ती अवयवांची. अवयवांची आवश्यकता असलेले रुग्ण आणि अज्ञानामुळे, कौटुंबिक दबावामुळे वाया जाणारे अवयव, यांच्यातील दरी कमी करण्यासाठी खूप काम करावे लागणार आहे. समाजातील सुजाण लोकांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांना वाटते. याबाबतची आरती यांची तळमळ त्यांच्या कोरोना काळात बंद केलेल्या ‘चॅरिटेबल डायलिसिस केंद्र’ सुरू करण्याच्या प्रयत्नातून अधोरेखित होते. असे कालसुसंगत कार्य करणार्या आरती यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून खूप शुभेच्छा!
अतुल तांदळीकर