विदर्भातल्या हिंदूंचा संकल्प

शतप्रतिशत मतदान!!!

    20-Nov-2024
Total Views |
Vidarbha

विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील नागरिकांशी संपर्क साधण्याचा योग आला. चंद्रपूर, नागपूर, अमरावती अशा तीन जिल्ह्यांतील विविध तालुक्यांतील नागरिकांना भेटले. खोटे ‘नॅरेटिव्ह’, फुटीरतावादी परिस्थिती तयार करणे आणि लोकांना भ्रमित करणे, असे उद्योग तिथेही राजरोसपणे सुरु आहेत. त्यातही काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांच्या मतदारसंघांमध्ये तर काय विचारता सोय नाही. या पार्श्वभूमीवर विदर्भातील हिंदूंचे मत काय, याचा मागोवा ...

“आमाला लाडकी बहीनचे पेसे नाय मिडाल. आमी गोंडी हाव म्हणून आमला पेसे नाय मिडाल,” ब्रह्मपुरी तालुका चंद्रपूरच्या डोंगरगावच्या त्या महिला सांगत होत्या. चंद्रपूरच्या दाट जंगलात लपलेले खेडे. गोंड समाजाची वस्ती. वनवासीबहुल असलेल्या या छोट्याशा खेड्यात ‘सजग रहो अभियाना’दरम्यान संवाद साधत असताना त्या आयाबाया म्हणत होत्या. मी म्हणाले, “लाडकी बहीण’ आणि सगळ्याच योजना जातपात बघून नाही मिळत. त्या योजना ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत, म्हणजे ज्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड जोडलेले आहे, त्यांना मिळतातच मिळतात.” यावर त्या गावातली एक आशासेविका म्हणाली, “हाव म्हणजे केवायसी केलेली पाहिजे.” यावर ‘योजनांचा लाभ मिळाला नाही’ म्हणणार्‍या त्या आयाबाया म्हणाल्या, “हाव तेच तर सांगतू, आमच्या केवायसीवर मोदीन सईच नाय केली.” त्यांचे म्हणणे होते की, त्या गोंड आदिवासी समाजाच्या होत्या; म्हणून मोदींनी त्यांना योजनेचा लाभ घेऊ दिला नव्हता. बापरे! किती गैरसमज आणि अज्ञान!! त्यांना म्हणाले, “अरे, पंतप्रधान मोदी दिल्लीतून तुमच्या कागदपत्रांवर सही करायला येणार का? गावात पंतप्रधान मोदींच्या योजनेतून समाजाला घरे मिळाली, शौचालय मिळाले, इतकेच काय, ‘उज्ज्वला योजने’अंतर्गत गॅसपण मिळाला. इतके सगळे मोदी म्हणजे भाजप सरकारने दिले.” यावर त्या चेहर्‍यावर कष्ट उतरलेल्या अतिशय कष्टकरी महिलांचे म्हणणे, “ते सगडं मिडालं आमच्या विजूभैयाने मोदींशी भांडण केलं आणि मग मोदीनं घर, संडास अन् गॅस दिलं. विजूभैया हाव म्हणून ते मिडालं. नाय तर आमच्या गोंडी समाजला काय दिलं नसतं.” विजूभैया कोण तर, काँग्रेसचे इथले वर्षोनुवर्षांचे आमदार विजय वडेट्टीवार. भोळ्या-भाबड्या लोकांना त्यांनी काय काय सांगून ठेवलेले. अर्थात, त्यानंतर त्या गावातल्या महिलांशी यासंदर्भात विशेष संवाद साधला. काय खरे, काय खोटे हे सोप्या शब्दांत पटवून दिले. यावर त्यांचे म्हणणे, “आम्ही तर गावाच्या, जंगलाच्या बाहेर जात नाय. जंगलाबाहेरचे लोक जे सांगणार त्यावर विश्वास ठेवणार.”
याच ब्रह्मपुरी मतदारसंघामध्ये सभा घेताना खेड्यातली एक महिला म्हणाली, “लाडक्या बहिणीचं काय कौतुक? महागाई किती वाढली अन् दीड हजारांत काय घर चालतं का? विजबिल किती येतं, ते कुठून भरणार? काही वर्षांपूर्वी विजबिल कमी यायचे, आता जास्त येते.” पण, गावाचे एकंदरीत निरीक्षण केल्यावर लक्षात आले होते की, ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत घर आणि शौचालये मिळण्यापूर्वी या गावातली घरे छोटी-छोटी कौलारू होती. घर कसेबसे उजळवणारे जेमतेम एक-दोन बल्ब. गावाची उपजीविका शेतीवरच. पण, जशी ‘पंतप्रधान आवास’ योजनेअंतर्गत घरे मिळाली, भाजप सरकारच्या विविध योजनांतर्गत लाभ मिळाले, तसतसे घराघरांत पंखे, टीव्ही आणि अगदी फ्रीजसुद्धा दिसू लागले. त्यामुळे विजबिल साहजिकच वाढले होते. पण, या सत्य वास्तवाबद्दल या महिलांनी विचारच केला नव्हता. त्यांच्यासमोर हे वास्तव आणल्यावर आयाबाया शांत झाल्या. मात्र, त्या गावातील एक महिला मात्र म्हणाली, “असं कसं, तरी पण दीड हजार रुपये देऊन आमचं काय घर चालणार हाव?” त्या महिलेला विचारले, “तुम्ही काय करता?” तिने सांगितले कोणत्या तरी शाळेत ती सहयोगी कर्मचारी होती. महिन्याचे ३० दिवस भरल्यावर तिला २ हजार, ५०० रुपये पगार मिळत होता. तिला म्हणाले, “बाई, ३० दिवस कष्ट करून तुला २ हजार, ५०० मिळतात आणि सरकारकडून तुला प्रेमाने न मागता, न कष्ट करता १ हजार, ५०० मिळतात. यात काही फरक आहे की नाही?” तशी ती महिला गप्प बसली. मात्र, सभेनंतर स्थानिक लोक म्हणाले, “इथल्या आशासेविका आणि संबंधित यंत्रणेचे प्रमुख म्हणून एक मुस्लीम व्यक्ती आहे. तालुक्यात आणि पंचक्रोशीत आशा सेविका आणि योजनांसंदर्भात काम करण्यासाठी मुस्लीम महिलांची नियुक्ती मोठ्या प्रमाणावर केली जाते.” अर्थात, जिथे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते, आमदार असतील, तिथे यापेक्षा वेगळे वास्तव काय असणार म्हणा!

असो. या मतदारसंघ क्षेत्रात ठिकठिकाणी बिरसा मुंडांची जयंती साजरी होत होती. मीसुद्धा जयंतीनिमित्त आयोजित चार कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. एका कार्यक्रमामध्ये जायचे ठरले. आयोजकांपैकी नुकतेच ‘समरसते’चे कार्यकर्ते झालेले एक काका मला कार्यक्रमामध्ये नेणार होते. ते म्हणू लागले, “दीदी, तिथे भगवान बिरसा मुंडांच्या चरित्रावर बोला. ते लोक काँग्रेसचा प्रचार करतील. बोलतील, तुम्ही काही बोलू नका. ते लोक ऐकणार नाहीत.” मी म्हटले, “असे कसे? खोटे बोलतील, तर ते ऐकून घेण्यासाठी का तिथे जायचे? तसेच, भगवान बिरसा मुंडांची जयंती आहे, की काँग्रेसच्या प्रचाराची सभा?” तेव्हा ते काका म्हणाले, “सगळे तिथे तेच आहेत. त्यांच्याच घरच्या आयाबाया आहेत. विजूभाऊ गोंडी समाजाला वेगळे समाजकेंद्र देणार, असे बोलले आहेत. त्यामुळे सगळे एकत्र झाले आहेत.” ते बोलत होते. मनात आले, चला, काँग्रेसची समाजाच्या आडूनची प्रचारसभा तरी पाहू. तिथे गेले, तर बाहेरच रावणाची प्रतिमा! ‘रावण पूर्वज आणि पूजनीय’ अशा प्रकारचे वातावरण. सभागृहात गेले, तर ६०च्या आसपास श्रोते. त्यात आयाबाया जास्त. आम्ही मुंबईहून आलो आणि आम्ही त्यांना सांगितले होते की, “आम्हीही आदिवासी समाजाच्या आहोत.” म्हणून तिथल्या मंचावरच्या लोकांनी सन्मानाने मंचावर बोलावले. आजूबाजूला काँग्रेस आणि डाव्या चळवळीचे लोक बसलेले. भाजप कसा आदिवासींविरोधात आहे आणि इंदिरा गांधींनी कसे आदिवासींना जमिनी दिल्या, आता गोंडी समाजाने पुन्हा काँग्रेसला का जिंकून द्यायचे, यांवर या सगळ्यांनी भाषणे केली. त्यात मनुबिनुची निंदा करणे, ब्राह्मणांची टक्केवारी काढणे, आदिवासी आणि मागासवर्गीय, त्यांतही नवबौद्ध समाज कसा मूलनिवासी आहे आणि त्याने इंग्रजांना उलथून टाकले, तसे या सरकारलापण उलथून टाकावे, हे सरकार आपल्याला प्रतिनिधित्व देत नाही, असा सगळा ब्रेनवॉशिंगचा अपप्रचार सुरू होते. अर्थात, हे सगळे असत्यच. मग त्यांतल्या एकाने मनोगत व्यक्त करायला सांगितले. ‘जय सेवा भगवान बिरसा मुंडा की जय’ म्हणून मी म्हणाले, “गोंडी आदिवासी समाज आज आपण भगवान बिरसा मुंडांची जयंती साजरी करतो. आपल्या सगळ्यांसाठी त्यातही समोर जमलेल्या गोंडी भगिनींसाठी अभिमानाचा क्षण आहे की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती झाली. आमच्या संथाल आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या आणि तेली म्हणजे बहुजन समाजाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. इतकेच नाही, तर ज्यांच्या समाजाची लोकसंख्या कमी आहे, अशा ब्राह्मण समाजाची व्यक्ती म्हणजे तुमच्या विदर्भातले देवाभाऊपण मुख्यमंत्री झाले. जातपात न पाहता, महाराष्ट्रात आणि देशात सत्ता सुरू आहे. हे सगळे संविधानामुळेच! तसेही संविधान कुणीही बदलू शकत नाही. भाजप काय, काँग्रेसपण एकहाती सत्तेत आली, तरी संविधान बदलू शकत नाही. कारण, आपल्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांसाठी संविधान लिहिले. ते हुशार होते. महान होते. संविधानातले आरक्षण कुणी बदलू नये, यासाठी त्यांनी चांगले कायदे करून ठेवले आहेत.” यावर गोंडी समाजासोबत आलेले नवबौद्ध समाजाचे मंचावर आणि समोर बसलेले सगळे खुश होऊन टाळ्या वाजवू लागले. तिथल्या कार्यकर्त्या महिला एकत्र आल्या आणि म्हणू लागल्या, “हाव ना आमची दीदी मुर्मू राष्ट्रपती झाली. पाली भाषेला राजभाषा दर्जा मिळाला. चांगल झालं.” मंचावर बसलेले ते काही लोक अतिशय खुनशीपणे माझ्याकडे पाहत होते. पण, चरफडण्याव्यतिरिक्त ते काहीही करू शकत नव्हते. कारण, तिथे उपस्थित असलेल्या गोंडी समाजाने आणि नवबौद्ध समाजानेही माझे म्हणणे मान्य केले होते, तर हे वास्तव केवळ विदर्भातील एका मतदारसंघातले. पण, प्रातिनिधिक स्वरुपात सगळीकडे हे असेच सुरू आहे.
नागपूरमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत आमदार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे बौद्ध धर्मीयांसाठी नागपूर म्हणजे तीर्थक्षेत्रच! पण, या भूमीत समाजाला मनुची भीती दाखवलेली. ‘भाजप सत्तेत आला, तर आरक्षण घालवणार, संविधान हटवणार,’ असे सांगितलेले. समाजात सवर्णांबद्दल रोष- संताप निर्माण व्हावा, असे मुद्दाम वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केलेला. इथेही ठिकठिकाणी बौद्ध समाजबांधवांना भेटलो. “बाबासाहेब म्हणालेले, काँग्रेस जळके घर आहे. याचा विसर समाजाला पडला का?” असे विचारल्यावर इथले लोक वरवर तरी शांत बसताना दिसले. लंडनचे घर, इंदू मिलची जमीन असू दे, की पाली भाषेला राजभाषेचा दर्जा असू दे, याबाबत वाच्यता केल्यावर या सगळ्या समाज बांधवाच्या चेहर्‍यावरची रेष हलली. मुंबई आणि भंडारामधून बाबासाहेबांना त्यांनीच पराभूत केले, असे ते म्हणू लागले. “बाबासाहेबांना ‘भारतरत्न’पण दिला नाय त्यांनी,” असेही त्यांचे म्हणणे. समाजाच्या काही जुन्याजाणत्या वयोवृद्धांनी काँग्रेसने बाबासाहेबांना कसे छळले, याचे दाखले दिले. त्यांना विचारले, “तरीही तुमच्या इथे तेच आहेत, तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून.” यावर ते म्हणाले, “जो आमच्याकडे येतो, आमच्याशी बोलतो, तो आमचा. आता तुम्ही आलात, बोललात, पटलं तुमचं म्हणणं. तसंपण कोरोना काळात संघातल्या लोकांनी आम्हाला आणि विहारांना भंतेजींना खूप सहकार्य केलं. आम्ही ते लक्षात ठेवले आहे.”

नवबौद्ध समाजाचे असे, तर विदर्भातील मुसलमानांचे वास्तवही निराळेच! विदर्भातील गावखेड्यांमधला मुसलमान हिंदूंच्या खिजगणतीत नाहीत. त्यामुळे सभा म्हटली की, गावातल्या सगळ्या हिंदूंसोबत मुस्लीमही सभेला उपस्थित होते. मात्र, गावातले सगळे चतुर्थ श्रेणीचे काम, फळवाले, भाजीवाले, पंक्चरवाले, रिक्षावाले, मोबाईलसंबंधित काम असू दे, की अशीच संपर्कक्षेत्रातील कामे असू देत, हळूहळू ही सगळी कामे मुस्लीम समाजाकडे हस्तांतरित झाली आहेत. तिथला हिंदू आणि बौद्ध भूमिपुत्र या सगळ्या व्यवसायांतून हद्दपार होत आहे.

तसेच, विदर्भातील या प्रवासात अनेक गावे अशी पाहिली की, जिथल्या मागासवर्गीय समाजाचे झपाट्याने धर्मांतरण होत आहे. गावागावांत चर्च उभे राहिले आहेत. हे चर्च बांधणारेही ‘मोहब्बत के दुकानवाल्यां’च्या पक्षातलेच! थोडक्यात, विदर्भात सत्तेसाठी खोटे ‘नॅरेटिव्ह’ आणि चहुबाजूंनी व्यवस्थित फुटीरतेची पेरणी केली गेली आहे. हे पाहून वाटते की, ‘व्होट जिहाद’सोबतच खोट्या ‘नॅरेटिव्ह’चा सामना विदर्भवासीय करणार आहेत.

तरीही, या पार्श्वभूमीवर एक वास्तव स्वीकारायलाच हवे की, ‘बटेंगे तो कटेंगे’ हे विदर्भातील हिंदूंनी अगदी मनावर घेतलेले. शहर म्हणू नका, गाव म्हणू नका, खेडे म्हणू नका, की वस्ती म्हणू नका, यावेळी १०० टक्के मतदान करायचेच; या जिद्दीने प्रत्येक हिंदू पेटून उठला आहे. विदर्भवासीयांच्या अंतरंगात आता केवळ १०० टक्के मतदानाचा संकल्प आहे.

९५९४९६९६३८