वैयक्तिक दु:खाचा बाऊ न करता समोर आलेल्या परिस्थितीशी समन्वय, संघर्ष करत स्वत:सोबतच समाजहित साधणार्या प्रा. सुरेखा किनगावकर यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख.
सुरेखा किनगावकर हे नांदेड शहरातले एक सुपरिचित व्यक्तिमत्त्व. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’मध्ये अनेक नामांकित कार्यकर्ता आणि पदाधिकार्यांचे पालक म्हणून जबाबदारी स्वीकारण्याचे भाग्य त्यांना लाभले. नांदेडच्या एका महाविद्यालयाच्या प्राध्यापक तसेच ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे अगदी ‘महाराष्ट्र प्रमुख’ म्हणूनही त्यांनी पद भूषविले आहे. त्या नांदेडच्या ‘भाग्यलक्ष्मी बँके’च्या संचालिकाही आहेत. महिलांनी सर्वार्थाने सक्षम व्हावे, यासाठी त्या कार्यरत आहेत.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची इच्छा त्यांना होतीच. पण, त्या एका घटनेने ती इच्छा तीव्र झाली. एका कष्टकरी वस्तीमध्ये त्यांना एक अनुभव आला. आया-बाया दिवसाच्या १८-१८ तास काम करायच्या. तरीही दारिद्—यामुळे खाण्यापिण्याची आबाळ होतीच. सुरेखा यांनी संघटनेच्या वतीने या वस्तीतील महिलांसाठी रक्त तपासणी शिबीर आयोजित केले. वस्तीतल्या महिलांनी गर्दीही केली. पण, काही महिलाच रक्त तपासणीसाठी पुढे आल्या. बाकी महिलांनी रक्त तपासणीसाठी नकार दिला. का? तर बायकांचे म्हणणे “गुराढोरांपेक्षा हालहाल आहेत आयुष्याचे. हे सगळ सहन करण्यासाठी आम्ही चोरून दारू पितो. आमचं रगात तपासलं तर त्यात ते येईल.” हे सर्व ऐकून सुरेखा यांना वाटले, इतके दु:ख, असे जगणे, इतकी निराशा? या महिलांच्या जीवनात आशादायी असे काही तरी घडले पाहिजे, असे त्यांनी ठरवले. त्यानंतर सुरेखा या संघटनेच्या मदतीने महिलांसाठी काम करू लागल्या.
सुरेखा किनगावकर पूर्वाश्रमीच्या सुरेखा पद्माकर देशपांडे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन येथील पद्माकर देशपांडे आणि सुमन यांना तीन अपत्ये, त्यापैकी एक सुरेखा. पद्माकर हे डॉक्टर, तर सुमन गृहिणी. सगळे सुरळीत सुरू होते. पण, सुरेखा इयत्ता सातवीत असताना सुमन यांना स्तनांचा कर्करोग झाला आणि घरातली परिस्थितीच पालटली. त्यावेळी सुरेखा यांचे वय ते काय ११ वर्षे. सुमनबाईंची शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्यांची तब्येत इतकी खालावली की, त्यांना अंथरूणावर राहावे लागले. त्यामुळे भावंडांसह संपूर्ण घरची जबाबदारी सुरेखा यांच्यावर आली. लहान वयात सुरेखा यांनी ती जबाबदारी निभावली. बालवयातच लेकीवर घरची जबाबदारी पडली याचे सुमनबाईंना वाईट वाटे, पण पर्याय नव्हता.
८०चे ते दशक होते. मराठवाड्यात मुलींची लग्न लवकर करण्याचा प्रघात होता. त्यावेळी सुरेखा अकरावीला असतील आणि त्यांना एक चांगले स्थळ चालून आले. मात्र, अंथरूणात असलेल्या सुमनबाई म्हणाल्या, “माझ्या लेकीचे शिक्षण पूर्ण होऊ द्या. तीचं इतक्यात लग्न नको.” सुरेखा यांनी उच्चशिक्षण घ्यावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. पुढे सुरेखा यांना वैद्यकीय शाखेत छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेशही मिळाला. मात्र, घरची आणि लहान भावंडांची जबाबदारी टाकून जायचे नाही, असा निर्णय त्यांनी घेतला. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना त्या परिस्थितीला शरण जायचे नाही, तर त्या परिस्थितीतून सर्वोत्तम पर्याय निर्माण करायचा, हे संस्कार याच कठीण परिस्थितीतून त्यांना मिळाले असावेत.
या सगळ्या काळात सुरेखा यांना वाचनाचा छंद लागला. ‘शिवचरित्र’, ‘मृत्युंजय’ सारख्या पुस्तकांनी त्यांच्या मनाला उभारी आली. त्याचकाळात त्यांची एक चुलत बहीण अभाविपची कार्यकर्ता होती. तिच्या संपर्कातून एका ‘अभाविप’च्या कार्यकर्त्याशी सुरेखा यांचा संपर्क झाला. पुढे ती ओळख सुरेखा विसरून गेल्या. याचकाळात आईचे निधन झाले.
सुरेखा यांच्या आईच्या निधनानंतर ‘अभाविप’कडून एक शोकसंदेश स्वरूपाचे पत्र आले. लहान भावंडांना आणि वडिलांना वाईट वाटेल, म्हणून अगदी आईच्या मृत्यूनंतरही त्यांनी स्वत:ला आवरले होते. मात्र, हे पत्र वाचून त्या खूप रडल्या. शांत झाल्यावर त्यांना वाटले, अरे आपण तर या ‘अभाविप’चे कार्यकर्ताही नाही. मात्र, तरीदेखील हे सगळे आपल्या दु:खात सामील आहेत. सहकार्य करण्यास तयार आहेत. ‘अभाविप’शी त्यांचे ऋणानुबंध असे जुळले.
पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांचा विवाह अरूण किनगावकर यांच्याशी झाला. सासरचे कुटुंब हे संघाशी तसेच वीर सावरकरांशी संबंधित असल्यामुळे घरात धर्म, देश आणि समाज याबद्दल कमालीची कार्यप्रविणता होती. ते संस्कार सुरेखा यांच्यावरही झाले. पुढे अरूण आणि सुरेखा यांना दोन अपत्ये झाली. सुरेखा संसारात गुंतल्या. मात्र, अरूण सुरेखांना म्हणाले, “तू पुढचे शिक्षण पूर्ण कर.” सुरेखा यांना आईचे शब्द आठवले. माझ्या लेकीला शिकायचे आहे. मग काय? सुरेखा यांनी पदव्युत्तर शिक्षण, बी.एड, डिप्लोमा ‘इन ह्युमन राईट्स’, ‘डिप्लोमा इन वुमेन्स इम्पॉवरमेंट’, ‘मॅरेज कॉऊंसिलिंग’ असे शिक्षण पूर्ण केले. हे सगळे करताना घरची घडी व्यवस्थितच राहिली पाहिजे, याकडेही त्यांनी आवर्जून लक्ष दिले. त्यांना महाविद्यालयात नोकरी लागली. पुढे ‘अभाविप’चे काम त्यांच्याकडे आले. विद्यार्थ्यांची ज्येष्ठ पदाधिकारी न राहता, त्यांची आई या जाणिवेतून सुरेखा यांनी काम केले. कोरोना काळात तर त्यांनी अविरत जनसेवा केली. वस्तीत राहणार्या नुकतेच बाळाला जन्म दिलेल्या गरीब मातेला पोषण आहार मिळावा म्हणूनही त्यांनी काम सुरू केले, तर अशा सुरेखा यांचे म्हणणे की, “आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत महिला सक्षमीकरणासाठी आणि युवा संस्कारांसाठी मी कार्य करणार आहेत.” सुरेखासारख्या मातृशक्ती या केवळ नांदेडसाठीच नाही, तर सगळ्यांसाठी आदर्श आहेत.