मुंबई : (Online Allowance for Polling Staff) निवडणूकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ऑनलाईन भत्ता मिळणार आहे. पूर्वी हा भत्ता मतदान केंद्र अध्यक्षांकडून मतदान संपताच रोख स्वरूपात दिला जात होता.
यंदाच्या विधानसभा निवडणूकीपासून यामध्ये बदल करण्यात येत असून निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्याचा तपशिल घेण्यात आला आहे. त्याबाबतचे पत्र उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी के. सूर्यकृष्णमूर्ती यांच्या सहीने राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.
या पत्रात नमूद करण्यात आले आहे की निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्र अध्यक्ष किंवा मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा निवडणूक व आहार भत्ता ऑनलाईन स्वरूपात देण्यात यावा यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पीपीएमएस म्हणजेच पोलिंग पर्सोनेल मॅनेजमेंट सिस्टीम या सॉफ्टवेअर मध्ये भरण्यात आलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या प्रशिक्षणानंतर ही माहिती जमा करण्यात आलेली आहे सोमवारी यातील तपासणी करता प्रत्येकाच्या खात्यावर प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया पाठवण्यात येणार होता.
यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर एक रुपया ट्रायल पेमेंट मिळालेले नाही त्यांचे बँक खाते अद्यावत करण्यात येणार आहेत. बँक खाते असल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवारी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता संपूर्ण यादी बँकेत जमा केली जाणार आहे. ही रक्कम बँकेने बुधवारी एक वाजता अदा करण्याची सूचना देण्यात आली आहे.
भत्ता वाटप प्रक्रियेमध्ये सुलभता आणि पारदर्शकता राहावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनासुद्धा हे सोयीस्कर ठरणार आहे. केंद्र अध्यक्षाचा भत्ता वाटप प्रक्रियेतील हस्तक्षेप या निर्णयामुळे कमी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या निवडणूकीपासून ही प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.