जिद्द असल्यास अशक्य असे काहीही नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोडनिंब गावातील ‘साईप्रसाद फूड प्रोडक्ट कंपनी’ होय. जाणून घेऊया या कंपनीचे मालक अक्षय केदार यांच्या प्रवासाविषयी...
लहानसा का होईना, स्वत:चा एक व्यवसाय असला पाहिजे, अशी धारणा प्रत्येकाचीच असते. त्यासाठी प्रत्येक जण अहोरात्र मेहनत घेत असतो. आजकाल आपला छोटासा का होईना, व्यवसाय असावा ही भावना मराठी तरुणांमध्येही प्रकर्षाने दिसून येते. मराठी समाजाच्या आर्थिक विकासासाठी ही बाब अतिशय कौतुकास्पद. त्यामुळे अनेक मराठी तरुण आज उद्योगाकडे वळत आहेत. असाच एक तरुण म्हणजे अक्षय केदार होय!
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब या गावात राहणारे केदार हे सामान्य कुटुंब. आई-वडील, मोठी बहीण असे अक्षय यांचे चौकोनी कुटुंब. वडिलांच्या मालवाहतुकीच्या लहानशा व्यवसायावर कुटुंबाचा चरितार्थ चालत असे. मात्र, जीवनात कालच्या सारखा आजचा दिवस नसतो म्हणतात, त्याची प्रचिती अक्षय यांना आली. शालेय जीवनात पितृसुखाला अक्षय पारखे झाले. त्यामुळे घरातील मुलगा या न्यायाने कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव अक्षय यांना झाली. त्यामुळे २०१० साली दहावीचा शेवटचा पेपर दिला आणि दुसर्या दिवसापासून घराजव़ळ असलेल्या तेल कारखान्यामध्ये रुजू झाले. अक्षय यांच्या ताई त्यावे़ळी विज्ञान शाखेमध्ये पदवी शिक्षण घेत होत्या. त्यामुळे शिक्षण सोडून बहिणीने काम करावे, असे अक्षय यांना वाटले नाही. त्यामुळे जबाबदारी आणि परिस्थितीचे भान ठेवून अक्षय यांनी स्वत:चे शिक्षण आणि नोकरी सुरुच ठेवली. असे करत त्यांनी बहिणीचे शिक्षण पूर्ण केले.
मात्र, अक्षय यांची बारावी झाली आणि नोकरी किंवा शिक्षण असाच पर्याय त्यांच्या समोर उभा राहिला. त्यामुळे तेव्हा अक्षय यांनी नोकरीचा पर्याय स्वीकारला. त्यावेळी घराला हातभार लावण्यासाठी अक्षय यांच्या आईसुद्धा अंगणवाडीत जात असत.
बारावीनंतर पूर्णवेळ नोकरी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अक्षय यांनी त्यांच्याच नातेवाईकांच्या किराणा दुकानात, काहीकाळ कपड्याच्या दुकानात नोकरी केली. मात्र, हे करत असताना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचे चक्र डोक्यात घुमत होते. त्यामुळे हाताशी असलेली परिस्थिती, आजवरचा अनुभव आणि निरीक्षण यातून त्यांनी लाडू निर्मितीचा व्यवसाय सुरु करण्याचे निश्चित केले. किराणा दुकानात काम केल्याने कच्च्या मालाचे भाव, गुणवत्ता, घ्यायची खबरदारी याचे ज्ञान गाठीशी होतेच. त्यात गावात सर्व दुकानात मिळणारे लाडू हे काही गावात किंवा जिल्ह्यात तयार होत नाहीत, हे अक्षय यांच्या चाणाक्ष नजरेने हेरले होते. अक्षय यांच्या आईच्या हाताला उत्तम चव असल्याचे कौतुक अनेकांनी केले होतेच. त्यामुळे आईच्या मदतीने त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. शेंगदाणा, डिंक आणि बेसनचे लाडू तयार करायला त्यांनी सुरुवात केली. प्रारंभी घाऊक माल देण्याचा विचार अक्षय यांचा होता. मात्र, नात्यातील दुकानदारांनी त्यांना तसे न करण्याचा आपुलकीचा सल्ला दिला. त्याऐवजी एक-एक दुकानदार निश्चित करण्याचे मार्गदर्शनदेखील केले आणि अक्षय यांनी ते ऐकलेसुद्धा. त्यामुळे अक्षय लाडू भरलेल्या बरण्या दुकानात सोडू लागले. पदार्थाची चव आणि कच्च्या मालाची गुणवत्ता यामुळे अल्पावधीतच अक्षय यांना यश मिळाले. अर्थात, यामध्ये साईबाबा यांच्यावरील श्रद्धेचा वाटा मोठा आहे. साईबाबांवरील श्रद्धेमुळेच अक्षय यांनी त्यांच्या कंपनीचे नाव ‘साईप्रसाद फूड प्रोडक्ट’ असे ठेवले आहे.
अखंड मेहनत, सचोटी, प्रामाणिकपणा यांच्या जोरावर आज अक्षय यांची कंपनीचा डोलारा उभा आहे. एका गावापासून सुरु झालेला अक्षय यांच्या व्यवसायाचा प्रवास आता सोलापूर नजीकच्या चार जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. कौशल्य विकासाचे उत्तम उदाहरण म्हणजे अक्षय यांची ‘साईप्रसाद फूड प्रोडक्ट कंपनी’ होय! वस्तू बाजारात कशी विकावी याचे कौशल्य अक्षय यांच्या अंगी दहावीनंतर अनेक ठिकाणी विक्रेता म्हणून केलेल्या कामातून बाणले गेले. त्याचा विकास झाला. बाजाराचे नेमके स्वरुप समजले, बाजाराचा स्वभाव समजला. त्यामुळे बाजारात वावरतानाचे सर्व आवश्यक बारकावे अक्षय यांनी शिकून घेतले आणि त्याचा व्यवसायवाढीसाठी सुरेख वापर केला.
त्यामुळेच अल्पावधीच बाजारामध्ये त्यांचे उत्पादन सर्वत्र दिसू लागले. यामध्ये अक्षय यांनी आकर्षक वेष्टनाची भर घातली. ४० लाडू असलेली ‘साईप्रसादचे लाडू’ हे नाव लिहिलेली एक प्लास्टिकची बरणी मोडनिंब गावासहित तालुका पातळीवर सगळीकडे दिसू लागली.
आज अक्षय यांच्या कारखान्यामध्ये १५ ते १६ महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे गावामध्येच रोजगारनिर्मिती झाल्याचा आनंद अक्षय यांना आहे. कंपनीचा व्यवसाय जरी वाढला असला, तरी आजही लाडू तयार करण्याच्या सर्व प्रकिया अक्षय यांच्या आईच बघतात आणि बाहेर जाऊन व्यवसाय वाढीसाठीचे सर्व प्रयत्न अक्षय करतात. त्यामुळेच विश्वासाने अक्षय यांना बाहेर काम करता येत असते. तसेच, पदार्थाची गुणवत्ता आणि चव यात फरकदेखील पडत नाही. चव आणि गुणवत्ता या दोनच गोष्टींमुळे खाद्यपदार्थांची मागणी वाढते, हे गणित समजल्याने अक्षय यांनी आजवर या दोन्ही गोष्टींशी तडजोड केलेली नाही. पूर्वी किरकोळ विक्री करणारे अक्षय यांनी आता व्यवसायवाढीमुळे किरकोळ विक्री थांबवून जिल्हानिहाय घाऊक विक्री सुरु केली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर काही प्रतिनिधी नेमले असल्याने, व्यवसाय विस्तारदेखील जलद होत आहे. ‘इच्छा असल्यास मार्ग हा मिळतोच’ हेच अक्षय यांनी त्यांच्या उदाहरणातून सिद्ध केले आहे. ‘साईप्रसाद फूड प्रोडक्ट’ची प्रत्येक उत्पादने राज्यभरात सर्वत्र मिळावीत, हे अक्षय यांचे स्वप्न आहे. त्यांची सर्व स्वप्ने सत्यात येवोत, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
कौस्तुभ वीरकर