सत्तापिपासू आघाडीचा पराभव निश्चित; योगेश सागर यांना विश्वास
18-Nov-2024
Total Views | 29
1
मुंबई : महायुतीचा संकल्प सुरूवातीपासून राज्याचा विकास करणे हाच राहिला आहे. दुसर्या बाजूला विरोधी आघाडीत मात्र सत्तेच्या खुर्चीसाठी एकमेकांमध्ये भांडणे सुरू आहेत. राज्याच्या विकासासाठी येथील नागरिक महायुतीलाच कौल देतील, असा विश्वास चारकोप मतदारसंघातील उमेदवार योगेश सागर ( Yogesh Sagar ) यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’शी साधलेला संवाद
पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील सभेत जनसमुदयाला केलेल्या संबोधनाबाबत आपण काय सांगाल ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विचारांचे सोने लोकांमध्ये वाटले. पंतप्रधान ज्यावेळेस महराष्ट्रामध्ये येतात, त्यावेळेस महायुतीचा कार्यकर्ता वर्गच नव्हे, तर सामान्य माणसे सुद्धा मोदींना ऐकण्यासाठी उत्सुक असतात. पंतप्रधान मोदी यांनी केलेले भाषण हे खर्या अर्थाने दिशादर्शक होते. महायुती सरकारने मागील दोन वर्षांत केलेली कामे असतील, त्याचसोबत पुढच्या पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचे व्हिजन काय असेल, यावर मोदींनी भाष्य केले. त्याचबरोबर विरोधकांकडून ज्या पद्धतीने देश तोडण्याचे काम केले जात आहे, हे मोदींनी लोकांच्या नजरेस आणून दिले.
निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत, तेव्हा आता आपल्या प्रचाराची दिशा काय आहे?
माझ्या प्रचाराची दिशा ही मी केलेल्या कामाशी जोडली गेली आहे. मागचे तीन टर्म कांदिवलीमध्ये मी केलेली कामे आणि त्याच जोडीने वाढलेले मताधिक्य, आमदाराने केलेले काम आणि पक्षावर असलेली निष्ठा यातूनच हे शक्य होते. महायुती सरकारने शेतकर्यांसाठी केलेली कामे असू देत किंवा ‘लाडकी बहीण’ सारखी योजना असू देत. सरकारने केलेल्या या कामामुळे जनतेचा आशीर्वाद सरकारला मिळाला आहे आणि यामुळेच महायुतीच्या सरकारला निवडणुकीत यश मिळेल.
चारकोप आणि कांदिवलीसाठी पुढच्या पाच वर्षांचे व्हिजन काय आहे?
चारकोपमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. ‘एसआरए’ प्रकल्पाच्या माध्यमातून जिथे काही जण कागदपत्रे विकायची कामे करतात आणि येथील सामान्य गरीब लोकांची फसवणूक करतात, ती मी थांबवणार आहे. ‘सुरक्षित कांदिवली’ करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा लावणे व पोलीस यंत्रणेशी त्यांना जोडून घेणे, हे काम आम्ही करणार आहोत. कांदिवलीमध्ये नाट्यगृह उभारण्याचा भव्य प्रकल्पसुद्धा आम्ही मनाशी पक्का केला आहे.
महाविकास आघाडीच्या आव्हानाकडे आपण कसे बघता?
महाविकास आघाडीची निर्मिती ही केवळ सत्तेसाठी केली गेली आहे. त्यांच्या सुरू असलेल्या भांडणामधून हे लक्ष्यात येते. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागावी, अशी त्यांची इच्छा आहे. एकीकडे काँग्रेसच्या लोकांना वाटते की, मुख्यमंत्री त्यांचा झाला पाहिजे. यामध्ये शरद पवार यांची वेगळीच राजनिती सुरू असते आणि दुसर्या बाजूला महायुतीचे सरकार ही पवित्र आघाडी आहे. लोकांसाठी काम करणारी आघाडी आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. त्यामुळे या सत्तापिपासू मविआचा आम्ही पराभव करणार हे निश्चित.
पंतप्रधानांनी नुकतेच ‘एक हैं, तो सैफ हैं’चा नारा दिला, यावर आपले मत काय?
पंतप्रधान हे एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपल्या देशाला लाभलेले आहे. त्यांनी ‘एक हैं, तो सेफ हैं’चे जे सूत्र आपल्याला दिले आहे, ते केवळ निवडणुकीसाठीच नाही, तर समाजासाठी दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणण्याचे सूत्र आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्घतीचे फेक नॅरेटीव्ह विरोधकांकडून तयार करण्यात आला. आरक्षणाच्या मुद्यावरून घुमजाव केला गेला. या प्रचाराला दुर्दैवाने काही लोक बळी पडली. त्यामुळे पंतप्रधानांनी विचारमंथन करूनच देशाला हा ‘एक हैं, तो सैफ हैं’चा नारा दिला आहे. एकाप्रकारे जातीवादी शक्तींना जी या देशाच्या विरोधात उभी ठाकली आहे, तिला आव्हान दिले आहे.