पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार!
18-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) सध्या नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या तीन देशांच्या दौर्यावर आहेत. नायजेरियात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे स्वागत करण्यात आले. त्यांना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रॅण्ड कमिसर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ (जीकॉन)ने सन्मानित करण्यात आलं आहे. यापूर्वी राणी एलिझाबेथ या एकमेव परदेशी व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आले. १९६९ मध्ये हा सन्मान त्यांना देण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी अबुजा येथे दाखल झाले. नायजेरियात पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबूच्या निमंत्रणावरून नायजेरियाला भेट दिली. नायजेरियाचे मंत्री न्यासोम एजेनवो वायके यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांना ‘द ग्रॅण्ड कमिसर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ (जीकॉन) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून हा पुरस्कार नायजेरियाच्या जनतेचा पंतप्रधानांवरील विश्वास व आदर दर्शवतो.”
नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष तिनुबू यांनी ’एक्स’वर पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. “आपण भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्यास उत्सुक होतो,” असे म्हटले आहे. तर, नरेंद्र मोदी यांनी त्याला उत्तर देत, “धन्यवाद, राष्ट्राध्यक्ष टिंबू. मी नायजेरियाला पोहोचलो. येथील स्वागताने मी भारावलो आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, अशी मला आशा आहे. नायजेरियातील भारतीय समुदायाकडून असे जंगी स्वागत होत असल्याने खूप आनंद होत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
मराठी समुदायाचे कौतुक
“नायजेरियातील मराठी भाषिक त्यांच्या संस्कृतीशी आणि मुळांशी एकरुप आहेत, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषिकांचे कौतुक केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांना आनंद झाला आहे,” असेही पंतप्रधानांनी सांगितले. ‘एक्स’वर ते म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल, नायजेरियात मराठी भाषिकांनी आनंद व्यक्त केला. ते त्यांच्या संस्कृती आणि मुळांशी ज्या पद्धतीने जोडले गेले आहेत, ते पाहाणे अतिशय कौतुकास्पद आहे.”