डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा काँग्रेसकडून तिरस्कार
‘जय भीम’ म्हटल्याने विलासराव देशमुखांनी मंत्रिपद नाकारले; डॉ. नितीन राऊत यांचा गौप्यस्फोट
18-Nov-2024
Total Views |
मुंबई : “मी ‘जय भीम’ म्हणतो, त्यामुळे माझे मंत्रिपद गेले होते. यादीमध्ये नाव असताना ऐनवेळी आपल्याला डावलले,” असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते तथा माजी मंत्री डॉ. नितीन राऊत ( Dr. Nitin Raut ) यांनी केला आहे. “एका सभेदरम्यान केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे काँग्रेस कायम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तिरस्कार करते,” असे उघड झाले आहे.
विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी कशी गेली, याविषयी बोलत असल्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांचा व्हायरल झाला आहे. ते म्हणाले की, “विलासराव देशमुख यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावले आणि सांगितले की, कॅबिनेटमध्ये तुमचे नाव आहे. तुम्ही तयारीला लागा. परंतु, ज्यावेळी शपथविधी होणार होता, त्यावेळी सांगण्यात आले की, यादीतून तुमचे नाव गाळण्यात आले. म्हणून मी दीड महिने मंत्रालयात गेलो नव्हतो.” नितीन राऊत पुढे म्हणाले की, “दीड महिन्यानंतर जेव्हा मी मंत्रालयात कामानिमित्त गेलो, तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे जायला निघालो. सहाव्या मजल्यावर कॅबिनेट बैठक होती. मी गेल्यानंतर कॅबिनेट संपली. एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झाले होते. त्यांनी मला मध्येच अडवले आणि माझा हात धरुन बाजूला नेले. ते मला म्हणाले नितीनभाऊ, आपण विलासरावांना भेटायला चालला आहात म्हणून मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही विलासराव देशमुखांना जे ‘जय भीम’ म्हणता ना, ते सोडून द्या. कारण, त्याच्यामुळे तुमचे मंत्रिपद गेले आहे. आता मला सांगा, माझे मंत्रिपद ‘जय भीम’ म्हणण्याने गेले असेल, तर यापेक्षा मोठा अभिमान कोणता असू शकतो?” असे नितीन राऊत यांनी सांगितले.
नितीन राऊत यांच्या व्हिडिओमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रचाराचा शेवटचा टप्पा असताना काँग्रेसच्या विचारांवर संताप व्यक्त होत आहे.
पूर्वीपासून हीच आहे काँग्रेसची संस्कृती : चित्रा वाघ
भाजपच्या आ. चित्रा वाघ यांनी सदर व्हिडिओ ट्विट केला आहे. काँग्रेसची संस्कृती नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरविरोधी राहिलेली आहे. एका भाषणामध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत सांगतात की, “केवळ ‘जय भिम’ म्हटले, म्हणून विलासराव देशमुखांनी मंत्री केले नाही. अहो नितीन राऊत, यात नवीन काय आहे? प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्या काँग्रेसवाल्यांनी दोनदा निवडणुकीमध्ये पाडले, त्यांच्याकडून कसली अपेक्षा करता? यांचा मूळ चेहरा आरक्षणविरोधी, मागासवर्गीयांच्या विरोधी आणि फक्त मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारा आहे, त्यांच्याकडून तुम्हालाच काय, भारतात कोणालाच न्याय मिळणार नाही. पूर्वीपासून हीच आहे काँग्रेसची संस्कृती,” अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
काँग्रेस ही आंबेडकरी जनतेची विरोधक : भाई गिरकर
“काँग्रेस ही कायम आंबेडकरी विचारांची विरोधक राहिली आहे. काँग्रेसने १९५२ आणि १९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करून अपमानित केले होते. १९९० पर्यंत भारतरत्न दिले नाही, त्यांचे तैलचित्र संसदेत लावले नाही, नवबौद्ध झाल्यानंतर १९५६ पासून १९९० पर्यंत अनुसूचित दर्जा दिला नाही,” असे मत भाजपचे माजी आ. भाई गिरकर यांनी व्यक्त केले. तसेच, “व्ही. पी. सिंग सरकारच्या काळात १९९० मध्ये भाजपच्या ८६ खासदारांनी पाठिंबा दिलेल्या व्ही. पी. सिंग सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न दिले, नवबौद्ध समाजाला अनुसूचित दर्जा दिला, संसदेत तैलचित्रही लावले. जिथे काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाकारले, तिथे नितीन राऊत काय? काँग्रेसने बाबू जगजीवनराम यांना पंतप्रधान होऊ दिले नाही. सिताराम केसरी यांच्या कार्यालयातून त्यांची खुर्ची फेकली. रामदास आठवले हे काँग्रेस आघाडीचे खासदार होते. त्यांनी कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी शिवशक्ती-भिमशक्ती निर्माण केली. त्यानंतर त्यांच्या बंगल्यातील साहित्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तस्वीर फेकून दिली. नुकतेच वायनाडच्या निवडणुकीसाठी प्रियांका गांधी अर्ज भरायला गेल्या असता, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी दलितविरोधी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीला मत न देता, या अपमानाचा बदला घेतला पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.