नागपूर : काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडला असून असून ते खोटे बोलतात हे लोकांना कळले आहे. त्यामुळे जनतेचा महायूतीवर विश्वास आहे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. त्यांनी सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी कामठी येथे माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या कल्याणासाठी आम्ही राज्य सरकार म्हणून २५ महत्वाच्या विषयांवर काम करणार आहोत. आमचा जाहीरनामा जनतेला पटला आहे आणि काँग्रेसचा जाहीरनामा धुळ खात पडला असून ते खोटे बोलतात हे लोकांना कळले आहे."
"आमच्या १६५ च्या वर जागा निवडून येतील आणि १०० टक्के महाराष्ट्रात आमचे सरकार येईल. महाविकास आघाडीतील आपसातील वादामुळे त्यांच्यात प्रचंड ओढाताण आहे. काँग्रेस पक्षाने लोकसभेत खोटे बोलून मते घेतल्याने जनतेला त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे जनतेने हरियाणामध्ये काँग्रेसला सोडले तीच परिस्थिती महाराष्ट्रातदेखील आहे. काँग्रेसचा कोणताही जाहीरनाम्यावर विश्वास नाही त्यामुळे महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने महायूती सरकार येणार आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्हाला पवारांच्या नादी लागायची गरज नाही!
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, "शरद पवारांच्या नादी त्यांचेच लोक लागले आहेत. आम्हाला त्यांच्या नादी लागायची गरज नाही. आमच्याकडे एवढे काम आहे की, आम्ही त्या कामांवर मते घेऊ शकतो. त्यामुळे आम्हाला शरद पवारांच्या नादी लागायचे नाही आणि त्यांच्याकडे बघायचेसुद्धा नाही. त्यांनी त्यांचे काम करावे, आम्ही आमचे काम करतो. त्यांच्याकडे काहीच नसल्याने जनता त्यांना मत कसे देणार? त्यामुळे त्यांनी विकासाबद्दल बोलावे. कामठीतील दीड लक्ष परिवारांसोबत माझे कौटुंबिक संबंध आहे. त्यामुळे घरून प्रचाराला निघताना मी एकटाच निघतो, मला ताफा घेऊन जावे लागत नाही. जनतेला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे," असेही ते म्हणाले.