मुंबई : ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चा प्रवक्ता असलेल्या सज्जाद नोमानी ( Sajjad Nomani ) याचे ‘व्होट जिहाद’चे वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नोमानीने परभणी येथील पत्रकारपरिषदेत केलेल्या वादग्रस्त जिहादी मानसिकतेच्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाने त्याची तात्काळ दखल घेत, २४ तासांत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश परभणी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
महाराष्ट्रातील मुस्लिमांना मविआला जिंकवण्यासाठी ‘व्होट जिहाद’ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. भर पत्रकारपरिषदेत अशा सूचना दिल्याने महाराष्ट्रातील जनमत ढवळून निघाले आहे. सज्जाद नोमानी याने परभणी इथे पत्रकार परिषद घेऊन, मविआच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देण्यासाठी ‘व्होट जिहाद’ करण्याचे आवाहन मुस्लिमांना केले होते. तसेच त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत ज्या मुस्लिमांनी भाजप आणि महायुतीला मतदान केले, त्यांना वाळीत टाका, त्यांच्याशी कोणतेही व्यवहार करू नका असे फर्मानदेखील सोडले होते.
महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्यापासून सज्जाद नोमानीने मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाला सुरुवात केली होती. विविध माध्यमांतून मुस्लिमांशी चर्चेत राहून ‘व्होट जिहाद’ करण्यासाठी मुस्लिमांना प्रेरित करण्याचे आवाहन त्याने मुस्लीम मतदारांना केले आहे. दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या एका संदेशात जर महाराष्ट्रात भाजपप्रणित महायुतीचे सरकार न आल्यास, देशातील यांचे सरकार देखील फार काळ टिकणार नसल्याचे धक्कादायक विधान केले होते. तसेच मुस्लिमांनी त्यांचे लक्ष्य फक्त महाराष्ट्राचे सरकार एवढेच न ठेवता देशाची सत्ता देखील ध्यानी ठेवली पाहिजे असे देखील त्याने संदेशात म्हटले आहे. तसेच या ‘व्होट जिहाद’चे सिपाहसलार शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी असल्याचेदेखील नोमानी याने म्हटले आहे. नोमानीच्या असंख्य संदेश चित्रफिती आज समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्या आहेत.
नोमानीने परभणी येथे पत्रकार परिषद घेऊन केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून तात्काळ याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले होते. यावर निवडणूक आयोगानेही परभणी जिल्हाधिकार्यांना २४ तासांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आणि ‘व्होट जिहाद’चा फतवा निघाला....
सज्जाद नोमानी याने ‘ऑल इंडिया एकता फोरम’च्या माध्यमातून २६९ ठिकाणी मविआच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा फतवा काढला आहे. त्यामध्ये १७० उमेदवार हे मराठा आणि इतर मागास वर्गातील असून, ५३ उमेदवार हे अनुसूचित जाती आणि जमातीतील आहेत. ४० उमेदवार हे इतर जात अथवा धर्म, संप्रदायातील आहेत. तसेच २३ मुस्लीम उमेदवारांना त्याने पाठिंबा जाहीर करत, या सर्व २६९ उमेदवारांच्या विजयासाठी ‘व्होट जिहाद’ करण्याचे आवाहन राज्यातील मुस्लिमांना नोमानी याने केले आहे.
‘व्होट जिहाद’च्या मैफिलीत शरद पवारांची जातीय सुरावट
नोमानीच्या वक्तव्याने राज्यभरात वातावरण बिघडलेले असताना, शरद पवारांनी मात्र त्यांच्या जातीयवादाचा सूर आळवणे सुरूच ठेवले आहे. ‘व्होट जिहाद’ची बरोबरी त्यांनी पुण्यातील विशिष्ट समाजाने भाजपला केलेल्या मतदानाशी केली आहे. पवारांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये असे म्हटले आहे की, “पुण्यातील एक विशिष्ट हिंदू मतदार भाजपला मतदान करतो, याला ‘व्होट जिहाद’ म्हणता येणार नाही. आम्हांला त्याची सवय झाली” असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.