दमदार आशय देणारा ’द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 2002 साली गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाचे अंगावर काटा आणणारे वास्तव अतिशय स्पष्टपणे दाखविण्यात आले आहे. तथाकथित मुख्य प्रवाहातील राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचा चेहराही पूर्णपणे उघड झाला आहे.
देशात 2014 सालानंतर ‘गोदी मीडिया’, ‘भक्त’ असे शब्द जाणीवपूर्वक शिवीप्रमाणे वापरून 2014 सालापूर्वीची आपली पापे झाकणार्या अनेकांच्या चेहर्यावरचे डागही ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाने दाखवून दिले आहेत. आताही देशातील स्थिती लक्षात घेता ‘गोध्रा हत्याकांडा’सारखा देशाच्या राजकारणास आणि समाजकारणास कलाटणी देणारा विषय मांडण्याचे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचे धैर्यही वाखाणण्याजोगे ठरले आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यातील प्रत्येक शब्द आणि घटना त्या काळातील ठोस कागदपत्रांच्या आधारे चित्रित करण्यात आली आहे. अर्थात, या घटनेचे सत्यच एवढे भेदक आहे की, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भर मुद्दामहून घालण्याची गरजच नाही.
‘गोध्रा हत्याकांड’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. गुजरातमधील गोध्रा स्थानकामध्ये दि. 27 फेब्रुवारी 2002 साली साबरमती एक्सप्रेसच्या एका बोगीला आग लावण्यात आली होती आणि त्यामध्ये आणि 59 कारसेवकांना जीव गमवावा लागला होता. मात्र, हा घातपात नसून अपघात असल्याची परिस्थिती त्यावेळी निर्माण करण्यात आली होती. चित्रपटाचा प्रारंभ याच घटनेतून होतो.
ही घटना अगदी ग्राऊंड झिरोवर जाऊन तेव्हाच्या मानिका राजपुरोहित नामक (रिद्धी डोग्रा) प्रसिद्ध इंग्रजीभाषक पत्रकारासोबत कॅमेरामॅन म्हणून गेलेल्या समरने (विक्रांत मेस्सी) बघितलेली असते. मात्र, प्रत्यक्षात अपघात असल्याचे सोडून, हा केवळ घातपात असून गुजरातचे तत्कालीन राज्य सरकार यासाठी जबाबदार असल्याचे वार्तांकन देशाच्या माथी मारले गेल्याचे पाहून त्याच्यातील हाडाचा पत्रकार अस्वस्थ होतो. अगदी भाबडेपणाने समर आपल्या वृत्तवाहिनीच्या मालकांशी सत्य दाखविण्यासाठी तात्त्विक वादही घालतो. मात्र, पत्रकारितेच्या माध्यमातून हिंदू समाजाला लक्ष्य घेण्याची सुपारी घेतलेल्या ‘ईबीटी न्यूज’ या वृत्तवाहिनीचे मुखंड समरला धुडकावून लावतात आणि त्याला शब्दश: आयुष्यातून उठवतात.
कालांतराने अमृता (राशी खन्ना) नामक एक ट्रेनी रिपोर्टर अगदी वरवर ‘गोध्रा हत्याकांड’ विषयाचा अभ्यास करण्यास प्रारंभ करते. मात्र, तिला या प्रकरणामध्ये सत्य दडपले गेल्याचा संशय येतो. त्यानंतर समरच्या साथीने ती पुन्हा या प्रकरणाच्या तळाशी जाऊन सत्य शोधते. हा सर्व प्रवास 2002 ते 2007, 2007 ते 2017 आणि 2017 ते दि. 22 जानेवारी 2024 अर्थात अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात झालेली श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा एवढ्या मोठ्या काळात होतो. या दरम्यान देशातील बदलते राजकारण सविस्तर दिसते. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे हिंदू समाज, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचे ‘इकोसिस्टीम’चे प्रयत्न आणि त्यामध्ये असलेला माध्यमसमूहांचा सक्रिय सहभाग असा पट उलगडून दाखविण्यात चांगले यश दिग्दर्शकास आले आहे. चित्रपट मध्यंतरापर्यंत अतिशय वेगवान असून, दर्शकांची चांगलीच पकड घेतो. मध्यंतरानंतर मात्र चित्रपट काहीसा रेंगाळतो. मध्यंतरानंतर ‘गोध्रा प्रकरणा’तील आणखी पैलू मांडण्याचा वाव होता. मात्र, चित्रपटाचा मुख्य विषय ‘प्रसारमाध्यमांचे कारनामे’ दाखविण्यापुरताच मर्यादित ठेवल्याने कदाचित अन्य पैलू मांडले नसावेत. आजच्या पिढीला कदाचित ही घटना माहीत नसावी, त्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी ‘डॉक्युमेंटेशन’ ठरणार आहे.
चित्रपटामध्ये माध्यमसमूहांची कार्यशैली अतिशय स्पष्टपणे दाखवली आहे. ‘गोध्रा हत्याकांडा’चे एकांगी आणि प्रामुख्याने हिंदूविरोधी वार्तांकन 2002 साली करणारा माध्यमसमूह पुढे गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी कसे जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मुख्यमंत्री त्या समूहास कशी जागा दाखवून देतात, हा प्रसंग चित्रपटात विशेष ठरतो. त्याचप्रमाणे ‘गोध्रा हत्याकांडा’मध्ये मुस्लिमांनाच बळी ठरवून, त्यांचा वापर करणार्या एनजीओवरही चित्रपटाने प्रकाश टाकला आहे. चित्रपटामध्ये तत्कालीन राजकीय संदर्भदेखील चपखलपणे दाखवले आहेत. वाजपेयी सरकार, तत्कालीन मोदी राज्य सरकार, 2004 सालानंतर केंद्रातील काँग्रेसप्रणित युपीए सरकार यांची भूमिका होती तशी दाखविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ‘गोध्रा हत्याकांडा’मागचे षड्यंत्र आणि त्याचे परदेशी धागेदोरे यावरही भाष्य करण्यात आले आहे. या सर्व घटनांना साजेसे संगीतही असल्याने चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
‘12वी फेल’ या चित्रपटापासून विक्रांत मेस्सी या अभिनेत्याने आपल्यातील क्षमता सिद्ध करण्यास प्रारंभ केला आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’मध्येही सत्य दाखवणारा एक तरुण हिंदी भाषक पत्रकार ही भूमिका विक्रांतशिवाय क्वचितच अन्य कोणास निभावणे जमले असते. रिद्धी डोग्राने अप्रतिम काम केले आहे. ‘प्रस्थापित होत असताना’ आणि ‘प्रस्थापित झाल्यानंतर’ पत्रकार कसे वागू शकतात, हे रिद्धी डोग्राने तंतोतंत दाखवले आहे. राशी खन्नाने एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची भूमिका चोख बजावली आहे. एका मोठ्या पत्रकाराची चाहती ते भाबडी पत्रकार आणि आपली रोलमॉडेल असलेल्या पत्रकारालाच सत्याचा आरसा दाखवणार्या पत्रकारापर्यंत, ही भूमिका तिच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक म्हणावी लागेल. धीरज सरना यांचे दिग्दर्शन अप्रतिम आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या अतिशय महत्त्वाच्या विषयावर चित्रपट करण्याची हिंमत दाखवली आहे. चित्रपटास विनाकारण ‘सेक्युलर’ तडका न देता, त्यांनी दोन तासांच्या अवधीत सत्य दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असून तो यशस्वी झाला आहे. त्याचप्रमाणे मसालापटांसाठी प्रसिद्ध असलेल्या एकता कपूर यांनी ‘गोध्रा हत्याकांडा’सारख्या अतिशय ज्वलंत विषयाची निवड करणे हेही विशेष.
एकूणच देशात सध्या ‘हिंदूहिताचे’ आणि ‘राष्ट्रहिताचे’ विषय जसे घडले, तसेच चित्रपटात मांडण्याचे नवे पर्व सुरू झाले आहे. ‘बुद्धा इन ट्राफिक जाम’, ‘उरी’, ‘द काश्मीर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’, ‘बस्तर - द नक्सल स्टोरी’ आणि ‘आर्टिकल 370’ हे चित्रपट या मालिकेत येतात. आता याच मालिकेत ‘द साबरमती रिपोर्ट’चाही समावेश झाला आहे. हिंदू समाजासाठी असे चित्रपट अतिशय महत्त्वाचे ठरतात. कारण, आपल्याविरोधात कशाप्रकारचे षड्यंत्र करण्यात आले होते आणि भविष्यातही काय होऊ शकते, हे सातत्याने जाणून घेण्यासाठी असे चित्रपट तयार होणे गरजेचेच!
चित्रपट : द साबरमती रिपोर्ट
दिग्दर्शक : रिद्धी डोग्रा
प्रमुख कलाकार : विक्रांत मेस्सी, रिद्धी डोग्रा, राशी खन्ना
रेटिंग : साडे तीन स्टार