डोंबिवली : डोंबिवली मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे २००९ पासून सलग तीन वेळा राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत ते चौथ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. “या निवडणुकीत कोकणातील मतदारांचा कौल महायुतीलाच मिळेल,” असा विश्वास त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला आहे.
डोंबिवली विधानसभा २०२४ निवडणुकीचा तुमचा अजेंडा काय आहे?
गेल्या अडीच वर्षांत राज्यातील महायुती सरकारने सामान्य जनतेला केंद्रबिंदू समजून जी कामे केली आहेत, ती सर्वांना माहिती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महायुती सरकारला सुमारे अडीच लाख कोटी एवढा प्रचंड मोठा निधी दिला आहे. मेट्रो रेल्वे, रस्ते, पायाभूत सुविधा आदि विकासकामांना गती प्राप्त झाली आहे. त्या आधी दोन वर्षे महाराष्ट्रातील जनतेने अनुभवले आहे की, मविआ सरकारने विकासकामांना स्थगिती देण्याचे काम केले आहे. केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची कामेदेखील निधीअभावी बंद करण्याचा निर्णय मविआ सरकारने घेतला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि महाराष्ट्रातील महायुतीचे एक विचारी सरकार जनतेला अभिप्रेत आहे. हेच सरकार महाराष्ट्राची प्रगती साधेल.
भाजपने राज्यातील प्रचाराची मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपविली आहे, कोकणात जनतेचा कौल काय असेल?
कोकण हे नेहमी महायुतीच्या बाजूने राहिले आहे. कोकणचा मतदार हा उजव्या विचारसरणीचा आणि विकासाला मानणारा आहे. त्यामुळे कोकण महायुतीच्या बाजूने राहील, यात काही शंका नाही. त्यांचा कौल महायुतीकडेच आहे. जसे लोकसभेत झाले, तसेच कोकणातील सर्व विधानसभेच्या जागा महायुती जिंकेल, असा विश्वास वाटतो.
तळ कोकणातील सिंधुदुर्ग ते पालघर या पट्ट्यात महायुतीला किती जागांवर विजय मिळेल?
खरे तर आम्ही महायुती सरकार म्हणून गेल्या दोन-अडीच वर्षांत जी कामे करू शकलो, त्यात प्रामुख्याने पर्यटनाला संधी असेल, पायाभूत सुविधांची हजारो कोटींची कामे असतील, तिथल्या स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकलो. वेगवेगळ्या उपाय योजना जसे बंद पडलेले सिंचनाचे प्रकल्प सुरू केले. आम्ही सहा महिन्यांत कोकण रेल्वेची स्थानके आम्ही विमानतळासारखी केली आहेत. येथील जनतेला कळून चुकले आहे की, महायुतीचे सरकार वेगळ्या पद्धतीने काम करत आहे. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी जनतेची मागणी होती. सिंधुदुर्ग ते पालघरमधील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार येथील आरोग्य व्यवस्था सुदृढ करायचे काम महायुती सरकार करीत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग ते पालघर या पट्ट्यात महायुतीला निर्भेळ यश मिळेल, असा विश्वास आहे.
आमदार म्हणून पुन्हा निवडून आल्यावर शहरासाठी काही ‘मास्टर प्लॅन’ केला आहे का?
माझ्या कार्यअहवालात मी सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत. या सर्व गोष्टी कार्यान्वित करायचा माझा प्रयत्न असेल. मतदारसंघातील १०० टक्के रस्ते काँक्रीटचे करण्याचे आम्ही म्हटले होते. त्यांतील सुमारे ८० टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित २० टक्के रस्ते येत्या काळात पूर्ण होतील. डोंबिवलीमध्ये वाहन पार्किंगची जागेची समस्या आहे. त्यामुळे वाहतुककोंडी होते. त्यावर उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठाण्यात जसे अंडर ग्राऊंड पार्किंग केले आहे, तशी व्यवस्था डोंबिवलीत आणायचा येत्या काळात मी प्रयत्न करणार आहे.
तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल?
आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम मतदारांना मी आवाहन करतो की, देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातदेखील एक विचारी सरकार येणे गरजेचे आहे. केंद्रात आणि राज्यात एक विचारी सरकार आल्यास महाराष्ट्राला गती प्राप्त होऊ शकते. प्रत्येक क्षेत्रात आपले राज्य अव्वल होणे गरजेचे आहे, असे मला वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही निवडणूक आपण जिंकलो, तर आणि तरच आपले राज्य प्रगत होऊ शकते. जनतेने आधीच्या दोन वर्षांत पाहिले आहे, आधीच्या सरकारने दोन वर्षांत फक्त कामांना स्थगिती देणे, टीका-टिप्पणी करायचे काम केले आहे. महाराष्ट्राला विकासाची दिशा देणे, उद्योगांना चालना देणे, तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, अर्थात कामाकडे लक्ष देण्याचे काम मागील अडीच वर्षांत महायुती सरकारने केले आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी राज्यातील महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, अशी विनंती मी महाराष्ट्रातील तमाम मतदारांना करतो.