जिजाऊंचे नाव घेतले की, एकच चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा. ‘शिवराजअष्टका’तील प्रत्येक ऐतिहासिक चित्रपट असो किंवा ‘सोन परी’, ‘स्वामी’, ‘श्रीकांत’, ‘अवंतिका’, ‘अस्तित्व एक प्रेम कहाणी’ अशा हिंदी-मराठी मालिक असोत, मृणाल यांची प्रत्येक भूमिका आजही तितकीच संस्मरणीय. नुकतीच त्यांनी ‘पैठणी’ ही हिंदी मालिका ‘झी 5’ या ओटीटी वाहिनीवर प्रसारित करण्यात आली असून, त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला सुसंवाद.
आई-मुलीच्या नातेसंबंधांवर भाष्य करणार्या ‘पैठणी’ मालिकेच्या कथानकाविषयी विचारले असता मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की, “आपण नेहमीच म्हणतो की, प्रत्येक आई आपल्या मुलासाठी स्वप्न बघते. स्वत:ची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलांसाठी काय करता येईल, याचा सतत विचार करते. पण, अशी एखादीच मुलगी असते, जी आपल्या आईसाठी स्वप्न बघते आणि तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती पराकोटीचे प्रयत्न करते, तर अशी गोड आई-मुलीची कथा ‘पैठणी’ या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि ‘पैठणी’ची अशी परंपरा आहे की, आईची पैठणी मुलीला मिळते. या ‘पैठणी’ मालिकेतील ही आई अतिशय सोशिक आहे. मुलांसाठी अपार कष्ट उपसून मेहनतीने पैठणी विणण्याची कला तिला आत्मसात असल्यामुळे कुटुंबाला आधार देण्यासाठी ती तिने कशी जपली आणि पुढे कशी नेली, याचीही कथा यातून सांगण्यात आली आहे. पण, आता या मालिकेतील आईला अशी भीती आहे की, माझ्यानंतर या परंपरेचे काय होणार? वर्षानुवर्षे मी पैठण्या तयार केल्या. पण, माझ्यासारख्या कारागिरांच्या अंगाला कधी त्या लागल्या नाही. पण, तिची मुलगी मनाशी पक्क करते की, माझ्या आईला मी पैठणी नेसवणारच! असे मायलेकीचे एक फार गोड नाते या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.”
विराजसने मुलगा म्हणून जीवनात काय करावे, असा तुमचा विचार होता आणि त्याच्याबद्दल कोणते स्वप्ने तुम्ही पाहिली होती, असा प्रश्न विचारला असता, मृणाल म्हणतात की, “आई म्हणून माझीही विराजससाठी काही स्वप्ने होती, आहेत आणि त्यापैकी एक त्याने नुकतेच पूर्णही केले. ते म्हणजे, ‘वरवरचे वधु-वर’ हे त्याने लिहिलेले नाटक, जे प्रेक्षकांनाच्या पसंतीस उतरले. विषय जरी लग्नाचा असला तरी नवी पिढी नात्याकडे, लग्नाकडे, घर-संसाराकडे कसे पाहते, यावर विराजसने उत्तम सादरीकरण केले आहे. आई म्हणून मला त्याचा फार अभिमान आहे आणि मुलगा म्हणून त्याच्या वैयक्तिक जीवनात त्याला उत्तम साथीदार मिळावी, अशी माझी अपेक्षा होती आणि शिवानीच्या रुपाने माझी ती इच्छादेखील पूर्ण झाली आहे. खरेतर शिवानीच्या रुपाने मला फार गोड मुलगीच भेटली आहे. मुळात जेव्हा मी ही ‘पैठणी’ मालिकेचे चित्रीकरण करत होते, तेव्हा मला सतत शिवानीची आठवण येत होती. कारण, शिवानीच्या रुपाने मला आई-मुलीचे नाते काय असते, ते समजू लागले आणि अनुभवता आले. कलाकार कोणतीही भूमिका ज्यावेळी सादर करतो, तेव्हा त्यात कल्पना, सत्य, अनुभव आणि निरीक्षणे असतात. आता या मालिकेत मी मुलीची आई साकारत असल्यामुळे शिवानीमुळे मला ती भूमिका करणे सोप्पे गेले.”
मालिकाविश्वाच्या आठवणींना उजाळा देताना मृणाल म्हणाल्या की, “स्वामी’ ही मराठीतील आणि ‘श्रीकांत’ ही हिंदीतील मालिका माझ्यासाठी फार खास होती. आजही मला त्या मालिकेचा पहिला चित्रीकरणाचा दिवस आठवतो. ‘स्वामी’ मालिका मला मी दहावीची परीक्षा दिल्यानंतर लगेचच मिळाली होती. माझे एक शाळेतील नाटक पाहून माझी त्या नाटकासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, आलेली भूमिका चोख करायची, हे मनाशी पक्क केले होते. त्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करताना मला दडपण आले होते खरे, पण निभावून गेल सगळ. अथक मेहनत, व्यक्तिमत्त्वातला परिपक्वपणा आणि चिकाटी या मनोरंजनसृष्टीतील फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे या मूल्यांशी प्रामाणिक जर का राहिलात, तर या क्षेत्रात तग धरणे फारसे अवघड नाही आहे. मुळात या क्षेत्राची पार्श्वभूमी नसल्यामुळे मला काय करायचे, हा प्रश्न पडला होता. पण, साहित्यिक घरातून मी आल्यामुळे जे काम करेन ते उत्तमच करेन, हे मनाशी पक्क केल्यामुळे माझ्या वाटेला भूमिका उत्तमच आल्या, हे मी माझे भाग्यच समजते. साहित्य आणि ऐतिहासिक अनेक प्रोजेक्ट्स करण्याची संधी मिळाली, याहून आनंदाची बाब माझ्यालेखी असू शकत नाही.”
‘अवंतिका’ या त्यावेळच्या ‘अल्फा मराठी’ वाहिनीवरील मालिकेबद्दल भावूक होताना मृणाल कुलकर्णी म्हणतात की, “अवंतिका’ मालिका करत असताना माझ्या तीन हिंदी मालिका सुरु होत्या. त्यामुळे मला चित्रीकरण जमणार नाही, असे मी स्पष्टपणे स्मिता तळवळकर यांना कळवले होते. कारण, तीन मालिका सुरु असल्यामुळे महिन्यातील 20 दिवस मी चित्रीकरण करत होते आणि त्यातही विराजस लहान होता. त्यामुळे पुणे सोडून मी काम करु शकत नाही, असे मी स्मिताताईला सांगितले होते. त्यावर ती म्हणाली की, “अवंतिका’ ही मालिका तूच करायची आहेस. मी तुझ्यासाठी सगळे चित्रीकरण पुण्याला हलवते. त्यामुळे फक्त माझ्यासाठी मालिकेतील 40 लोक मुंबईहून पुण्याला यायचे.”
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ‘शिवराजअष्टक’ चित्रपट शृंखलेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा विडा हाती घेतला आहे. त्याबद्दल बोलताना मृणाल म्हणाल्या की, “शिवकाल हा ऐतिहासिक घटनांच्या पुराव्यासोबत सादर करणे फार महत्त्वाचे असते आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आमच्या अष्टकातून ते पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यापैकी पाच चित्रपट प्रदर्शित झाले असून, प्रत्येक चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कारण, आपल्या महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अचूकपणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो पाहिल्यावर त्यांना त्यात रस आला पाहिजे, या उद्देशाने आम्ही अष्टकाचे शिव धनुष्य खांद्यावर घेतले आहे. पण, ज्यावेळी प्रतिकृतींची नक्कल होते किंवा एखाद्या पटाची लाट आली आहे, म्हणून आपणही करु, या विचाराने जर का कलाकृती आणली तर ती यशस्वी होत नाही, हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे ‘शिवराजअष्टक’ यातून साकारले जाणारे प्रत्येक चित्रपट शिवभक्ती आणि छत्रपतींबद्दलच्या जाज्वल्य प्रेम आणि अभिमानामुळेच आम्ही करत आहोत आणि यापुढेही करत राहू!”