महायुतीची सत्ता, हीच महाराष्ट्राची इच्छा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
भाजप कार्यकर्त्यांशी पंतप्रधानांचा विशेष संवाद
16-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली : महाराष्ट्रात महायुतीची ( Mahayuti ) सत्ता यावी आणि महायुतीचे सरकार पाच वर्ष चालावे, अशीच महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 'मेरा बूथ सबसे मजबूत' कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला. यावेळी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या कारभाराचे प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित केल्याने महायुती सरकार मागील आघाडी सरकारपेक्षा वेगळे ठरले आहे. महायुती सरकार समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. महायुती सरकार आणि आघाडी सरकारमध्ये हाच फरक आहे. लोकांनाही हा फरक जाणवत आहे. महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळावर महाराष्ट्रातील जनता अत्यंत समाधानी आहे. त्यामुळेच महायुती सरकार पुढील ५ वर्षे सत्तेत राहावे, अशी जनतेची इच्छा असल्याचे आपल्याला महाराष्ट्रातील जनतेस भेटून जाणवले असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे कौतुक केले ते म्हणाले की, लोकशाहीच्या सर्वात मोठ्या तपश्चर्येसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही सर्वजण अथक परिश्रम घेत आहात. आता निवडणुकीचे दिवस अगदी जवळ आले आहेत. तुम्ही गेल्या अनेक महिन्यांत केलेली साधना सिद्धीस नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी अविरत कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
देशातील एससी, एसटी आणि ओबीसींचे फसवणूक हेच काँग्रेसचे धोरण असल्याचा टोला त्यांनी लगावला. जोपर्यंत देशातील एससी-एसटी-ओबीसी समाज जागरूक नव्हते, तोपर्यंत काँग्रेस केंद्रात पूर्ण बहुमताने सरकार बनवत असे. मात्र, जेव्हापासून एससी-एसटी-ओबीसी समाज एकत्र आले आहेत, तेव्हापासून काँग्रेसची स्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे काँग्रेसला आता एससी-एसटी-ओबीसी समाज तोडायचा आहे. त्याउलट महायुती सरकार समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या सरकारमध्ये आणि आघाडीच्या सरकारमध्ये हाच फरक असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.