श्रीलंकेला दिशा दाखवण्याची जबाबदारी दिसानायकेंकडेच!
राष्ट्रपती आणि संसदेत साम्यवादी ‘एनपीपी’ला बहुमत
16-Nov-2024
Total Views |
कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमारा दिसानायके ( Anurakumara Disanayke ) यांच्या ‘नॅशनल पीपल्स पॉवर’ (एनपीपी) पक्षाला श्रीलंकेत सुगीचे दिवस आले आहेत. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन जागांवरून थेट १२३ जागांवर दणदणीत विजय मिळवल्याने ‘एनपीपी’चा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दीर्घकाळ आर्थिक आणीबाणीचा सामना करणार्या श्रीलंकेला प्रगतीकडे नेण्यासाठी ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्या सर्वांवर कठोर कारवाईचे आणि गैरवापर झालेली श्रीलंकेची संपत्ती परत घेण्याचे आश्वासन मतदारांना देणार्या ‘एनपीपी’ने श्रीलंकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणली. श्रीलंकेच्या संसदेत एकूण २२५ जागा असून १२३ जागांवर दिसानायके यांच्या पक्षाने विजय मिळवला आहे. त्यामुळे श्रीलंकेत दीर्घकाळानंतर बहुमताचे सरकार सत्तेवर आले आहे.
मुदतपूर्व संसद विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय दिसानायके यांनी घेतला होता. त्यावेळी संसदेत दिसानायके यांच्या ‘एनपीपी’च्या फक्त तीन जागा होत्या. या निवडणुकीसाठी चनाका राजपक्षे यांनी ‘एनपीपी’ला पाठिंबा दिला होता.
“एनपीपी’ला मिळालेले बहुमत हे श्रीलंकेच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचे वळण असून श्रीलंकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून श्रीलंकेला मुक्त करून, सन्मान मिळवून देण्यासाठी आमचे सरकार काम करेल,” असे दिसानायके यांनी विजयानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
गेल्या काही वर्षांत श्रीलंकेची आर्थिक स्थिती नाजूक असून, माजी राष्ट्रपती गोटाबया राजपक्षे यांच्या वादग्रस्त भूमिकांमुळे श्रीलंकेची अशी स्थिती झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. परिणामी, श्रीलंकेला जागतिक नाणेनिधीकडून २.९ अब्ज डॉलर्सचे बेलआऊट पॅकेजही घ्यावे लागले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती झालेल्या दिसानायके यांनी मुदतपूर्व संसद विसर्जित करण्याचा जुगार खेळला होता, तो यशस्वी झाला आहे.
त्यामुळे राष्ट्रपती आणि संसद दोन्ही ठिकाणी ‘एनपीपी’चेच वर्चस्व असून, हा पक्ष विचाराने डाव्या साम्यवादी बाजूला झुकलेला आहे. श्रीलंकेच्या आर्थिक दुरवस्थेला त्याचे चीनवर अवलंबून राहणेदेखील कारणीभूत ठरले आहे. असे असले तरी, चीनचे सरकारदेखील डाव्या साम्यवादी विचारांचेच आहे, तर भारत तटस्थपणे आंतरराष्ट्रीय राजकारण करत आला आहे.
शिवाय, ‘शेजारी प्रथम’ या भूमिकेला न्याय देताना, भारताने श्रीलंकेला प्रत्येक आर्थिक संकटात सर्वात प्रथम सहकार्य केले आहे. त्यामुळे भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा श्रीलंकेचा अनुभव अतिशय चांगला आहे. तेव्हा, आता दिसानायके आणि त्यांचा पक्ष विचारधारेनुसार चीनकडे झुकतो की, भारताबरोबर मैत्री दृढ करण्याला प्राधान्य देतो, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.