‘लाल संविधान’ कम्युनिस्ट देशांचे असते आणि त्याच्या प्रत्येक पानावर मानवी रक्ताचे भरपूर डाग असतात. या ‘लाल संविधाना’शी आपला काहीही संबंध नाही. ज्याप्रमाणे जेम्स मॅडिसन यांना ‘अमेरिकन संविधानाचे पितामह’ म्हणतात, त्याप्रमाणे पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतीय संविधानाचे पितामह’ म्हणतात. अंतर्गत गोंधळ घालणार्या वेगवेगळ्या समूहांविषयी संविधान सभेत त्यांनी खूप इशारे दिलेले आहेत.
विधान म्हणजे काय रे भाऊ? संविधानाचे पुस्तक ‘लाल’ आहे का रे भाऊ? आणि काँग्रेसचे लोक ते हातात घेऊन का रे फिरतात भाऊ?” मोठ्या भावाला लहान भावाने विचारलेले हे प्रश्न. भाऊ म्हणाला, “सांगतो हा! लक्षपूर्वक ऐक म्हणजे समजेल. ऐकता ऐकता झोपू नकोस.”
भाऊ सांगू लागला -
संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा असतो. हा कायदा आकाशातून येत नाही किंवा परमेश्वर देत नाही. तो माणसांनाच तयार करावा लागतो. का तयार करावा लागतो?
या प्रश्नाचे उत्तर अमेरिकन संविधानाचे शिल्पकार जेम्स मॅडिसन यांनी दिले आहे आणि उत्तराचे साल आहे, १७८७. भाऊ, ऐकतोस ना! १७८७ साली अमेरिकेने जगातील पहिले लिखित संविधान तयार केले. तेव्हा अमेरिकेत १३ राज्ये होती. त्यातील नऊ राज्यांनी मान्यता दिल्यानंतर संविधानाची अंमलबजावणी सुरू होणार होती.
संविधान निर्मितीचा अमेरिकेचा हा प्रयोग अत्यंत नवीन होता. संविधानाने नवीन राज्य निर्माण होणार होते. (अमेरिका.) तेव्हा अमेरिकेतील लोक आपण आज आहोत, त्यापेक्षाही राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत होती. तरीदेखील सर्वांचे मिळून प्रजासत्ताक बनविणे का आवश्यक आहे, हे समजून सांगण्याकरिता जेम्स मॅडिसन आणि त्यांच्या सहकार्यांना अनेक निबंध लिहावे लागले. नंतर ते ‘फेडरॅलिस्ट पेपर’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. भाऊ, हे पुस्तक वाचल्याशिवाय संविधान काय असते, हे समजणे अवघड आहे.
त्यातील निबंध क्रमांक ५१ हा अति-अति महत्त्वाचा समजला जातो. त्यात जेम्स मॅडिसन म्हणतात, “जर मनुष्य समाज हा देवदुतांचा बनला असेल, तर त्याला शासनाची काही आवश्यकता नाही आणि जर देवदुतांमार्फत मनुष्य समाजशासित असेल, तरीदेखील समाज नियंत्रित करण्यासाठी शासनाची आवश्यकता राहणार नाही. म्हणून शासनपद्धतीची निर्मिती करीत असता, ज्यात माणसाने माणसांवर शासन करायचे आहे, तेव्हा प्रचंड अडचणी समोर येतात. सर्वप्रथम ज्यांच्यावर शासन करायचे आहे ते कोणत्या कायद्याने करायचे, हे शासनसंस्थेला निश्चित करावे लागते. त्याचवेळी ज्यांनी शासन करायचे आहे, ते कोणत्या कायद्याने बांधलेले राहतील, याचा निर्णयदेखील करायचा आहे. या सर्वांवर जनतेचा अंकुश हा सर्वोच्च उपाय असला, तरी अनेक वेळा तो उपायदेखील कार्यक्षम राहात नाही.”
भाऊ, थोड्या सोप्या भाषेत सांगायचे, तर संविधानाचा कायदा लोकांना बांधून ठेवतो आणि शासनकर्त्यांनादेखील बांधून ठेवतो. राज्यसत्ता काय असते? हेदेखील तुला समजावून सांगतो. राजसत्तेचा जन्मजात गुण किंवा अवगुण हा अनियंत्रित होण्याचा असतो. ती अनियंत्रित झाली की, तुझे-माझे स्वातंत्र्य धोक्यात येते. जीवन आणि संपत्ती धोक्यात येते. म्हणून घटनेचा कायदा हा शासनाला अनियंत्रित होऊ देत नाही. तू विचारशील, भाऊ, हे कसे काय होते? त्याचेही उत्तर देतो.
राज्यशक्तीची तीन अंगे असतात. १) कायदा करण्याची शक्ती. २) कायद्याची अंमलबजावणी करण्याची शक्ती आणि ३) न्यायदानाची शक्ती. या तीन ही शक्ती जेव्हा एका माणसाकडे असतात, तेव्हा त्याला ‘राजेशाही’ किंवा ‘हुकूमशाही’ म्हणतात. आपल्या देशाला अशा हुकूमशाहीचा अनुभव आणीबाणीच्या रूपाने इंदिरा गांधींनी दिला आहे. सर्वसामान्य नागरिक, प्रशासन आणि न्यायव्यवस्थाही त्यांनी वेठीस धरली होती. त्याच इंदिरा गांधींचे नातू राहुल गांधी ‘लाल संविधान’ नाचवत फिरत आहेत. या तीन ही शक्तीचे पूर्णत: विभाजन होते, तेव्हा तिला ‘लोकशाही’ म्हणतात. जेम्स मॅडिसनने या निबंधात या तीन शक्तींच्या त्रिभाजनाचा विषय अतिशय तर्कशुद्ध मांडलेला आहे. कायदेमंडळाला न्यायपालिकेत हस्तक्षेप करू देऊ नये. कार्यकारी मंडळाला कायदेमंडळामध्ये मन मानेल तसे हस्तक्षेप करू देऊ नये. न्यायालये स्वतंत्र असावीत. न्यायमूर्तींचे पगार ठरविण्याचे अधिकार केवळ कार्यकारी मंडळ किंवा कायदेमंडळ यांना देऊ नये, असे झाले म्हणजे मग, राज्यसत्ता अनियंत्रित होत नाही. याला एकमेकांवर अंकुश ठेवण्याची पद्धती असे म्हणतात.
देशाची घटना एक प्रजासत्ताक अस्तित्वात आणते. मनुष्य स्वभावाचे आणि विशेष करून राजकीय रचनेत राहणार्या समूहाच्या स्वभावाचे जेम्स मॅडिसन यांनी जे विश्लेषण केले आहे, ते खरोखरच प्रचंड विचार करायला लावणारे आहे. भाऊ, ऐकतोस ना! आता आपल्याला निबंध क्रमांक दहाकडे जावे लागेल.
मॅडिसन म्हणतात की, “आपण संघराज्य बनवीत आहोत. पण, त्याला अंतर्गत धोके खूप आहेत. हे धोके कोणापासून आहेत, तर भावनांचा समान आवेग तसेच दुसर्यांच्या अधिकाराचे हनन करण्याचा सुप्त हेतू, तसेच समाजाच्या सामूहिक हितसंबंधांवर संकटे निर्माण करण्याची प्रवृत्ती हे सगळे समूह दोष आहेत आणि ते संघराज्याच्या ऐक्यावर धोका निर्माण करू शकतात. हा धोका दूर करण्याचे दोन मार्ग आहेत,” असे मॅडिसन म्हणतात. पहिला मार्ग, अशा लोकांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा आहे. परंतु, हा मार्ग रोगापेक्षा उपाय भयंकर असल्याने तसे करता येणार नाही आणि दुसरा मार्ग सर्वांना जे काही बोलायचे असेल, ते सर्व बोलण्याची सुट देऊन टाकण्याचा आहे. हा ही मार्ग वाटतो तितका सोपा नाही. समाजातील माणसांचे स्वभाव पाहता एकमेकांशी संघर्ष करणार्या संकल्पना, हितसंबंध, भाव-भावना या राहतातच. लाभाचे असमान वाटप हे सगळ्यात मोठे असंतोषाचे कारण राहते. मॅडिसन यांनी त्याची काही उदाहरणे दिलेली आहेत. अशा प्रकारच्या अंतर्गत हेवेदावे, भांडण-तंटे हे समाजाची व्याप्ती जेवढी मोठी असेल तेवढ्या प्रमाणात त्यावर नियंत्रण आणणे सोपे जाते. एका प्रदेशातील हेवेदावे दुसर्या प्रदेशात परिणामकारक ठरत नाहीत.
भाऊ, जे संविधानाचे लाल पुस्तक घेऊन फिरतात, ते काही आपले मूळ संविधान नव्हे. आपले मूळ संविधान चित्रमयी आहे. त्यावर भगवद्गीता, रामायण, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंग, झाशीची राणी इत्यादी थोर लोकांची चित्रे आहेत. त्याचे मुखपृष्ठ अलंकृत आहे. लाल नाही. ‘लाल संविधान’ कम्युनिस्ट देशांचे असते आणि त्याच्या प्रत्येक पानावर मानवी रक्ताचे भरपूर डाग असतात. या ‘लाल संविधाना’शी आपला काहीही संबंध नाही. ज्याप्रमाणे जेम्स मॅडिसन यांना ‘अमेरिकन संविधानाचे पितामह’ म्हणतात, त्याप्रमाणे पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतीय संविधानाचे पितामह’ म्हणतात. अंतर्गत गोंधळ घालणार्या वेगवेगळ्या समूहांविषयी संविधान सभेत त्यांनी खूप इशारे दिलेले आहेत. त्यातील एका वाक्याचा भावार्थ असा आहे की, “आपले स्वार्थ साधण्यासाठी असंविधानिक मार्गाने गोंधळ घालणे हे अराजकाला निमंत्रण देण्यासारखे आहे.” पण, भाऊ वाचते कोण?
भाऊ, मला थोडे थोडे समजले. ‘लाल संविधान’ आपले नाही. बाबासाहेबांचे संविधान आपले आहे, एवढे तर मला समजले. मीही आता थोडा अभ्यास करतो.