नंतर विक्रम, प्रथम योजना...!

Total Views |
 
Iran-Iraq
 
इस्रायलला तर इराणला एकदा सणसणीत हात दाखवायचाच होता. मग, इस्रायलने काय केले? दि. २६ ऑक्टोबर २०२४च्या रात्री सुमारे १००इस्रायली बॉम्बर विमाने इराणकडे झेपावली आणि त्यांनी राजधानी तेहरान जवळच्या इस्लामशहर, इराण-इराक सीमेजवळील इलाम, इराणी आखातावरील महत्त्वाचे तेल उत्पादन केंद्र आबादान इत्यादी ठिकाणच्या लष्करी तळांवर बॉम्बफेक केली.
 
छत्रपती शिवरायांनी धर्मद्वेष्ट्या आणि देवद्वेष्ट्या अफजलखानाचा कोथळा काढला तो दिवस, हिंदू कालगणनेनुसार मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सह सप्तमी किंवा इंग्रजी कालगणनेनुसार दि. १० नोव्हेंबर हा होता. त्यामुळे ठिकठिकाणची शिवप्रेमी मंडळे त्यांच्या-त्यांच्या स्थानिक सोईनुसार मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला किंवा दि. १० नोव्हेंबर रोजी ’शिवप्रतापदिन’ साजरा करत असतात. यंदा विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे बहुतेक ठिकाणी तो परवाच्या दि. १० नोव्हेंबर रोजीच साजरा झाला. ठिकठिकाणच्या वक्त्यांनी, कथाकथकांनी शिवरायांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आवर्जून सांगितले. अतिशय कुशलतेने काटेकोर योजना आखून महाराजांनी खानाला कसा आपल्या कचाट्यात आणला, याबद्दल खूप काही सांगितले गेले. तसे ते नेहमीच सांगितले जातेदेखील.
 
खानाला, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आणून ठार मारणे आणि त्याची संपूर्ण छावणी लुटणे, हा योजनेचा अर्धाच भाग होता. त्याच्या पुढचा अर्धा भाग फारसा सांगितला, चर्चिला जात नाही किंवा खानाला साफ बुडवल्याच्या आनंदात आपल्याला (म्हणजे आजच्या शिवप्रेमी अभ्यासकांना) त्याचा विसर पडतो, असे म्हटले पाहिजे. तो योजनेचा पुढचा अर्धा भाग म्हणजे पुढच्या फक्त १५ दिवसांत महाराजांनी वाईपासून कोल्हापूरपर्यंतचा संपूर्ण प्रदेश हिंदवी स्वराज्यात आणला. महाराजांचा सरसेनापती नेताजी पालकर याने वाईपासून थेट विजापूरच्या अलीकडे लक्ष्मेश्वरपर्यंतच्या विजापुरी प्रदेशाची मनसोक्त लूट केली, तर महाराजांचा सरदार दोरोजी हा घाटमाथ्यावरून कोकणात उतरला आणि त्याने आदिलशाहीची आर्थिक राजधानी जे दाभोळबंदर ते ताब्यात आणले.
 
हा नेत्रदीपक विजय म्हणजे ’फ्लूक’ नव्हता. त्यामागे उत्कृष्ट अशी योजना होती. या योजनेचे निर्माते होते अर्थातच स्वतः शिवराय. लक्षात घ्या, दि. १० नोव्हेंबर रोजीच्या दुपारी साधारण २ वाजता अफजलखान ठार झाला. इशारतीच्या तोफांचे बार ऐकल्यावर महाराजांच्या सैन्याने खानाच्या छावणीवर हल्ला चढवला. सूर्यास्तापर्यंत संपूर्ण छावणी साफ झाली. नंतर सर्व प्रमुख सेनापती प्रतापगडावर येऊन महाराजांना भेटले आणि त्याच मध्यरात्री महाराज वाईकडे निघाले. कोणत्याही प्रकारचे ‘सेलिब्रेशन’ करत बसले नाहीत. दि. ११ नोव्हेंबर रोजीच्या पहाटे वाईमध्ये पोचले सुद्धा. खानाचा पळून गेलेला मुलगा फाजलखान याच्या पाठलागावर गेलेला सरनोबत नेताजी महाराज पालकर तिथेच महाराजांना भेटला. एकाही दिवसाची विश्रांती न घेता, त्याच दि. ११ नोव्हेंबर रोजीच्या संध्याकाळी महाराज, नेताजी आणि दोरोजी तीन दिशांनी विजापुरी प्रदेशात घुसले. वाईपासून संपूर्ण सातारा प्रांत हस्तगत करत दि. २५ नोव्हेंबर रोजी महाराजांनी कोल्हापूर जिंकून जगदंबेसमोर दंडवत घातले. पुढच्या तीनच दिवसांत म्हणजे दि. २८ नोव्हेंबर रोजी किल्ले पन्हाळगड हा संपूर्ण कोल्हापूर प्रांताची किल्ली असलेला बुलंद दुर्ग जिंकून घेत महाराजांनी आदिलशाही हादरवून सोडली. असे विजय ’फ्लूक’ने म्हणजे, समोरून येणार्‍या वेगवान चेंडूला, डोळे मिटून आडव्या बॅटने फटका मारला आणि अनमानधपक्याने चेंडू सीमापार जाऊन चौकार मिळाला, असे मिळत नसतात. फार काटेकोर योजना आखलेल्या असतात, तेव्हाच असे विजय मिळतात.
 
आज आधुनिक काळात देशोदेशींच्या ‘लष्करी संघटना’ जगभरच्या अशा मोठमोठ्या लढायांचा कसून अभ्यास करत असतात. त्यावरून आज आपल्या देशाचे शत्रू कोण आहेत, त्यांच्याशी आपल्याला आज लढताना कोणत्या योजना आखाव्या लागतील, कोणते डावपेच लढवावे लागतील, यावर सातत्याने काम करत असतात. त्यानुसार युद्धसराव करत असतात. युद्धविषयक अभ्यासात याचे महत्त्वपूर्ण उदाहरण दिले जाते, ते ‘श्लायफेन’ किंवा ’श्लीफेन’ योजना या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका युद्धयोजनेचे.
 
सन १८७१ मध्ये जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला होता. पण, आज ना उद्या फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात पुन्हा युद्ध होणार, हे जर्मन सेनापती पक्के जाणून होते. जर्मनी आणि फ्रान्स यांच्या सरहद्दी एकमेकींना लागूनच होत्या. म्हणून जर्मन सेनापती जनरल आल्फे्रड फॉन श्लायफेन याने अशी योजना आखली की, जर्मन सैन्याने प्रथम बेल्जियम देश जिंकावा आणि तिथून ‘यूटर्न’ घेऊन फ्रान्सवर घसरावे. ही योजना मांडून जनरल श्लायफेन निवृत्त होऊन मरूनसुद्धा गेला. पण, जर्मन सेना वर्षानुवर्षे ही योजना अभ्यासात आणि पक्की करत होती. अखेर १९१४ साली जर्मनांनी ही योजना प्रत्यक्षात उतरवली आणि फ्रान्स सैन्याला पळता भुई थोडी झाली.
 
आज अगदी अशाच प्रकारे इराणच्या अणुभट्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायली सेना वर्षानुवर्षे योजना आखून सराव करत आहेत. तुम्हाला आठवत असेल तर, १९८१ साली इस्रायलने इराकच्या ‘तुवैथा’ अणुप्रकल्पावर आकस्मिक हल्ला चढवून ‘ओसिराक’ नावाची अणुभट्टी उद्ध्वस्त केली होती. इराकचा तत्कालीन हुकुमशहा सद्दाम हुसैन हा रडत-रडत ‘युनो’कडे गेला होता. त्यापलीकडे इस्रायलवर प्रतिहल्ला चढवण्याची त्याची हिंमत झाली नव्हती. असे म्हटले जाते की, त्याही आधी १९७७ साली इस्रायलचे तत्कालीन संरक्षणमंत्री मोशे दायान हे गुप्तपणे दिल्लीला येऊन तत्कालीन भारतीय पंतप्रधान मोरारजी देसाई यांना भेटले होते. इस्रायली बॉम्बर विमाने इस्रायलमधून भारतात येतील, पेट्रोल भरून घेतील (रिफ्युएल) आणि पाकिस्तानचा काहूटा येथील अणुप्रकल्प उद्ध्वस्त करून परत जातील, अशी जबरदस्त योजना त्यांनी मांडली होती, असे म्हणतात. पण, मोरारजींनी संमती दिली नाही, असे सांगितले जाते.
 
दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी धार्मिक उत्सवात मग्न असलेल्या इस्रायली नागरिकांवर ‘हमास’च्या अतिरेक्यांनी आकस्मिक हल्ला चढवला होता. या घटनेला आता एक वर्ष उलटून गेले आहे. इस्रायली सेना गाझा पट्टीतल्या ‘हमास’च्या अतिरेक्यांना तर वेचून-वेचून मारतेच आहे. पण, तिने आता लेबेनॉन देशातल्या ‘हमास’ आणि ‘हिजबुल्ला’ या दोन्ही अतिरेकी संघटनांच्या अड्ड्यांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. अतिरेक्यांच्या पेजर यंत्रांचे एकाच वेळी स्फोट घडवून असंख्यांना ठार करून व जबर जखमी करून इस्रायलने आपल्या अतिप्रगत तंत्रज्ञानाचा नवा दाखला जगासमोर ठेवला आहे. ‘हमास’, ‘हिजबुल्ला’ या संघटना खरे म्हणजे अरब अतिरेक्यांच्या. पण, आता इराण त्यांना पाठिंबा देत आहे. एप्रिल २०२४ साली इराणने इस्रायलच्या गोलन हाईट्स भागात ड्रोन्स, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. इस्रायलने यातली बहुतेक अस्त्रे हवेतच कापून टाकली. गेल्या महिन्यात म्हणजे दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी इराणने सुमारे १८१ बॅलेस्टिक अस्त्रांचा मारा इस्रायलवर केला. आता खरे म्हणजे, इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ला करण्याचा युद्ध सराव वर्षानुवर्षे करणार्‍या इस्रायली सेनेला तो सराव प्रत्यक्षात उतरवण्याची ही सुवर्णसंधी होती.
 
पण, इस्रायलने ते केले असते, तर अर्थातच पूर्ण जगात युद्धच सुरु झाले असते आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक तर तोंडावर आलेली होती. त्यामुळे आत्ता युद्ध पेटणे अमेरिकेला नको होते. पण, इस्रायलला तर इराणला एकदा सणसणीत हात दाखवायचाच होता. मग, इस्रायलने काय केले? दि. २६ ऑक्टोबर २०२४च्या रात्री सुमारे १०० इस्रायली बॉम्बर विमाने इराणकडे झेपावली आणि त्यांनी राजधानी तेहरान जवळच्या इस्लामशहर, इराण-इराक सीमेजवळील इलाम, इराणी आखातावरील महत्त्वाचे तेल उत्पादन केंद्र आबादान इत्यादी ठिकाणच्या लष्करी तळांवर बॉम्बफेक केली.
 
ही बॉम्बफेक करून आपण काय साध्य केले, हे इस्रायलने जाहीर केलेले नाही किंवा या हल्ल्यामुळे आपले काय नुकसान झाले, हे इराणनेही जाहीर केलेले नाही. पण, युरोप-अमेरिकेत अनेक युद्ध अभ्यासक संस्था आहेत, ज्यांचे तज्ज्ञ विश्लेषक कायम अशा घटनांचा अभ्यास करून त्यांचे अहवाल लिहीत असतात. अमेरिकेच्या ‘नॅशनल जियो- स्पेशल इंटेलिजन्स एजन्सी’चा तज्ज्ञ ख्रिस बिगर्स याच्या निरीक्षणानुसार ‘एस-३००’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या क्षेपणास्त्र प्रणालीची इस्रालयने पूर्ण वाट लावली. मुळात रशियाची असलेली ‘एस-३००’ ही क्षेपणास्त्र प्रणाली इराणने (सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम) राजधानी तेहरानजवळच्या इस्लामशहर इथे ठेवली होती. समजा, शत्रूची १०० विमाने येत आहेत, तर ती विमाने सुमारे 35 ते ४० किमी अंतरावर आली की, ‘एस-३००’ मधील रडार यंत्रणेला त्यांचा सुगावा लागतो. मग, त्यांचा नीट मागोवा घेत, त्यांचा वेग, त्यांची क्षमता या सगळ्यांचा अंदाज घेत, एकाच वेळी १०० विमाने टिपणारी क्षेपणास्त्रे या प्रणालीमधून डागली जातात. हे सगळे काम संगणकाद्वारे अल्पावधीत केले जाते. इस्रायली विमानांनी ‘एस-३००’ प्रणालीची रडार यंत्रणाच उद्ध्वस्त केली. प्रतिकार करणार्‍या योद्ध्याचे डोळेच फोडले.
इराण-इराक सरहद्दीजवळ इलाम या लष्करी तळावर ‘गादिर’ किंवा ‘कादिर’ ही इराणने स्वत: विकसित केलेली रडार यंत्रणा आहे. ही यंत्रणा १ हजार, १०० किमी लांब आणि ३०० किमी उंचीवरच्या लक्ष्याचा माग काढू शकते. इस्रायली विमानांनी ‘गादिर’ रडार उद्ध्वस्त केले.
 
याहीपेक्षा परिणामकारक हल्ले शम्साबाद, परचीन आणि शारूड येथील लष्करी तळांवर झाले. इराणच्या लांब पल्ल्याच्या क्षेणणास्त्रांसाठी लागणारे प्रॉपेलर्स आणि बूस्टर्स हे यंत्रभाग इथे बनवले जातात. आता हे सुटे भाग इराणला रशियाकडून मागवावे लागतील आणि युक्रेन युद्धामुळे रशिया इराणला हे सुटे भाग पुरवण्याच्या स्थितीत नाही. इराणने ‘हिजबुल्ला’ संघटनेला भरपूर क्षेपणास्त्रे पुरवली होती. ती सगळी त्यांनी लेबेनॉनमधल्या आपल्या अड्ड्यांवर साठवून ठेवली होती. इस्रालयने ते अड्डेच उद्ध्वस्त केल्यामुळे इराणला ती क्षेपणास्त्रे ‘हिजबुल्ला’कडून परत मिळण्याचीही आशा नाही.
 
विशेष म्हणजे, ‘तालेघान-२’ या नावाने ओळखला जाणारा एक तळ इस्रायली विमानांनी उगीचच उद्ध्वस्त केला. पूर्वी या ठिकाणी अणु उत्पादन चालत असे. पण, साधारण आठ वषार्र्ंपूर्वी हे इथून अन्यत्र हलवण्यात आले होते. डेकर एलेव्हेथ या अमेरिकन तज्ज्ञाच्या मते हा हल्ला उगीचच नव्हता. इस्रायलने इराणला संदेश दिलाय की, तुमच्या वर्तमान अणु प्रकल्पाचीही आम्ही अशीच स्थिती करू शकतो. आमची योजना जय्यत तयार आहे.
 
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.