लाडक्या बहिणींची’ योजना बंद करू इच्छिणाऱ्या नाना पटोलेंना मतदान करणार का?
भाजपा विधानपरिषद गटनेते प्रविण दरेकरांचा सवाल
14-Nov-2024
Total Views |
भंडारा : (Pravin Darekar) लाडक्या बहिणींची योजना बंद करू इच्छिणाऱ्या नाना पटोलेंना मतदान करणार का? असा जाहीर सवाल भाजप विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला. साकोली विधानसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांच्या प्रचारानिमित्त तेथील जाहीर सभेत प्रविण दरेकर बोलत होते.
याप्रसंगी बोलताना नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार यांनी मुंबई हायकोर्टात लाडक्या बहिणींची योजना बंद करण्याबाबत याचिका दाखल केली होती. बहिणींच्या बाबतीत अशा प्रकारचे विचार असणाऱ्या नाना पटोलेंना आपण मतदान करणार आहात का? असा सवाल करत ही योजना अखंडपणे चालू ठेवण्यासाठी भाजप महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन दरेकर यांनी केले.
तसेच लाडक्या बहिणींच्या योजनेला पैसे कुठून आणणार असा सवाल एका बाजूला विचारतात आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दीड हजाराचे तीन हजार करणार सांगतात. त्यामुळे दुटप्पी भूमिका काँग्रेसची आहे. लाडक्या बहिणींसाठी, लखपती दीदीसाठी, महिलांच्या उत्कर्षासाठी महायुती हा सक्षम पर्याय आहे. म्हणून साकोली विधानसभेच्या मतदारांनी भाजपा महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांना आपले आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही दरेकरांनी केले.
दरेकर पुढे म्हणाले की, नाना पटोले महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. परंतु आजही साकोली विधानसभा विकासापासून पूर्णपणे वंचित आहे. २०-२५ वर्ष नेतृत्व करून जर आपल्या विधानसभेचा विकास करू शकत नसाल तर जनतेने तुमच्यावर का विश्वास ठेवावा, असा सवालही दरेकरांनी केला. म्हणून साकोली विधानसभेत परिवर्तन करा आणि ब्राम्हणकर यांना विजयी करा, असे आवाहनही दरेकरांनी केले.
आज महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सर्व विदर्भातील असल्याने या सगळ्या नेत्यांच्या प्रभावाचा, ताकदीचा उपयोग साकोली व विदर्भाच्या विकासासाठी होऊ शकतो. म्हणून आपले आशीर्वाद भाजप महायुतीला द्या, अशी विनंतीही दरेकरांनी उपस्थितांना केली. तसेच केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. राज्यातही आपले सरकार आले तर ताकदीने आपण विकास करू शकतो. त्यासाठी ‘विकासाला साथ द्या आणि कमळाला मत द्या‘, अशा प्रकारचे आवाहनही दरेकर यांनी केले.
या प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार सुनील मेंढे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश बाळबुदे, शिवराज निग्रेपुंजे, शाम जिंगरे, यशवंतराव सोनकुसरे, नागेश पाटील वाघाळे, मंगेश मेश्राम, अर्चना डेंगे, धोंडूराव व्यास, ज्योती सपाटे, भूवणे सर, अमराव बावनकुळे, उमराव आठवले, श्याम खेडीकर, त्रिवेणी पोहरकर, रंजना पटोळे, लता रोडे यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.