नवव्यांदा आमदार बनून रचणार वर्ल्ड रेकॉर्ड; कालिदास कोळंबकर यांना विश्वास
14-Nov-2024
Total Views |
मुंबई : (Kalidas Kolambkar) १९९० ते २०१९ अशा आठ विधानसभा निवडणुकीत सलग निवडून येण्याचा विक्रम आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नावावर आहे. ते नवव्यांदा निवडून आले, तर ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होईल. वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळालेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला हा संवाद.
आपण नवव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहात. या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी कशाप्रकारे तयारी सुरू आहे?
- एवढ्या वर्षांचा अनुभव, एवढ्या वर्षांची माझी बॅटिंग या मतदारसंघात आहे. जनतेला जे पाहिजे ते मी देतोय. त्यामुळे निवडणुकीची कोणतीही भीती मला नाही. मी या मतदारसंघातून सहज निवडून येईन.
भलेभले राजकारणी सलग बॅटिंग करताना आऊट होतात. तुम्ही सलग आठ वेळा निवडून आला आहात. ही किमया तुम्ही कशी साधली?
- इतरांच्या कामाची पद्धत आणि माझ्या कामाच्या पद्धतीमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. जे राजकारणात नाही सांगू शकत. काम करत राहणे आणि जनतेला जे हवे आहे ते देण्याचा मी प्रयत्न केला आहे.
तब्बल ४० वर्षांचा तुमचा राजकीय प्रवास आहे. पुढच्या पाच वर्षांत नायगाव-वडाळ्याच्या जनतेसाठी तुमचे व्हिजन काय असेल?
- संपूर्ण नायगावमध्ये विकासपर काम करण्यात मला यश आले आहे. माझा शिवडीतही मतदारसंघ आहे. ज्या भागात मुस्लीम
समाज वास्तव्यास आहे, त्या भागाचाही मी विकास केला. त्या भागातील जनतेला जास्तीत जास्त विकास कामे झालेली पाहिजे आहेत. म्हणूनच पुढील पाच वर्ष त्या भागातील विकासाला मी गती देणार आहे.
तुमचा विश्वविक्रम हुकवण्यासाठी विशेषतः उबाठा गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. श्रद्धा जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे मनसे आणि वंचितनेही उमेदवार दिले आहेत. या सर्वांच्या आव्हानाकडे तुम्ही कशाप्रकारे बघता?
- माझी नायगावची जनता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. सर्व समाज एकत्रितपणे माझ्यासोबत आहे. मला ‘गिनिज बुक’ यात समाविष्ट होण्याची तीव्र इच्छा आहे. म्हणूनच मी देवेंद्रजींना ‘मला उमेदवारी द्या’ अशी इच्छा व्यक्त केली आणि या विनंतीला मान्य करुन देवेंद्रजींनी मला उमेदवारी दिली याचा मला आनंद आहे.
पोलीस हाऊसिंगचा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा कालिदास कोळंबकर हे नाव प्रकर्षाने समोर येते. हा प्रश्न कधी मार्गी लागणार?
- पोलीस हाऊसिंगच्या संबंधात देवेंद्रजींनी जीआर काढला आहे. ही निवडणूक संपल्यानंतर त्या कामाला गती देणार आहेत. बीडीडी चाळीतील २०० पोलिसांना अपात्र केले होते. ते मी पात्र करून दिले. त्यांचाही जीआर निघाला आहे. हा प्रश्न निकाली लागल्यामुळे आता लवकरच निवडणुका झाल्यावर कामाला गती मिळेल.
महायुतीचा या निवडणुकीत पराभव होईल, असे विविध सर्व्हे समोर येत आहेत. तुमच्या प्रदीर्घ काळाच्या अनुभवानंतर याबाबत तुम्ही काय सांगाल?
- महायुतीमध्ये काम करणारे देवेंद्रजी, एकनाथ शिंदे, अजितदादा हे सर्व नेते तळागाळात काम करणारे नेतेमंडळी आहेत. त्यामुळे ही मंडळी कधीही, कुठेही चुकू शकत नाहीत. कशीही परिस्थिती असू दे पण, ते सत्तेवर येणार अशी खात्री आहे. विरोधातील नेते हे निवडून आलेले नेते नाहीत. त्यामुळे जनतेमधून निवडून येऊनच आम्हाला तत्त्वज्ञान शिकवावे या मताचा मी आहे.
‘लाडकी बहीण योजना’ ही पराभवाच्या भीतीने सुरू केलेली योजना आहे. असे विरोधक म्हणत आहेत. यावर काय सांगाल?
- तुम्ही कितीही चांगल काम करा. विरोधक हा टीकाच करणार. त्यांनी टीका केली नाही, तर त्यांना झोप येणार नाही, अशी परिस्थिती आहे. विरोधकांनी टीका केली तर ते टीकतील.
तुम्ही दिवस रात्र प्रचारामध्ये उभे राहत आहात. तुमचे प्रचारातले प्रमुख मुद्दे कोणते?
- मी केलेले काम हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या नायगावमध्ये आजवर स्विमिंग पूल नव्हता. या कामगार पट्ट्यामध्ये स्विमिंग पूल निर्माण करण्याचा ठराव मी पास केला. बॉम्बे डाईंगमध्ये ३० कोटींचा स्विमिंग तयार केला आहे. हे महत्त्वाचे काम आहे.
बीडीडी चाळीचे नाव बदलावे ही कित्येक दिवसांपासूनची मागणी होती. या नामांतराची लढाई तुम्ही जिंकला आहात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव चाळीला दिले गेले. ही लढाई कशी जिंकली. यामागचा इतिहास काय?
- ज्या पद्धतीने मागच्या सरकारने शरद पवार यांचे नाव चाळीला दिले. या विभागाचा स्थानिक आमदार या नात्याने नामांतराच्या बाबतीत मला विश्वासात घेणे अपेक्षित होते. तेव्हा विरोधात बसलो असलो तरी, विश्वासात घेणे गरजेचे होते. या भागातील विकासासाठी मी कित्येक वर्षे दिली आहेत. त्यावेळी विधानसभेत मी सांगण्याचा प्रयत्न केला. शरद पवार हे हयात आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ह्यात नाहीत. नाव ठेवताना काहीतरी विचार करावा. दुसरे म्हणजे मतदारसंघातून बाबासाहेब खासदारकीला उभे होते. या ठिकाणी त्यांचे हजारो अनुयायी राहत आहेत. एवढे असताना त्यांचे नाव का नको. त्यासाठी मला नाईलाजाने शरद पवार यांच्या नावाला विरोध करावा लागला.