महायुती म्हणजे गती आणि प्रगती, तर महाविकास आघाडी स्थगिती
14-Nov-2024
Total Views |
पेण : (Devendra Fadnavis) “आपली जी महायुती आहे, ती गती आणि प्रगतीची आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती आहे,” अशा शब्दात महायुती आणि महाविकास आघाडीमधील फरक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पेण येथे स्पष्ट केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी योजना राबवून राज्यात महायुतीचे सरकार गतिमान पद्धतीने काम करीत आहे. या सरकारला साथ देत महायुतीचे उमेदवार आ. रविशेठ पाटील यांना निवडून द्या,” असे आवाहनही त्यांनी केले.
महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ पेणमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या सभेस सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, खा. धैर्यशील पाटील, माजी आ. अनिकेत तटकरे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा अटल सेतू मी तुम्हाला अगोदरच देऊ शकलो असतो. पण, अडीच वर्षे नादान लोकांचे राज्य आले. त्यांनी खोडा घालत अटल सेतूची गती कमी केली. परंतु, मला आनंद आहे. आज पेण आणि मुंबईमधले अंतर काय आहे, हे लोकांना समजत नाही. पेणमधून निघून मुंबईपर्यंत सुसाट येता येते. कारण, अटल सेतू या ठिकाणी तयार झाला आहे. अटल सेतू हे गती आणि प्रगतीचे चांगले उदाहरण आहे.” याचप्रमाणे विरार-अलिबाग कॉरिडोअरच्या माध्यमातून गती वाढणार आहे. कॉरिडोजर करताना काही प्रश्न आहेत. परंतु, काळजी करू नका. आपल्या सरकारने कधीही शेतकर्यांची जमीन कवडीमोल भावाने घेतली नाही. पुढेही घेणार नाही. शेतकर्यांनी चिंता करु नये. हे सरकार शेतकर्यांसोबत आहे. योग्य दर देऊनच जमीन घेतली जाईल.
“आपण कोणत्याही गोष्टीची सुरूवात ही श्री गणेशाने करतो. पेण गणेशमूर्ती निर्मितीचे माहेरघर असल्याने गणेशाची उपासना आणि आराधना पेणशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे पेणच्या मूर्तिकारांनी काळजी करायचे कारण नाही. एवढी वर्षे अडचणीत येऊ दिले नाही. पुढेही अडचणीत येऊ देणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातच नाही, तर पूर्ण जगात पेणच्या मूर्ती आम्हाला श्री गणेशाचे दर्शन घडवतात. गणेशाच्या आशीर्वादाने तुमचे काम चालू राहील, हा आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल. निवडणूक संपल्यावर ‘बाळगंगा धरण प्रकल्प’ग्रस्तांची सभा मंत्रालयात घेतली जाईल,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. ‘तामसी बंदर विकास’, ‘धरमतर जेट्टी विकास’, गेट वे येथून वाहतूक सुरू करणाचे काम येत्या काळात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.