राज्य अधोगतीकडे नेल्यानेच महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले : मुख्यमंत्री

    14-Nov-2024
Total Views |

cm
 
कल्याण : (CM Eknath Shinde) “महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून टाकले,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, “या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहाता महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे,” असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
 
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणामध्ये जाहीर सभा घेतली. येथील स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या काळामध्ये महाराष्ट्र देशामध्ये तिसर्‍या स्थानावर फेकला गेला होता. मात्र, महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही अवघ्या सहा महिन्यांत महाराष्ट्र पुन्हा उद्योग व्यवसाय, गुंतवणूक, स्टार्टअप, पायाभूत सुविधा अशा प्रमुख क्षेत्रांत पहिल्या क्रमांकावर आणला. त्यासाठीच आम्ही राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली,” असे ते म्हणाले.
 
या सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ (आप्पा) शिंदे, माजी आ. नरेंद्र पवार, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी पाटील, संजय पाटील, महिला संघटक छाया वाघमारे, विधानसभा संघटक मयूर पाटील, माजी महापौर वैजयंती घोलप, माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर, श्रेयस समेळ, विद्याधर भोईर, गणेश जाधव, वैशाली भोईर, सुनील खारूक, रामदास कारभारी, युवासेनेचे सुचेत डामरे, प्रतीक पेणकर यांच्यासह महायुतीच्या मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.