मुंबई : “मुंबईत विशेषतः मालवणी परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या लोकसंख्येमध्ये महाविकास सरकारच्या काळात मोठी वाढ झाली. त्याबद्दल ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’चा अहवाल आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर त्याचे खापर फोडू नका. तुमच्यात हिंमत असेल, तर कृपया या जिहादी प्रवृत्तीबाबत भूमिका स्पष्ट करा,” असे आवाहन मुंबई भाजपचे सचिव प्रतिक कर्पे ( Pratik Karpe ) यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना दिले.
‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’च्या अहवालात २०५१ सालापर्यंत, गोवंडी, मानखुर्द, धारावी आणि कुर्ला या झोपडपट्ट्यांमध्ये रोहिंग्यांची संख्या वाढेल. तर हिंदूंची लोकसंख्या ही ५४ टक्क्यांपर्यंत येईल, असे म्हटले आहे. “१९६१ सालापासून आतापर्यंत हिंदूंची लोकसंख्या ८८ टक्क्यांवरून २०११ साली ६६ टक्के झाली आहे. तर, मुस्लीम लोकसंख्या १९६१ सालामधील आठ टक्क्यांवरून २०११ साली २१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. काही संस्था मुस्लिमांना ‘व्होट जिहाद’साठी भडकवत आहेत. धार्मिक भावनांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात,” असेही कर्पे म्हणाले.