राहुल गांधींची चौथी पिढी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
13-Nov-2024
Total Views |
धुळे : राहुल गांधींची चौथी पिढी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी धुळ्यातील दोंडाईचा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
अमित शाह म्हणाले की, "काँग्रेस पक्ष एसटी, एससी आणि विशेषत: मागासवर्गीयांच्या विरोधात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका गरीब आदिवासी घरातील महिलेला राष्ट्रपती बनवले. त्यांनी नीट, आयआयटी, नवोदय विद्यालय आणि केंद्राच्या शाळेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचे काम केले. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना उलेमा बोर्डाचे लोक भेटले आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली. पण मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण काढावे लागेल. मात्र, राहुल गांधींची चौथी पिढी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही. त्यांनी पूर्ण जीवनात तुष्टीकरण करण्याचे काम केले," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मोदीजींनी कलम ३७० हटवले. पण राहुल गांधींनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, राहुल गांधी तर सोडाच पण इंदिराजी स्वत: स्वर्गातून परत आल्या तरी कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही. काश्मीर हा भारताचा घटक असून त्याला कुणीही वेगळे करु शकत नाही. सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, मी गृहमंत्री असताना काश्मीरला जाण्याची मला भीती वाटत होती. पण शिंदेजी आता तुम्ही नाही तर मी गृहमंत्री आहे. तुम्ही तुमच्या नातवंडांना घेऊन काश्मीरला जा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. १०-१० वर्षे सोनिया, मनमोहन सरकार चालले. १०-१० वर्षे पाकिस्तानातून दहशतवादी येत राहिले आणि बॉम्बस्फोट करत राहिले. पण त्यांनी काहीही केले नाही. नरेंद्र मोदीजी पंतप्रधान असताना पुरी आणि पुलवामावर हल्ला झाला. त्यानंतर केवळ १० दिवसात पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांची सफाई केली. मोदीजींनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध केले," असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीला वोट बँकेची भीती!
"मनमोहन सिंग आपली अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर सोडून गेले. पण मोदीजींनी १० वर्षात देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणली. २०२७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची असेल. महाविकास आघाडीचे सगळे लोक खोटी आश्वासने देतात. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, पुर्ण करु शकणार तेच आश्वासन द्या. कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे हे खोटे बोलणारे लोक आहेत. परंतू, नरेंद्र मोदीजींचा वादा ही काळ्या दगडावरची रेघ असते. काँग्रेसने ७० वर्षांपर्यंत राम मंदिराचे काम लटकवून ठेवले. पण मोदीजींनी राम मंदिराची निर्मिती केली आणि 'जय श्री राम' म्हणून प्राणप्रतिष्ठादेखील केली. शरद पवार, सुप्रिया सुळे, राहुल गांधी यांच्यापैकी कुणीही प्राणप्रतिष्ठापणेला गेले नाहीत. त्यांना त्यांच्या वोट बँकेची भीती वाटते. परंतू, आम्ही या वोट बँकेला घाबरत नाहीत," असेही अमित शाह म्हणाले.