"उद्धव ठाकरेंनी जनादेशाशी गद्दारी केली नसती तर..."; विनोद तावडेंचे वक्तव्य
12-Nov-2024
Total Views | 214
सिंधुदुर्ग : २०१९ ला भाजप शिवसेना यूतीला बहुमत मिळाले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जनादेशाशी गद्दारी केली नसती तर आजचे चित्र दिसले नसते, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे. मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी ते कणकवली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. याप्रसंगी नितेश राणेदेखील उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले की, "राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. पण त्याचवेळी महायूती या योजनेवर इतके पैसे खर्च करते की, बाकीच्या योजना बंद पडतील, असे वक्तव्य शरद पवारांसारखे जेष्ठ नेते करतात. याचा अर्थ त्यांना लाडकी बहिण योजना नको आहे. पण दुसरीकडे, महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना ३ हजार रुपये देण्याची घोषणा केली. त्यामुळे या नेत्यांची ही दुटप्पी भूमिका सामान्य जनता ओळखून आहे."
"२०१९ ला भाजप शिवसेना यूतीला बहुमत मिळाले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जनादेशाशी गद्दारी केली नसती तर आजचे चित्र दिसले नसते. बाळासाहेब ठाकरे असते तर असे कधीच झाले नसते. एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ कशी सोडली याचे आजसुद्धा मला कोडं आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "लोकसभेला संविधानाच्या बाबतीतला फेक नरेटिव्ह राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गेंच्या भाषणातून आला नाही. तर सहा महिन्यांपूर्वी काही एनजीओ, अर्बन नक्षलांच्या माध्यमातून हा खोटा प्रचार झाला. याला त्यांनी वोट जिहाद हा शब्द दिला आणि यासाठी विदेशातून पैसे आले होते. पण आम्ही घटना बदलणार नाही, हे लोकांना जाऊन सांगितले आहे."
सिंधुदुर्गातील तिन्ही जागा महायूती जिंकेल!
"विधानसभा निवडणूकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई या महायूतीला स्पष्ट बहुमत मिळेल, याची मला खात्री आहे. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायूतीच्या काळात मोठे काम झाले. इथले स्थानिक आमदार नितेश राणे आणि दीपक केसरकर या सगळ्यांनी केलेले काम आणि लोकसभेला मिळालेला प्रतिसाद पाहता सिंधुदुर्गातील तिन्ही जागा महायूती जिंकेल हे चित्र स्पष्ट आहे. कोकणातील चाकरमानी आपली कामे घेऊन मुंबईत आमदारांना भेटतात. पण मतदानाच्या वेळी आपल्या गावात आपली उपस्थिती दिसल्यास गावाचा विकास अधिक जोमाने होईल. त्यामुळे चाकरमान्यांनी निवडणूकीला प्रत्यक्ष आले पाहिजे. महाराष्ट्रात स्पष्ट बहुमतापेक्षा अधिक चांगल्या जागा महायूतीच्या येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या राज्याला विकासाचे चित्र दिसेल. या निवडणूकीत पूर्ण कोकण पट्टयातील ७५ पैकी ६० च्या वर जागा महायूती जिंकेल," असा विश्वासही विनोद तावडेंनी व्यक्त केला.