ताडोबा ते कारवार व्हाया गोवा; 'टॅग' केलेल्या गिधाडाचा १,२०० किमी प्रवास

    12-Nov-2024   
Total Views |
BNHS tagged vulture



मुंबई (अक्षय मांडवकर) -
'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग' लावून चंद्रपूरातील 'ताडोबा व्याघ्र प्रकल्पा'त सोडलेल्या गिधाडाने कर्नाटक गाठले आहे (BNHS tagged vulture). १,२०० किलोमीटरचा प्रवास करुन हे गिधाड १० नोव्हेंबर रोजी कारवार शहारात पोहोचले (BNHS tagged vulture). नवदलाच्या तळाजवळ हे गिधाड पोहोचल्याने काही काळ खळबळ उडाली, मात्र सध्या हे गिधाड कारवार शहराच्या परिसरातच असून वन विभागाने त्यावर पाळत ठेवली आहे. (BNHS tagged vulture)
 
 
देशातून नामशेष होण्याच्या वाटेवर असणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी 'बीएनएचएस' गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. याअंतर्गत हरिणायातील पिंजोर येथे 'बीएनएचएस'ने गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली एकूण २० गिधाडे ही जानेवारी महिन्यात ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आली होती. ताडोबात १० पांढऱ्या पुठ्ठ्याची गिधाडे आणि पेंचमध्ये १० लांब चोचीची गिधाडे हलवण्यात आली. त्यांना याठिकाणी उभारण्यात आलेल्या जटायू संवर्धन केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. यामधील १० पांढऱ्या पुठ्ठ्याच्या गिधाडांंना 'जीपीएस टॅग' लावून ३ आॅगस्ट रोजी ताडोबामधील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. यामधील 'एन-१०' असा सांकेतिक क्रमांक असणाऱ्या मागी गिधाडाला सोडल्यानंतर ती ताडोबातील परिसरामध्ये वावरत होती. मात्र,रविवारी ही मादी कारवार शहरातील कोडीभाग येथील नदीवाडा परिसरात आढळून आली.

 
 
'एन-१०' असा सांकेतिक क्रमांक असणाऱ्या या मादी गिधाडाने खाद्याच्या शोधात १ नोव्हेंबर रोजी ताडोबामधून उड्डाण केल्याची माहिती'बीएनएचएस'च्या 'कॉन्झर्वेशन ब्रिडिंग स्पेशालिस्ट' डाॅ. काझवीन उमरीगर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. या गिधाडाने अमरावती, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, गोवा असा १,२०० किलोमीटरचा प्रवास करत कारवार गाठल्याचे त्यांनी सांगितले. नवदलाच्या तळाजवळच पाठीवर टॅग लावलेले गिधाड उतरल्याने काहीकाळ परिसरात संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कर्नाटक वन विभागाने या गिधाडाची माहिती काढून त्याला न पकडता नैसर्गिक अधिवासातच राहू दिले. सध्या ही मादी गिधाड कारवार परिसरातच संचार करत असून आम्ही वन विभागाला तिला न पकडता केवळ खाद्य टाकण्याचे आवाहन केले असल्याची माहिती उमरीगर यांनी दिली. 'कॉन्झर्वेशन ब्रिडिंग' प्रकल्पाअंतर्गत जन्मास आलेल्या अनेक गिधाडांना नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर खाद्य शोधण्यासाठी कष्ट करावे लागतात. या कष्टापोटीच ते असा लांबवरचा प्रवास केल्यानंतर एका जागी खाद्याच्या प्रतिक्षेत बसून राहतात. अशा पद्धतीने 'बीएनएचएस'ने ताडोबात सोडलेली एन-११ सांकेतिक क्रमांक असलेली मादी गिधाड गुजरातला पोहोचली आहे.
 
 
'जीपीएस- जीएसएम' यंत्रणा म्हणजे काय?
पक्षी स्थलांतर अभ्यासाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पक्ष्यांवर लावले जाणारे उपकरण त्यांच्या वजनाच्या २ टक्के असणे अपेक्षित आहे. ’जीपीएस’ आणि ’जीएसएम’ यंत्राचे वजन हे अनुक्रमे ३.५ ग्रॅम आणि १० ग्रॅम असते. त्यामुळे हे उपकरण लावण्यासाठी मोठ्या पक्ष्यांची निवड केली जाते. या दोन्ही उपकरणांमुळे वायरलेस पद्धतीने पक्ष्यांच्या स्थलांतरादरम्यानची माहिती संशोधकांना मिळते. ’जीपीएस’ उपकरणामुळे पक्ष्याचा स्थलांतरादरम्यानचा वेग, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि भौगोलिक स्थानाची माहिती मिळते, तर अत्याधुनिक ’जीएसएम’ उपकरणामुळे वर नमूद केलेल्या तीन गोष्टींबरोबरच स्थलांतरादरम्यानचा कोनीय वेग, वार्याचा दबाव, स्थलीय चुंबकत्व, प्रकाशाची तीव्रता आणि तापमानाची माहिती मिळण्यास मदत होते. सौर उर्जेवर हे उपकरण चालते. नेटवर्क न मिळाल्यास त्या ठिकाणांचे संचयन करुन नेटवर्क आल्यानंतर ती माहिती ही यंत्रे संशोधकांपर्यंत पोहोचवतात.
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.