निवडणुकीसाठी ९००० एसटी बसेस सज्ज

मुंबईतील १४०० स्कुल आणि बेस्ट बसेसचाही वापर होणार

    12-Nov-2024
Total Views |

st



मुंबई, दि.१२ : 
महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व पूर्वतयारी पूर्ण होते आहे. या मतदान प्रक्रियेत एसटी बसेस महत्त्वाची भूमिका बजावतात. यावेळी, एमएसआरटीसी, बेस्ट आणि शाळेच्या बसेस वापरात येतात. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने एसटी प्राधिकरणाकडे सुमारे ९२३२ बसेसची मागणी केली होती, जेणेकरुन या बसेस १९ नोव्हेंबर रोजी मतपेट्या मतदान केंद्रापर्यंत सुरक्षित जाऊ शकतील आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान संपल्यानंतर मतमोजणी स्थळी पुन्हा सुरक्षित पोहोचू शकतील.

हे पाहता, एसटीने या बसेस निवडणूक कामासाठी पाठविण्याची तयारी सुरू केली असून त्यात पोलीस प्रशासनाकडून मागवलेल्या ४९० बसेसचाही समावेश आहे. याशिवाय मुंबईबाबत सांगायचे झाले, तर निवडणूक आयोगाने बेस्टकडे ६०० बसेसची मागणी केली आहे. मात्र किती बसेस देण्यात येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आलेली नाही. याचसोबत मुंबईतील १००० स्कूल बस यावेळी वापरात येतील.

एसटीला फायदा 

निवडणूक काळात वापरण्यात येणाऱ्या वाहनांमधून प्राधिकरणाला नफा मिळतो. वाहनामागे ठराविक रक्कम दिली जाते, जी मार्ग निश्चित झाल्यानंतर ठरवली जाते. लोकसभा निवडणुकीदरम्यान एका बससाठी २४ ते ३० हजार रुपये देण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बसला किती रक्कम मिळणार हे मार्ग आणि किलोमीटर ठरवल्यानंतर स्पष्ट होईल.

मुंबईत बसचा वापर

मुंबई, ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या चार आरटीओ विभागांसाठी चालकांसह सुमारे १००० स्कूल बसेस पुरवल्या जातील. याशिवाय बेस्टकडून ६०० बसेसही मागवण्यात आल्या आहेत. मतदान यंत्रे आणि निवडणुकीसाठी लागणाऱ्या इतर वस्तूंची वाहतूक करण्यासाठी याचा वापर केला जाईल. तसेच, या बसेसचा उपयोग मुंबई आणि उपनगरात नियुक्त मतदान अधिकारी कर्मचारी आणि मतदारसंघात नेण्यासाठी केला जाणार आहे.

--------

एसटीच्या मालकीच्या एकूण बस - १३,३६७
 
निवडणुकीत वापरण्यात आलेल्या एसटी बसेस - ८९८७

पोलिस प्रशासनाकडून मागवलेल्या बस - ४९०

एकूण बसेस - ९२३२