'Trumpet' चिन्हाचे मराठी भाषांतर ट्रम्पेट असेच होणार, शरद पवारांना दिलासा!
01-Nov-2024
Total Views |
मुंबई : ( Trumpet Symbol ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 'ट्रम्पेट' या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरीत नाव तुतारी ऐवजी ट्रम्पेट असेच ठेवले जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत 'ट्रम्पेट' चिन्हाचे मराठी भाषांतर तुतारी असे केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसला होता. अनेकांना ट्रम्पेट आणि तुतारी यांच्यातील फारकत न समजल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. तसेच यामुळे त्यांची सातारा लोकसभेची जागा हातातून गेल्याचा दावा शरद पवार गटाच्या नेत्यांनी केला होता.
यासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. इंग्रजी वाद्य ट्रम्पेट आणि मराठी वाद्य तुतारी यांच्यात फरक असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सांगितले होते. दरम्यान, निवडणूक आयोगाने या निवडणूक चिन्हाबाबत आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मुक्त चिन्हाचे वाटप करत असताना ट्रम्पेटचे मराठी भाषांतर तुतारी न करता ट्रम्पेटच ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. २६ मार्च, २०२४ रोजी निर्गमित केलेल्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यासाठीच्या राज्यस्तरीय पक्षांच्या यादीमध्ये "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार" या पक्षाचा समावेश केला असून सदर पक्षाला "Man Blowing Turha" हे चिन्ह देण्यात आले आहे. सदर चिन्हांचे मराठी भाषांतर या कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या निवडणूक चिन्हांच्या तक्त्यामध्ये "तुतारी वाजविणारा माणूस" असे नमूद करण्यात आलेले आहे. तर ट्रम्पेट या चिन्हाचे मराठी भाषांतर देखील तुतारी असे करण्यात आल्याने दोन्ही चिन्हांच्या नावात साधर्म्य होते. या नाम सार्धम्यामुळे किंवा समान उच्चारामुळे प्रचारादरम्यान मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येतो, म्हणूनच मुक्त चिन्ह असलेल्या "ट्रम्पेट" या चिन्हांचे मराठी भाषांतर तुतारी असे वापरण्यात येऊ नये अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे केली होती, ही विनंती निवडणूक आयोगाने मान्य करत ट्रम्पेटचे मराठी भाषांतर तुतारी असे न करता ट्रम्पेट हेच ठेवले जाण्याचे आदेश दिले आहेत.