सलग दहाव्यांदा रेपोरेट 'जैसे थे'च! जीडीपीत ७.२ टक्के वाढीचा अंदाज
09-Oct-2024
Total Views | 36
मुंबई : नुकत्याच झालेल्या पतधोरण समितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)कडून रेपोरेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत रेपोरेट ६.५० टक्के इतका ठेवला आहे. पतधोरण समितीत रेपोदरात कुठलाही बदल न करता जैसे थे ठेवण्यात आला आहे. मागील फेब्रुवारी २०२३ पासून रेपोरेट दरात कुठलाही बदल केला नसून सलग दहाव्यांदा आरबीआयने बदल केलेला नाही.
दरम्यान, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये जीडीपी वाढ ७.२ टक्के राहिली असून चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ७.० टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. विशेष म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतील लवचीकता पाहता भू-राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात अर्थव्यवस्थेची वाढ स्थिर राहण्याची अपेक्षा आहे, असे आरबीआयने म्हटले आहे. तसेच, पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ ६.७ टक्के नोंदविण्यात आली आहे.
पतधोरण समितीतील सदस्य सौगता भट्टाचार्य, प्रो. राम सिंह, डॉ राजीव रंजन, डॉ. मायकेल देबब्रत पात्रा आणि गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट कायम ठेवण्यास मत दिले. डॉ. नागेश कुमार यांनी पॉलिसी रेपो रेट २५ बेसिस पॉइंटने कमी करण्याच्या बाजूने मत दिले. आरबीआय पतधोरण समितीची पुढील बैठक दि. ०४ ते ०६ डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहे.