"मेट्रोची कामं मविआच्या बालहट्टामुळे बंद पडली! चौकशी लावली पण आम्ही ती पूर्णत्वास नेतोयं!"
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका
05-Oct-2024
Total Views | 75
ठाणे : महाविकास आघाडीच्या बालहट्टामुळे मेट्रोची काम बंद पाडली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन पार पडलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या बालहट्टामुळे मेट्रो ३ चं काम बंद पाडलं. त्याची चौकशी लावा म्हणाले. पण मी काही चौकशी लावली नाही, नाहीतर आता हा कार्यक्रमच झाला नसता. अटलसेतू, समृद्धी, कोस्टल, मेट्रो, कारशेड या सगळ्या कामात त्यांनी स्थगिती आणली. पंरतू, दोन वर्षांपूर्वी आम्ही त्यांचा टांगा पलटी केला आणि त्यामुळेच हे प्रकल्प आज पुढे जात आहेत. मेट्रो ३ चा बीकेसी ते कुलाबा हा दुसरा टप्पादेखील लवकरच सुरु होईल. त्यामुळे मुंबईचा विकास हा ऐतिहासिक आहे. अनेक मोठमोठे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत."
"महाविकास आघाडीची अडीच वर्ष आणि आमची सव्वादोन वर्षांचा हिशोब मांडला तर दुध का दुध पानी का पानी होईल. कोविड रुग्णांची खिचडी खाणारे आम्ही नाही तर गोरगरिबांचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारं हे सरकार आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईचा सर्वात मोठा विकास होतो आहे," असेही ते म्हणाले.