अभिजात दर्जामुळे मराठी भाषा भारताचा अभिमान होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांचे ठाणे भाजपकडून आभार

    04-Oct-2024
Total Views |


Thane
 
ठाणे, दि. ४ : मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्यामुळे आता मराठी ही भारताचा अभिमान होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहराध्यक्ष वाघुले यांनी आभार मानले आहेत.
 
गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. अखेर, ऐतिहासिक व प्राचीन सांस्कृतिक वारसा असलेल्या मराठी भाषेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच न्याय मिळवून दिला. या निर्णयामुळे मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार आणि जतन करण्यास मोलाची मदत होणार आहे. अभिजात भाषेच्या दर्जामुळे उपलब्ध होणाऱ्या निधीतून संशोधनाला संधी मिळेल, अशी आशा भाजपाचे शहराध्यक्ष वाघुले यांनी व्यक्त केली.या निर्णयामुळे मराठी तरुण-तरुणींना शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. देशातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय उपलब्ध होईल.
 
लोकसाहित्य, संतचरित्र, प्राचीन ग्रंथाचे जतन, दस्तऐवजीकरण व डिजिटलायझेशन, भाषांतरामुळे मराठी भाषेचा प्रसार जगभरात वेगाने होईल. मराठीतील ज्ञानगंगा असलेल्या राज्यातील १२ हजार ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. सध्या आर्थिक संघर्ष करीत असलेल्या ग्रंथालयांना पुन्हा सुवर्णकाळात पोचण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरेल, असे वाघुले यांनी सांगितले.
 
मराठी भाषेला अभिजात दर्जा; शिवसैनिकांचा ठाण्यात जल्लोष
 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरु होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासानाने दिला. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानुन खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत शुक्रवारी आनंद आश्रम येथे पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी शिवसेना उपनेते गोपाळ लांडगे,शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे, शहरप्रमुख राम रेपाळे, हेमंत पवार,शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.