मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि मराठी मने आनंदाने न्हाऊन निघाली. मराठीचे माहेरघर असलेल्या पुण्यात साहित्यपंढरी असलेल्या या पुण्यनगरीत हा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होत आहे. जाहीररित्या तो साजरा होत असताना तो मनामनांत साजरा होत आहे, ते शब्दातीत.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि मराठी मने आनंदाने न्हाऊन निघाली. मराठीचे माहेरघर असलेल्या पुण्यात साहित्यपंढरी असलेल्या या पुण्यनगरीत हा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होत आहे. जाहीररित्या तो साजरा होत असताना तो मनामनांत साजरा होत आहे, ते शब्दातीत. या भूमीत गेल्या कित्येक दशकांत मराठी साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी या भाषेच्या समृद्धीसाठी कितीतरी मोठे कार्य केले. ही यादी खूप मोठी आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात मराठी भाषेला आलेली अवकळा इतकी निराशेत घेऊन गेली की, इंग्रजी भाषेचे भूत या मराठी माऊलीला कासावीस करू लागले होते. ज्या मराठी भाषेतून जगाला शिकवण देणार्या विचारांची पेरणी होत गेली, ती या अकाली अवैचारिक दुष्काळाने नष्ट होत राहिली. उदयास येणार्या नव्या पिढीला मराठी साहित्यातली सारस्वतांची नावे सांगता येत नाहीत, एवढी लाजिरवाणी अवस्था निर्माण झाली. काही मराठी शब्दांचे अर्थदेखील या नव्या पिढीतील तरुण तसेच शालेय विद्यार्थी सांगू शकत नाहीत, अशी अवस्था होऊन गेली. यात पालकांनी आणि शिक्षकांनी जसे कार्य करायला हवे, तसे न झाल्याने आणि भाषा शब्दबंबाळ होत असताना सामाजिक स्तरातूनदेखील प्रयत्न न झाल्याने मराठीतील अभिजात सौंदर्याची मजाच गेली. साने गुरूजी कोण, या प्रश्नाचे उत्तर इंग्रजी माध्यमात शिकणार्या विद्यार्थ्यांना देता आले नाही. मग कुसुमाग्रज, बालकवी, गोविंदाग्रज, कवी बी अशी टोपणनावे असलेली आपल्या मराठी भाषेला उच्च पदावर नेऊन ठेवणार्या मराठी लेखकांची मूळ नावे विचारायची तर सोयच नाही.
दुर्दैवाने प्रतिष्ठेचे नाव घेत अनेकांनी काहीही समजून न घेता, चक्क या भाषेचा चोथा केला. ‘मम्मी’, ‘डॅडी’ संस्कृतीच अधिक विस्तारली. ‘मायमराठी’ हे गोंडस नाव देऊन केवळ आंदोलने, वाद, करणे एवढेच हाती उरले. आजदेखील आता अभिजात दर्जा मिळाल्यावर केवळ आनंद व्यक्त करून नव्हे, तर या मराठी भाषेचे सौंदर्य एखाद्या अप्सरेप्रमाणे पिढ्यान्पिढ्या मोहित करीत राहील, असे कार्य प्रत्येकाने करून मराठी भाषा सदासर्वकाळ फुलवित राहिली पाहिज, तरच तिचे तेज झळाळून निघेल.
मी अडाणी...
अडाणी कोण, यावर अनेक मतांतरे असू शकतात. तथापि, ज्यांना मराठी शब्दांचे अर्थच माहीत नाहीत, त्यांनीदेखील याबाबत बोलणे, जरा हास्यास्पद आणि अतिरेकीपणाचे वाटते. आतादेखील काहीजण अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय? त्याने काय साध्य होणार? असे बालिश प्रश्न विचारून हा निर्णय झाला म्हणून नाके मुरडतात आणि त्या निर्णयामागील वेगळे अर्थ काढून त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी भाषा इतकी अप्रतिम आणि उपयुक्त आहे की, ती नीट बोलणार्याच्या प्रेमात कोणीही पडावं. अशी तिची नजाकत आहे. ती सौंदर्यदृष्टी निर्माण करण्याचे काम आता हा अभिजातपणा चिरंतन ठेवण्यासाठी करायचे आहे. त्यासाठी मराठी शब्दांची त्यांच्या अर्थांची उजळणी, घरोघरी नित्य पूजा-पाठ केले जातात तशी करायला हवी. कारण, संस्कार हे तेथूनच येत असतात. एकदा का ते अनुकरण बालपणीच रूजले, की मराठीच्या प्रेमात पडणे सोपे जाते. ‘मम्मी-डॅडी’ संस्कृती अधिक रूजली, ती रूजवणारेदेखील दुसरे तिसरे कुणीच नव्हते, तर आपलेच मराठी लोक होते. मात्र, हे कळण्याअगोदर अन्य भाषांनी अशी आक्रमणे केली की, ती थोपवायलादेखील कोणी धजावयाला तयार होईना, अशी स्थिती निर्माण झाली. यामुळे ‘हाय’, ‘हॅलो’ अशा संस्कारांना महत्त्व आले. इंग्रजी कविता सांस्कृतिक कार्यक्रमांतून गायला जाऊ लागल्या. त्यामुळे अडाणीपणा कोण करतंय, हे दिवसेंदिवस सिद्ध होत गेले. आपल्या घरातून उदयास येणार्या पिढीला कोणीही ‘बाबा मराठी भाषेतून शिक्षण घे’ किंवा ‘मराठी भाषा समजून घे’ असा आग्रह करीत नव्हते. ही निष्काळजीच अंगलट आली आणि मराठी विश्वात सुशिक्षित अडाण्यांची संख्या वाढू लागली. इंग्रजी भाषेतून शिक्षण घेऊन मराठी भाषेवर बोलले जाऊ लागले. मात्र, यातून काय बोध घ्यायचा, याचा उलगडा मध्यंतरी उदयास आलेल्या आपल्या मराठी पिढीला होत नव्हता. त्यामुळे मराठी दुय्यम भाषा आहे, हेच त्यांच्या मनावर प्रतिबिंबित होत गेले.
आता अभिजात दर्जा मिळाल्यावर तरी किमान भावी पिढीला अशा अडाण्यांनी भाषा शिकवू नये वा सल्ले देऊ नये, अशी अपेक्षा ठेवली, तर गैर वाटू नये.
लेखक - अतुल तांदळीकर