ग्रामीण भागात राहून, तिथल्या मातीशी इमान राखून वन्यजीव क्षेत्रासारख्या चोकीरीबाहेरच्या क्षेत्रात काम करणार्या आकाश भीमराव पाटीलविषयी...
लहानपणीच या मुलाच्या मनाला जंगलाची आणि त्या अनुषंगाने वन्यजीवांची रुची जडली. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळच होत. नियतीने या मुलाला जडलेली निसर्गाची आवड तोडण्याचा पुरेपुरे प्रयत्न केला. मात्र, काळ त्यामध्ये आडवा आला. काळाने असे काही चक्र फिरवले की, संगणकाच्या मायाजाळात अडकलेला हा मुलगा कुवार जंगलातील वाटांवर स्वैर झाला. स्वैर होईन त्याने आजतगायत वन्यजीव संवर्धन क्षेत्रात तळागाळात काम केले आहे. सह्याद्रीच्या मातीशी इमान राखत त्याच मातीतील वन्यजीवांसाठी तो सध्या काम करत आहे. हा मुलगा म्हणजे सह्याद्री ‘व्याघ्र प्रकल्पा’चा ‘इकोलॉजिस्ट’ आकाश भीमराव पाटील.
आकाशचा जन्म दि. 24 सप्टेंबर, 1993 साली सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील वाकुर्डे या खेडेगावात झाला. वडील भिमराव पाटील हे मूळचे शेतकरी. मात्र, ते ग्रामीण राजकारणात सक्रिय होते. शिवाय त्यांना जंगलाची देखील ओढ होती. सांगली जिल्ह्यातील शिराळा हा एकमेव तालुका कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात आहे. पश्चिम घाटाच्या कुशीत हा तालुका वसल्यामुळे सांगलीतील इतर तालुक्यांपेक्षा या तालुक्यामध्ये समृद्ध अशी जैवविविधता पाहायला मिळते. चांदोली राष्ट्रीय उद्यानासारखा जैवसमृद्ध परिसर हा याच तालुक्यात येतो. त्यामुळे भिमराव पाटील हे वरचे वर चांदोलीच्या जंगलात फिरण्यासाठी जात. त्यावेळी ते कटाक्षाने आकाशलादेखील घेऊन जात. तसेच, वाकुर्डे गावातदेखील जैवविविधता विपुल प्रमाणात होती. या सगळ्याचा प्रभाव आकाशच्या बालमनावर होऊन निसर्ग आणि जंगलाविषयी त्याची रुची वाढू लागली. त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण हे शिराळ्यातील विश्वास विद्या निकेतनमध्ये पार पडले. महाविद्यालयीन शिक्षण हे विज्ञान शाखेमधूनच घ्यावे. याबाबत आकाश ठाम होता. मात्र, त्याकाळी ग्रामीण भागातील शैक्षणिक अभिरुचीवर अभियांत्रिकी शिक्षणाचा पगडा होता. शिवाय, आकाशच्या घरीदेखील अभियांत्रिकी शिक्षणाचा प्रभाव अधिक असल्याने पुढील शिक्षण या क्षेत्रासंबधी घ्यावे हे पक्के झाले. त्यासाठी थेट पुणे गाठले आणि भारतीय विद्यापीठातून आयटी विषयामधून आकाशच्या अभियांत्रिक शिक्षणाला सुरूवात झाली. मात्र, मनात असलेली वन्यजीवांविषयीची हुरुहुर आकाशला शांत बसू देत नव्हती.
पुण्यातील शिक्षणादरम्यान आकाशने कात्रज सर्प उद्यानात स्वयंसेवक म्हणून काम करत वन्यजीवांविषयीची आपली रुची कायम ठेवली. मधल्या काळात या शिक्षणापासून पळवाट शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सर्प उद्यानात पूर्णवेळ काम मिळविण्याचा प्रयत्न केला. स्पर्धा परिक्षांचा मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयटी शिक्षण स्पर्धा परिक्षांसाठी ग्राह्य धरले जात नव्हते. त्यामुळे तो मार्गदेखील बंद झाला. सरतेशेवटी पुन्हा त्याच मार्गावर येऊन आयटीमधील पुढील शिक्षण घ्यायचे ठरले. कोल्हापूरमधील डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयात पुढील शिक्षण सुरू झाले. मात्र, आकाशाचे मन काही शांत बसेना. कोल्हापूरमधील सर्पमित्रांना गोळा करुन त्याने ‘डब्लूसीआरएस’ नावाची संस्था सुरू केली. त्यामाध्यमातून सर्प आणि इतर वन्यजीवांच्या बचावाचे काम सुरू केले. कोल्हापूरमधील शिक्षणादरम्यानच आकाशने सुट्टीच्या काळात डब्लूसीएस, ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’मध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले. मध्यप्रदेशातील कान्हाच्या जंगलात जाऊन व्याघ्र गणनेत सहभागी होऊन आपल्या अनुभवाच्या पोतडीत भर घातली. शिक्षण पूर्ण होण्याच्या कालावधीत त्याने कोल्हापूरमधील संस्थेची नोंदणी करुन, तिथल्या कामांची आखणी करुन ती संस्था सर्पमित्रांच्या हवाली केली आणि पुढे मार्गस्थ झाला. मन पुन्हा एकदा जंगलात रमू पाहत होते. मात्र, घेतलेले शिक्षण त्याला शांत बसू देत नव्हते. सरतेशेवटी नोकरीची वाट त्याने स्वीकारली आणि ‘इन्टेल’ या कंपनीमध्ये तो नोकरी करू लागला.
इन्टेल कंपनीमध्ये काम करुन आकाशने सहा महिने पूर्ण केले होते. मात्र, मन आतून खदखदत होते. ते जंगलाच्या ओढीने दिवसागणिक आयटी क्षेत्रात काम करणे त्याच्यासाठी मुश्किलीचे झाले होते. त्यामुळे सहा महिन्यानंतर एके दिवशी निर्णय घेऊन त्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि वन्यजीव क्षेत्रात असलेला आपला थोडा फार अनुभव आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या जोरावर त्याने वन्यजीव क्षेत्रात नोकरी शोधण्यास सुरूवात केली. वेळ देखील जणू काही आकाशचीच वाट पाहत होती. त्याच्यापाशी दोन ते तीन संधी चालून आल्या. त्यामधील दोन संधी या ईशान्य भारतामधील जंगलात काम करण्याच्या होत्या, तर एक सह्याद्रीच्या खोर्यात. आपण ज्या सह्याद्रीच्या कुशीत जन्मलो आणि वाढलो, त्या सह्याद्रीसाठीच काम करण्याचे आकाशने निश्चित केले. 2016 साली तो रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमधील एईआरएफ संस्थेत रुजू झाला. यापूर्वी सह्याद्री आणि कान्हामध्ये तळागाळात जाऊन काम करण्याचा अनुभव याठिकाणी त्याच्या कामी आला.
कोकणातील खासगी मालकीच्या जंगलातील आणि देवराईंमधील जैवविविधतेची सविस्तर नोंदणी करणे, त्यासंबंधीचा विस्तृत अहवाल तयार करणे, कॅमेरा ट्रेपिंगच्या माध्यमातून सस्तन प्राण्यांच्या नोंद करणे अशी कामे त्याने या काळात केली. याशिवाय 2017 साली त्याने शिराळा तालुक्यात समविचारी लोकांच्या मदतीने ‘प्लॅनेट अर्थ फाऊंडेशन’ नावाने एक संस्था देखील स्थापन केली. घाटमाथ्यावर वन्यजीव संशोधन आणि संवर्धनाचे काम करण्यासाठी व्यासपीठ निर्माण होणाच्या दृष्टीने या फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली होती. देवरूखमधील कामातून आकाशला स्थानिक पातळीवर तळागाळात काम करण्याचा अनुभव मिळत होता. परंतु, वन्यजीवविषयक शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या ज्ञानाचा अभाव जाणवत होता. हे ज्ञान शिक्षणातूनच मिळेल, याची त्याला खात्री होती. त्यामुळे 2019 साली देवरूखयेथील नोकरी सोडून त्याने पुन्हा पुणे गाठले आणि गरवारे महाविद्यालयात जैवविविधता विषयात पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासाला सुरूवात केली.
शिक्षणाबरोबरच आकाशाने ‘ग्रासरूट’ या संस्थेत देखील नोकरीला सुरूवात केली. कोरोनाचा काळ असल्याने ऑनलाईन शिक्षण आणि नोकरीचा मेळ साधला गेला. या शिक्षणादरम्यान आकाशला वन्यजीवांचे जीवशास्त्र उमगले. शिक्षणाच्या शेवटच्या वर्षातील संशोधनाकरिता त्याने सह्याद्रीचाच अधिवास निवडला. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या बफर क्षेत्रातील ‘इकोसिस्टम सर्व्हिसेस अॅण्ड ह्यूमम-वाईल्डलाईफ इन्टरॅक्शन’ या विषयावर त्याने संशोधन केले. याच काळात व्याघ्र प्रकल्पात ‘भारतीय वन्यजीव संस्थान’चे (डब्लूआयआय) संशोधन सुरू होते. त्यांच्या संसोधनातील एक मुद्दा आकाशच्या संशोधनाची सुसंगत असल्याने त्याने डब्लूआयआयसोबत काम करण्यास सुरूवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2022 साली आकाशने डब्लूआयआयच्या संशोधकांसोबत ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’त काम केले आणि 2023 साली तो व्याघ्र प्रकल्पात रूजू झाला.
सध्या ‘आकाश व्याघ्र प्रकल्पा’च्या ‘सह्याद्री व्याघ्र प्रतिष्ठाना’मध्ये इकोलॉजिस्ट या पदावर काम करत आहे. प्रतिष्ठानच्या ‘सह्याद्री वाईल्डलाईफ रिसर्च फॅसिलिटी’ अतंर्गत संशोधन आणि प्रबोधन अशा दोन्ही कामांची धुरी तो सांभाळतो. टायगर सेलअंतर्गत एम-स्ट्राईप या पचे वनकर्माचार्यांना प्रशिक्षण देणे, त्यामाध्यमातून वन्यजीवांच्या नोंदी घेणे. कॅमेरा ट्रपिंग करून वन्यजीवांची शास्त्रीय माहिती मिळवणे, राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या उपक्रमात समन्वय साधणे, सिटीझन सायन्स उपक्रमाअतंर्गत विविध प्रकल्पांची आखणी करणे, विद्यार्थ्यांना ‘इंटर्नशिप प्रकल्पा’अंतर्गत मार्गदर्शन करणे अशी बरीच कामे तो करत आहे. सध्या प्रकल्पात अधिवास असणार्या डढठ -ढ1 वाघावर देखील त्याची करडी नजर आहे. ग्रामीण भागात राहूनही मनात जिद्द आणि आवड असल्यास वन्यजीव क्षेत्रासारख्या चाकोरीबाह्य क्षेत्रात करिअर होऊ शकते, याचे आकाश उत्तम उदाहरण आहे. त्याला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!