मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्येच अजित पवारांची चौकशी सुरु झाली, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी आर. आर. पाटलांनी फाईलवर सही केली होती, असा आरोप केला होता. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आर. आर. आबा हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणे योग्य वाटत नाही. पण अजित पवारांची चौकशी ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळातच सुरु झाली, हे सत्य आहे."
अमित ठाकरेंना पाठींबा द्यावा ही भाजपची भूमिका!
"माहिममध्ये उमेदवार उभा करू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीदेखील मान्यता होती. परंतू, यात त्यांना काही अडचणी आल्या. कदाचित त्यांची मतं उबाठा गटाकडे जातील, असे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी तिथे उमेदवार उभा केला. परंतू, राज ठाकरेंनी त्या जागेसाठी पाठींबा मागितल्याने आपण अमित ठाकरेंना पाठींबा दिला पाहिजे, अशी भाजपची भूमिका कालही होती आणि आजही आहे," असेही फडणवीसांनी सांगितले.
मंगळवारी अनेक उमेदवारांनी विधानसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरांचे प्रमाण मोठे आहे. पण जास्तीत जास्त बंडखोर उमेदवारांना समजावून त्यांचे अर्ज कसे मागे घेता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी आमच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल."