उद्यमशीलतेचा जागर : रयतपेठ ते अमृतपेठ

    30-Oct-2024   
Total Views | 47

Amrit Sanstha
 
डोंबिवलीमध्ये नुकतेच पार पडलेल्या ‘अमृतपेठ प्रदर्शना’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र शासनाची ‘अमृत’ ही संस्था आणि ‘ध्रुव नॉलेज अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. लघु उद्योजकांना शहरातील बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, या हेतूने प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील उद्योजकतेसाठी कार्यरत असणार्‍या, शहरातील तरुणांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.
 
कवी बोरकर म्हणतात, “देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे,” निर्मितीचा ध्यास असलेल्या माणसांना धोपट मार्ग पसंत पडत नाही. चिखल मातीतून चालत आपली वाट आपण स्वतः निर्माण करू, हा ध्यास घेऊन जगणारी माणसं परिवर्तनाचे शिलेदार ठरतात. यांचा शोध घेणं तसं कठीण काम नाही. आपल्या अवतीभोवती ही माणसं वावरत असतात. तुमच्या माझ्या जीवनाची मुळं जिथे रुजली आहेत, त्या आपल्या गावच्या मातीत सुद्धा ही माणसं काही तरी वेगळं करू पाहत असतात. पण, त्यांच्या या प्रतिभेला, कामाला, योग्य तो न्याय मिळतो का? कोट्यवधी लोकांच्या या देशात आज स्वदेशीचा जागर पुन्हा सुरू असताना आपण त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो का? केवळ विक्रेताच नव्हे, तर उद्योजकाच्या भूमिकेत पुढे येऊ पाहणार्‍या गावातल्या माणसांना आपण शहरातल्या ग्राहकांशी जोडू शकतो का? डोंबिवलीचे विनोद देशपांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हाच विचार केला आणि उद्यमशीलतेच्या नव्या अध्यायला सुरूवात झाली.
 
ज्या समाजात आपण जन्माला आलो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून, ‘ध्रुव नॉलेज अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी’चा २०१९ साली जन्म झाला. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कलाकार, शेतकरी, एकल आणि महिला उद्योजक, महिला बचतगट या आणि अशा अनेक गरजू समाजघटकांसाठी शहरी बाजारपेठ उपलब्ध होणं हे एक आव्हान असतं. यावरच तोडगा काढण्यासाठी एखाद्या बाजारपेठेची स्थापना करता येऊ शकेल का, हा विचार पुढे आला. वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांनी एकत्र येणं, कल्पनेचं रूपांतर निश्चित ध्येय धोरणात करणं यात वेळ, पैसा, अशा अनेक गोष्टी खर्च पडत असतात. ध्रुवचे वेगळेपण याच गोष्टीत आहे की, असंख्य अडचणी आणि आव्हानं समोर असताना सुद्धा न डगमगता आपले कार्य त्यांनी सुरू ठेवले. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी वर्ग अर्थकारणाच्या जगात स्वत:ची अशी जागा निर्माण करण्यासाठी झटत असतो. त्यांच्या या प्रयत्नाला आपण मदतीचा हात द्यायचाच या उद्देशाने ध्रुवच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आणि ‘रयतपेठ’ या उपक्रमाचा जन्म झाला. २०२२ साली पहिल्यांदाच, या आगळ्यावेगळ्या प्रयोगाने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले. रयतपेठ भरवत असताना कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अनेक वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जात असताना, प्रत्येक जण काहीतरी नवीन गोष्ट शिकत होता. संस्थांना संपर्क करणे, उत्पादनांची आणि प्रदर्शनाची जाहिरात करणे ही कामं कार्यकर्ते हळूहळू शिकत गेले. ’रयतपेठ’ हा उपक्रम सर्वस्वी देणग्यांच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीवर चालत असल्याने ‘कार्यक्रमासाठी प्रायोजक मिळवणे’ ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी सुद्धा ध्रुवचे कार्यकर्ते लीलया पार पाडू लागले.
 
मुंबई जवळच्याच शहापूरपासून ते अगदी जळगाव, चंद्रपूर, जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांमधील महिला, तरूण उद्योजक या उपक्रमाशी जोडले गेले. ध्रुवच्या उपक्रमांसोबत अनेक स्वयंसेवी संस्था सुद्धा जोडल्या गेल्या. हाताने केलेले वीणकाम असो किंवा बांबूपासून बनवलेली उत्पादनं, वेगवेगळ्या प्रकराचे मसाले असो किंवा वारली हस्तकलेची उत्पादनं. डोंबिवली नगरीत एक समृद्ध बाजारपेठ आकाराला आली. २०२२ आणि २०२३ सालच्या या दोन वर्षांमध्ये २२ ते २५ स्टॉल्स या रयत पेठेत ग्राहकांसाठी सज्ज होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या लोकांना आपली हक्काची बाजारपेठ उभी करून देण्यात ‘ध्रुव’ यशस्वी झाली होती. दोन्ही वर्षी दोन हजारांपेक्षा जास्त ग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
 
दोन वर्षांच्या याच एकनिष्ठ केलेल्या कामामुळे, २०२४ सालामध्ये ‘ध्रुव’च्या कार्यकर्त्यांना कामाची एक नवीन वाट सापडली आणि उपक्रमासाठी नवीन सहयोगी लाभला. महाराष्ट्राच्या शासनाची स्वायत्त संस्था असणार्‍या ‘अमृत संस्थे’सोबत 58 स्टॉल्सशी उभारणी करण्यात आली. ‘अमृत संस्थे’च्या ‘स्वयं रोजगार’ आणि ‘कृषी आधारित उद्योग योजने’च्या माध्यमातून अनेका लाभार्थ्यांना याचा फायदा झाला. रयतपेठची पुढची आवृत्ती अमृतपेठ यातूनच जन्माला आली. उद्यमशीलतेचा कुठल्याही सीमांचे बंधन नसते. गरज असते ती फक्त योग्य त्या ठिकाणी योग्य त्या माणसांनी सेतू बांधण्याची.
 
‘निसर्गवेध’ या संस्थेच्या अंतर्गत, चंद्रपूर जिल्ह्यातील पिठेझरी गावात महिला विकास प्रकल्प कार्यरत असतो. या गावातील गोंड आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या कापडी बॅग्स शिवणे त्यावर ‘गोंडी पेंटींग’ करण्याचे काम तिथल्या महिला करतात. ज्यात कुठेही प्लास्टिकचा वापर केलेला नसतो. त्यांच्या विक्रीसाठी अमृतपेठचे दालन सज्ज होते. रोजगारामुळे महिलांचे आर्थिक सबलीकरण, त्यांच्या कौशल्याचा विकास यामुळे परिवर्तनाची नवी वाट निर्माण झाली आहे. ‘स्वयंसेवी संस्थे’च्या बरोबरच युवा उद्योजकांच्या पाठीशी ‘ध्रुव’ कशी उभी राहिली याचे उदाहरण पाहुया. वेदाव्रत फार्म हा प्रकल्प सुरू करणारे जळगावचे पियुष माळी म्हणतात, “आधुनिकतेच्या प्रवाहात आपण सगळे आपली प्राचीन संस्कृती आणि जीवनपद्धती हळूहळू विसरत चाललो आहोत. आपल्या घरामध्ये आपण असंख्य केमिकलयुक्त गोष्टींचा साठा करून ठेवतो आणि आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम झाले की, पश्चाताप करत राहतो. याच गोष्टीवर उपाय म्हणून गायीच्या पंचगव्यापासून तयार झालेल्या पदार्थांचा लोकांमध्ये प्रसार व्हावा, हा विचार ठेवत आम्ही वेदाव्रत फार्म ही संकल्पना पुढे आणली. यामध्ये गोनाईल, गोमूत्र, यासोबतच केमिकल विरहीत सौंदर्य प्रसाधनांचा समावेश आहे. अमृतपेठेच्या प्रतिनिधींसोबत आम्ही संपर्क साधला आणि डोंबिवलीत आलो. सकाळी स्टॉल लावल्यापासून आमच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. शहरातील लोकांचा स्वदेशी आणि शाश्वत अशा जीवनशैलीकडे कल असणे ही गोष्ट आनंददायक आहे.”
 
योग्य हेतूने कामाला सुरूवात झाली की, चांगली माणसं सुद्धा उपक्रमाशी जोडले जातात. यंदाच्या ‘अमृत पेठे’चे उद्घाटन श्रीपाद कुलकर्णी आणि मयुरेश गद्रे यांच्या हस्ते झाले. सोबतच टाटा समूहात अनेक दशकं काम केलेले माधव जोशी सुद्धा उपस्थित होते. दि. 26 आणि दि. 27 ऑक्टोबर रोजी डोंबिवलीतल्या स. वा. जोशी शाळेच्या पटांगणात ‘अमृतपेठे’चा सोहळा पार पडला. यावेळेस 58 स्टॉल्स ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होते. दोन्ही दिवस ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. ‘ध्रुव’च्या कार्यकर्त्यांच्या मते, हा उपक्रम आपल्याला वर्षभर सुरू ठेवता येईल का, या विचारात सगळे आहोत.
 
‘ध्रुव’च्या स्थापनेपासून सर्व उपक्रमांमध्ये कार्यात असणारे हेरंब ओक म्हणतात, “ ‘ध्रुव’ने कार्यकर्ता, व्यवस्थापक, संग्राहक वक्ता म्हणून अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘ध्रुव’चे अनेक कार्यकर्ते डोंबिवलीच्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी आधीपासूनच जोडले गेले आहेत. यामुळेच, ‘ध्रुव’च्या उपक्रमांमध्ये वैविध्यता येत राहते आणि कार्यकर्त्यांच्या उत्सवाला नवे धुमारे फुटत असतात. या व्यतिरिक्त साहित्याला वाहिलेली स्पर्धा ‘साहित्ययात्री ध्रुव’ गेली पाच वर्ष राबवत आहे. कोविड काळात जरी खंड पडला असला, तरी न थांबता ‘ध्रुव’ने पुन्हा एकदा ही स्पर्धा आयोजित केली आणि वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.” पुस्तकं वाचणार्‍या माणसांनी एकत्र यावं, आठवड्यातील एक दिवस एका पुस्तकावर बोलावं. सदर विषयावर चर्चा व्हावी या साध्या हेतूने ’शब्दांगण’ या उपक्रमाची सुरूवात झाली. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यापासून ते भैरप्पा यांच्या कादंबर्‍यांपर्यंत अनेक विषयांवर चर्चा केली गेली. डोंबिवलीमध्ये या संस्थेचा उपक्रम अजूनही सुरू आहे. बोरकरांनी आपल्या कवितेमध्ये देखणी ती पाऊले, जी ध्यास्पंथी चालती असे म्हटले आहे. सामाजिकतेचे भान ठेवून चालणारी ही पाऊलं नव्या पिढीसाठी आदर्श आहेत यात शंकाच नाही.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा
तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीडीए प्रशासनाने पोलिस आणि इतर विभागांसह सोमवार, दि. ५ मे रोजी तैमूर नगर नाल्याभोवतीच्या अतिक्रमणांविरुद्ध मोठी कारवाई केली. नाल्याच्या नऊ मीटर परिसरात असलेल्या अनेक बेकायदेशीर इमारती आणि त्यांच्या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींनी नाल्याजवळील जमिनीवर अतिक्रमण केले होते. आतापर्यंत, बेकायदेशीरपणे बांधलेली १०० हून अधिक घरे आणि दुग्धशाळा पाडण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिस ..

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध : कृषी आयुक्त सुरज मांढरे

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध : कृषी आयुक्त सुरज मांढरे

(Agriculture Commissioner Suraj Mandhare) शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" अंतर्गत मंत्रलायामध्ये परिषद सभागृह, ६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावर कृषी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121