रशिया-युक्रेन युद्धाला अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला. परंतु, अद्याप यातून काही मार्ग निघालेला नाही. आतापर्यंत या युद्धात हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र, तरीही युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. हे युद्ध आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. कारण, रशियाचा मित्र उत्तर कोरियासुद्धा युक्रेनविरुद्धच्या युद्धात उतरल्याचे दिसते. युक्रेनच्या विरोधात मॉस्कोला पाठिंबा देण्याकरिता उत्तर कोरियाने आपले दहा हजार सैनिक रशियाला पाठवल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ अर्थात ’नाटो’ने उत्तर कोरियाचे काही सैनिक आधीच रशियामध्ये पोहोचल्याचे म्हटले आहे.
रशियामध्ये उत्तर कोरियाचे सैन्य तैनात होणे, हे धोकादायक असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिली आहे. ‘नाटो’चे महासचिव मार्क रुटसुद्धा या घटनेची पुष्टी करत म्हणाले की, “उत्तर कोरियाचे सैन्य रशियाला पाठवले गेले आहे आणि कुर्स्क प्रदेशात उत्तर कोरियाच्या सैन्य तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.” या घडामोडीवर ‘पेंटागॉन’ने देखील दावा केला आहे. त्यांच्या मते, “हे सैनिक युक्रेनविरुद्ध लढत आहेत. या सैनिकांना प्रशिक्षणाच्या नावाखाली रशियाला पाठवण्यात आले आहे. रशिया युक्रेनविरुद्धच्या युद्धात उत्तर कोरियाच्या सैन्याचा वापर करत असून तो चिंतेचा विषय आहे.”
जून महिन्याच्या सुरूवातीला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उत्तर कोरियाला भेट दिली होती. 24 वर्षांनंतर त्यांनी केलेला हा उत्तर कोरियाचा दौरा होता. तेथील प्योंगयांग विमानतळावर उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी पुतीन यांचे स्वागत केले. यापूर्वी सप्टेंबर 2023 सालामध्ये दोघांची भेट झाली होती. मधल्या काळात उत्तर कोरियाने रशियात 1 हजार, 500 सैनिक पाठवले असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, उत्तर कोरियाने हे दावे सपशेल खोटे असल्याचे सांगितले. उत्तर कोरिया आणि रशियाने सातत्याने यासंबंधी अफवा असल्याचे सांगत लष्करी कारवायांना नकार दिला. मात्र, दक्षिण कोरियाच्या गुप्तचर प्रमुखांच्या माहितीनुसार युक्रेनविरुद्ध युद्धभूमीवर तैनात करण्यापूर्वी सुमारे तीन हजार उत्तर कोरियन सैनिकांना रशियामध्ये ड्रोन आणि इतर उपकरणांचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
या संपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि विशेषतः उत्तर कोरियाच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा आक्षेप घेतला जात असून, ‘पेंटागॉन’ आणि ‘नाटो’ अशा परिस्थितीत सतर्क राहिले आहेत. जर या युद्धात उत्तर कोरियन सैनिकांचा प्रत्यक्ष सहभाग आढळला, तर युद्धाच्या व्याप्तीत हा महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतो. ‘सीएनएन’च्या वृत्तानुसार, सैन्याला एक फॉर्म भरण्यास सांगितला होता; जो फॉर्म रशियन भाषेत असून त्याला कोरियन भाषेतील पर्यायही देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये उत्तर कोरियाचे सैनिक रशियन-चिनी सीमेजवळ असलेल्या सर्गेव्हका ट्रेनिंग ग्राऊंडवर पोहोचल्याचे दिसते. अशात आता किम जोंग उन यांनी युक्रेनमध्ये रशियन आक्रमणाचे समर्थन केले आहे.
रशियन वृत्तसंस्था ‘इंटरफॅक्स’च्या एका अहवालानुसार त्यांनी म्हटले की, उत्तर कोरियाचा उद्देश हा ‘रशियासोबत धोरणात्मक संबंध’ अधिक मजबूत करणे हा आहे. याबाबत भारताची भूमिका पाहता, भारताने रशिया आणि युक्रेन युद्धात कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. भारताने दोन्ही देशांना आतापर्यंत चर्चेतून मार्ग काढावा, असेच आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांना युद्धाच्या काळात भेट दिली होती. त्यांनी दोन्ही देशांना सातत्याने शांततेचे आवाहन करत चर्चेतून मार्ग काढण्याचे सूचविले होते. या दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींबाबत मोठे वक्तव्य केले. “रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यात पंतप्रधान मोदी मोठी भूमिका बजावू शकतात,” असा विश्वास युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला होता. सध्या अशी चर्चा आहे की, किम जोंग उन यांच्या सैन्याच्या सहभागामुळे रशियाला फायदा होऊ शकतो. असे वातावरण असताना आता युक्रेनची भूमिका काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक