भारत सरकारने ‘इनोव्हेटिव्ह फार्मर’, राज्य सरकारने ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित केलेल्या मराठवाड्यातल्या विद्या रूद्राक्ष यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारा हा लेख...
विद्या महादेव पाचेगावकर म्हणजे आजच्या विद्या बाबुराव रूद्राक्ष यांनी सेंद्रिय शेतीमध्ये स्वत:चा ठसा उमटवला. ‘इनोव्हेटिव्ह फार्मर’ म्हणून केंद्र सरकारकडून, तर राज्य शासनाकडून ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ तसेच, ‘अॅग्रो वन महाराष्ट्र स्मार्ट महिला शेतकरी’ सन्मानासोबतच ‘वुमेन्स ऑफ इंडिया’ म्हणून दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई येथे त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. ‘जलस्वराज’ प्रकल्प अंतर्गत महिला विकास प्रकल्प अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्याअंतर्गत महिलांच्या मूलभूत गरजा तसेच, शेतीसंदर्भातील समस्यांवरही त्यांनी काम केले. सेंद्रिय शेतीसोबतच त्यांनी पूरक व्यवसायालाही सुरूवात केली. स्वत:चा ‘रूद्राक्ष ऑर्गेनिक’ हा ब्रॅण्ड विकसित केला. या बॅ्रण्डच्या माध्यमातून अनेक धान्य आणि धान्यउत्पादित वस्तूंची निर्मिती आणि विक्री त्या करतात. आकाशवाणी, दूरदर्शन आणि विविध प्रसारमाध्यमांसह देशभरातील सर्वच शेतीसंबंधित व्यासपीठांनी त्यांची दखल घेतली. त्यांनी परिसरातील १८० महिलांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले. विद्या यांनी शेतकरी महिलांचा ‘कल्पना चावला’ या नावाने बचतगट बनवला. त्या प्रेरणेने इतरही अनेक बचतगट बनले. महिला आर्थिक सक्षम होत गेल्या. इतकेच नाही, तर त्यांनी गावात महिलांचा खोखो आणि कबड्डीचा संघही बनवला. या महिला संघाने जिल्हा स्तरावरची स्पर्धाही जिंकली होती.
विद्या यांचा हा प्रवास कसा झाला असेल? विद्या बाबुराव रूद्राक्ष यांचे सेंद्रिय शेती पद्धतीतले कर्तृत्व आणि योगदान हे काही ‘पी हळद आणि हो गोरी’ या पद्धतीचे नाही, तर त्यामागे अनेक वर्षांची पार्श्वभूमी आहे. पिता महादेव पाचेगावकर हे पशुवैद्यकीय डॉक्टर आणि पती बाबुराव रूद्राक्ष हे कृषीविकास अधिकारी. या दोघांचेही सहकार्य, मार्गदर्शन यातून विद्या यांचे कर्तृत्व स्वयंप्रकाशित होत गेले. विद्या यांचे पिता महादेव पाचेगावकर हे त्यांच्या नोकरीनिमित्त पुण्यात असायचे. पुढे ते त्यांच्या पुन्हा मूळगावी म्हणजे लातूरच्या पोहरेगाव येथे आले. तिथे ते शेती करू लागले. पण, ते सेंद्रिय शेती करतात. रासायनिक खतांचा वापर त्यांनी कधीही केला नाही. एके दिवशी असे झाले की, बाजूच्या शेतात सोयाबिनच्या पिकावर रासायनिक खत फवारले होते. शेतात मोर आला आणि त्याने त्या शेतातल्या शेंगा खाल्ल्या. रासायनिक खत फवारलेल्या शेंगा खाल्ल्यामुळे मोराला विषबाधा झाली आणि तो मरणासन्न झाला. महादेव हे पशुवैद्यकीय डॉक्टर होते. यांनी त्या मोराला आपल्या शेतात आणले. त्याच्यावर उपचार केला आणि काही दिवसांनी तो मोर पिसारा फुलवून नाचला. हा सगळा घटनाक्रम महादेव यांची लेक विद्या यांनी पाहिला होता. पशू-पक्ष्यांवर रासायनिक खतांचा होणारा परिणाम त्यांच्यासारखेच सजीव असणार्या माणसांवरही होतच असेल, असे त्यांना वाटले.
असो, लहानपणी त्या अभ्यासासोबतच कबड्डी आणि खोखो खेळात प्रविण होत्या. तरीही विद्या यांचे बालपण चाकोरीबद्ध पद्धतीतलेच होते. त्यांनी बारावीनंतर वैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरवले. मात्र, एका गुणाने त्यांचा प्रवेश हुकला. त्यावेळी आर्थिक आणि सामाजिक सुबत्ता असली तरीसुद्धा शैक्षणिक संधीसंदर्भात माहिती तिथे कुणालाच नव्हता. त्यामुळे तिथे प्रवेश मिळाला नाही, तर केवळ ‘बीएससी’पर्यंत शिक्षण घ्यायचे असेच त्यांना वाटले. त्यांनी ‘मायक्रोबायोलॉजी’ विषयाचे शिक्षण सुरू केले. महाविद्यालयाच्या दुसर्या वर्षातच त्यांचा विवाह आंबेजोगाई, डिघोळअंबा गावच्या बाबुराव रूद्राक्ष यांच्याशी झाला. बाबुराव यांनी विद्या यांना सुचवले की, पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण कर. विद्या यांनी विवाहानंतर शिक्षण पूर्ण केले. पुढे उभयतांना दोन मुले झाली. त्याचकाळात बाबुराव यांची बदली कोकण कृषी केंद्रात झाली. काही काळाने त्या पुन्हा गावी आल्या. मुले लहान होती. त्यांच्यासाठी वेळ देणे आवश्यक होते. मुले मोठी झाल्यावर मात्र त्यांनी घरातल्या शेतीमध्ये लक्ष द्यायला सुरूवात केली. तेव्हा पहिल्यांदा चार वर्षे त्यांनी रासायनिक खतांचा वापर करून शेती केली. गृहिणी जसा घरातल्या सगळ्या खर्चाचा हिशोब ठेवते, तसा हिशोब त्यांनी शेतीच्या खर्चाचा ठेवला. त्यातून त्यांना समजले की, दरवर्षी शेतीचा खर्च वाढत चालला आहे आणि फायदा नाममात्र. शेतीसाठीचे कोणते खर्च टाळता येतील, असा विचार त्यांनी केला. मग बियाणे आणि रासायनिक खत यांची खरेदी न करता घरातले बियाणे वापरणे. तसेच, सेंद्रिय पद्धतीने शेती करणे हे पर्याय त्यांनी वापरायला सुरूवात केली. गांडूळखत शेणखत आणि नैसर्गिक खत मिळावे म्हणून त्यांनी पशूधन वाढवले. शेतीसंदर्भातील ज्ञान वाढवण्यासाठी त्या विविध परिषदांना जाऊ लागल्या. अभ्यास करू लागल्या. त्यांना कळाले शेतीसाठीचा खर्च आणि मेहनत जरी शेतकर्याने केली, तरी निसर्ग लहरी आहे. कधी पाऊस जास्त पडेल, कधी पडणारच नाही. त्यासाठी विद्या यांनी एकच पद्धतीचे पीक घेतले नाही, तर शेतात विविध पीके त्या घेऊ लागल्या. त्यामुळे निसर्गाने लहर दाखवली, तरी एक-दोन पीके हाताशी येऊच लागली. या सगळ्या काळात विद्या यांची जिद्द आणि आशावाद वाखाणण्यासारखा होता. काही वर्षांपूर्वी मराठवाड्यात गारपीट झाली. शेतकर्यांचे नुकसान झाले. त्यावेळी शेतकर्यांना तसेच, एकल शेतकरी महिलांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी विद्या यांनी यशस्वी प्रयत्न केले. विद्या म्हणतात की, “सेंद्रिय शेती क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा आणि ग्रामीण भागातील महिलांच्या उत्थानात खारीचा वाटा उचलता यावा, हेच माझे ध्येय आहे.” अशा या विद्या सेंद्रिय कृषी क्षेत्रातील दीपस्तंभ आहेत.
९५९४९६९६३८