ठाण्यातील तिन्ही जागा महायूतीच्याच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
28-Oct-2024
Total Views |
ठाणे : ठाणे आधीही भगवे होते आणि पुढेही भगवेच राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होतील आणि ठाण्यातील तिन्ही जागा महायूतीच्याच निवडून येतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील सर्व रेकॉर्ड तोडणार आहेत. ठाण्यातील भाजपच्या दोन आणि शिवसेनेची एक या तिन्ही जागा प्रचंड बहुमताने निवडून येतील. संपूर्ण ठाणे महायूतीच्या मागे उभे राहिल. ठाणे आधीही भगवे होते आणि पुढेही भगवेच राहणार आहे."
धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा शिंदेंकडेच!
ते पुढे म्हणाले की, "केवळ रक्ताच्या नात्याने वारसा येत नाही. वारसा विचाराने आणि कृतीने येतो. त्यामुळे विचाराने आणि कृतीने धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा एकनाथ शिंदेंकडेच आहे. आम्ही प्रत्येक निवडणूकीकडे आव्हान म्हणून पाहतो. लोक पुन्हा आमच्याकडे सत्ता देतील. मुंबई महायूतीची ताकत आहे. त्यामुळे मुंबई मोदींजींच्या सोबत आहे. देशातील ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे हे काँग्रेसी गुजरातचे अँबॅसिडर बनले आहे. हिंदूत्व हा आमच्यासाठी निवडणूकीचा नाही तर जगण्याचा मुद्दा आहे," असेही ते म्हणाले.