मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. त्यांची लव्हस्टोरी सर्वांना माहिच आहेच. पण नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि यावेळी उमेशने आजवर कधीही न सांगितलेला मजेशीर किस्सा २५ वर्षांनी पहिल्यांदाच सांगितला. नक्की लव्हस्टोरीचा तो खास किस्सा कोणता आहे जाणून घेऊयात..
झी मराठी पुरस्कार सोहळ्याचं यंदा २५ वं वर्ष होतं. या निमित्तानं या २५ वर्षात गाजलेल्या सगळ्याच मालिकांमधील कलाकार हा सोहळ्याला हजर होते. उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तसेच, लोकप्रिय मालिका आभाळमाया या मालिकेतील सर्व जुन्या कलाकारांनी आवर्जून हजेरी लावत सगळ्यांनाच भावूक केले.
उमेश म्हणाला की, “एकदा आम्ही वांद्रे रेक्लेमेशनला बसलो होतो. सगळ्यांना माहितीच असतील ते स्पॉट्स. यावर प्रिया हसली. उमेश म्हणाला की, हे तुला पण नाही माहिती. आतापर्यंत आम्ही मुलाखतींमध्ये तेच तेच किस्से सांगितलेत. पण किस्सा आता पहिल्यांदाच सांगतोय. आम्ही तिथेच बाइक लावून, कट्ट्यावर बसलो होतो. हे सगळं लपवा लपवीचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी प्रियाचा मला फोन आला घाबरून. एका पेपरात असा एक फोटो आलेला आहे. वांद्रे रेक्लेमेशनच्या कट्ट्यावर बसलेल्या कपल्सचा एक फोटो मुंबई वृत्तांतच्या पहिल्या पानावर आला होता. त्यामुळं पुढचे दोन दिवस आम्ही एकमेकांना समजवत होतो की, ते आपण आहोत हे नाही कळणार कोणाला”, उमेशने हा किस्सा सांगितल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. तर यावर पुढे प्रिया म्हणाली की, माझ्या मैत्रिणीच्या मावशीनं मला त्या फोटोत ओळखलं होतं, त्यानंतर मी घरी आलेल्या पेपरातून तो फोटो कापून टाकला होता..”