राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योगसाधनेला ओळख मिळवून देताना, त्याचे महत्त्व अधोरेखित करणार्या योग अभ्यासक आणि संशोधक गंधार विश्वास मंडलिक यांच्याविषयी...
दि. २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ जाहीर करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोलाची भूमिका बजावली. यानिमित्ताने पंतप्रधानांनी योगसाधनेचे महत्त्व जगाच्या पटलावर अधोरेखित केले. परंतु, असेही काही अदृश्य हात आहेत की, त्यांनी योगविद्येला जगभर पोहोचविण्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे. यापैकीच एक योगसाधक म्हणजे गंधार विश्वास मंडलिक. कळत्या वयापासून योगाला आपलेसे करुन योगसाधनेला महत्त्व प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न गंधार करीत आहेत.
योगसाधनेचे बाळकडू गंधार यांना त्यांचे वडील विश्वास मंडलिक यांच्याकडून मिळाले. योगसाधनेसाठी आपले अवघे आयुष्य समर्पित केलेल्या गंधार यांच्या वडिलांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे ‘योग विद्या गुरूकुल’ आश्रमाची स्थापना केली. गंधार यांच्या वडिलांना या कार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१९ साली विशेष पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. विश्वास मंडलिक यांनी सुरू केलेले ‘योग विद्या गुरुकुल’ गंधार आता नेटाने पुढे चालवत आहेत.
जन्मापासून योगसाधनेची आवड असणार्या गंधार यांनी आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. दि. ३० जानेवारी १९७४ रोजी नाशिकमध्ये जन्मलेल्या गंधार यांचे प्राथमिक शिक्षण पेठे हायस्कूलमधून पूर्ण झाले. आरवायके महाविद्यालयातून बारावी, तर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी १९९५ साली पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केली. पदवीनंतरही गंधार यांनी आपले शिक्षण पुढे सुरूच ठेवले. २०११ साली ‘क्लिनिकल सायकोलॉजी’ ही पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर सिडनी शहरातील ‘द युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’च्या ‘मेडिसिन अॅण्ड हेल्थ’ विभागातून २०२४ साली ‘पीएचडी’चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गंधार यांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या ‘योग विद्या गुरुकुल’चे २००३ सालापासून संचालक म्हणून काम बघायला सुरूवात केली. त्यानंतर गंधार यांनी देशोदेशी आंतरराष्ट्रीय योग कार्यक्रमांचे आयोजन करत योगाचे महत्त्व जगाला पटवून दिले. यामध्ये त्यांना यश आले असून, आतापर्यंत अमेरिका, इंग्लंड या देशांबरोबरच ८४ देशांमध्ये २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय योग कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले. यामध्ये त्यांनी ७ हजार, ५०० योग शिक्षकांना प्रशिक्षित केले. तसेच, देशामधील १४ विविध केंद्रांमध्ये योग कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम करत ५० हजारांपेक्षा अधिक जणांना योगाचे शिक्षण दिले. योगामध्ये नवनवीन प्रयोग होऊन त्याचा प्रचार व्हावा, यासाठी गंधार यांनी केलेल्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता दिली गेली आहे. २०२१ साली ‘म्युकोसिलरी क्लिअरन्स’, विविध योगासनांच्या फायदेशीर परिणामांची यंत्रणा यावर केलेले संशोधन आयुर्वेद आणि योगाचे आंतरराष्ट्रीय संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यानंतर ‘जर्नल ऑफ इंटिग्रेटिव्ह अॅण्ड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन’मध्ये एकसारख्या नसलेल्या सर्व योगशैली, या योगाच्या वैशिष्ट्यांवर केलेले आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण प्रकाशित झाले आहे. त्याचप्रमाणे ‘तणाव आणि आरोग्य’ या विषयांवरही गंधार यांनी संशोधन केले आहे, तर ठराविक योगवर्गात शिकवले जाणारे योगाचे वेगवेगळे घटक समजून घेण्यासाठी योगशिक्षणाचे सर्वेक्षण करत आणि २०२० साली ‘द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ योग थेरपिस्ट’, ‘लिटल आणि ईएसएस रिसर्च सेमिनार’, ‘फॅकल्टी ऑफ मेडिसिन अॅण्ड हेल्थ’ या विषयावर ‘द युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’ येथे तोंडी सादरीकरण केले आहे. योग संशोधनात दिलेल्या योगदानासाठी उत्कृष्टता आणि नवोन्मेषासाठी अमेरिकेच्या ‘द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ योग थेरपिस्ट स्वामी कुवल्यानंद संशोधन पुरस्कारा’ने गंधार यांना सन्मानित करण्यात आले आहे. योगातील आपला अनुभव आणि शिक्षण इतरांना मिळावे, यासाठी योग महाविद्यालयात व्याख्याता म्हणून ते कार्यरत आहेत, तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग थेरपी कार्यक्रमांतर्गत समन्वयक आणि व्याख्याता म्हणून काम केले आहे. योग शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, योगा थेरपी प्रशिक्षण कार्यक्रम, आगाऊ योग कार्यक्रम, कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्याख्यानांद्वारे योगाला महत्त्व प्राप्त करुन देणार्या गंधार यांना अजूनही बरेच काम करायचे आहे. योगातील आपल्या व्यापक अभ्यासाचा समाजाला उपयोग व्हावा, यासाठी योगाभ्यासाचे विविध पैलू आणि त्याचा उपयोग यांचा समावेश असलेले त्यांचे योगावरील १०० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.
तसेच योगसाधनेवर आधारित गंधार यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही ना काही ताणतणाव भेडसावतात. त्यावर उपायासाठी गंधार यांनी शिक्षक प्रशिक्षण, तणाव व्यवस्थापन आणि उपचारात्मक प्रयोगांसह विविध गरजांसाठी विविध योग कार्यक्रम विकसित केले आहेत. त्याचप्रमाणे www.yogapoint.com या नावाने त्यांनी एक सर्वसमावेशक योग पोर्टल आणि वैयक्तिक योगाभ्यासासाठी ‘योगा पॉईंट अॅप’ तयार केले आहे. आपले संपूर्ण आयुष्य योगाला समर्पित करुन, आधुनिक समाज आणि ग्रामीण वंचित समुदायांमध्ये योगाचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या गंधार यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
विराम गांगुर्डे
९४०४६८७६०८